रॉय, पॉली :

पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्यूयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. जीवशास्त्राचा अभ्यास करत असतांना त्यांची भेट प्रसिद्ध जीव शास्त्रज्ञ सोल स्पिजेल्मन (Sol Spigelman) यांच्याशी झाली. पॉली यांनी पुढील तीन वर्षे रुटजेर विद्यापीठात (Rutger University) सूक्ष्मजीवशास्त्राच्या वॉक्समन संस्थेत आरएनए व्हायरॉलॉजी या विषयात पोस्ट डॉक्टरल संशोधन केले. त्यानंतर बर्मिंगहॅम येथील अलबामा विद्यापीठात त्या ‘ब्ल्यू टंग’ व्हायरसवर काम करणाऱ्या चमूत सहभागी झाल्या. १९८७ साली त्या अलबामा विद्यापीठात प्राध्यापक झाल्या. पुढे त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची फोगारटी शिष्यवृत्ती मिळाली. १९९७ साली तेथेच त्या प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. २००१ साली लंडन स्कूल ऑफ हायजीन अंड ट्रोपिकल मेडिसिन या संस्थेत प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. तेथे त्यांनी वैद्यक सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रम तयार केले.

मेंढी आणि गुरांना होनाऱ्या ब्ल्यू टंग रोगावर संशोधन करण्यात त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे कार्य प्रामुख्याने विषाणूंचे अनुवंशशास्त्र, प्रथिनांचे कार्य, पेशीतील विषाणूंचा प्रवास आणि कण स्वरूपातील लस निर्मितीचे तंत्र या विषयासाठी वाहिलेले आहे.

ब्ल्यू टंग व्हायरसचा आकार, त्याचे प्रजनन, त्याचा शरीरात होणारा प्रसार या विषयांवर वरती त्यांनी ३०० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

रॉय यांची अकॅडेमी ऑफ मेडीकल सायन्सेसच्या फेलो म्हणून निवड झाली. त्यांना वेल्कम ट्रस्टचे वरिष्ठ संशोधक, इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते अध्यक्षीय सुवर्ण पदक, जैवतंत्रज्ञान आणि जीवशास्त्र संशोधन संस्था यांचा  इनोव्हेटर ऑफ द इयर पुरस्कार, व्हायरसवरील संशोधनासाठी ऑफिस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर हा किताब, फेलो ऑफ द सोसायटी ऑफ बायोलोजीचे सदस्यत्त्व असे सन्मान प्राप्त झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा