परुळेकर, रजनी : ( १६ जून १९४५). मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री. १९७० नंतरच्या मराठी कवितेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जन्मस्थळ पावस (जिल्हा रत्नागिरी), त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले. एम. ए. पर्यंत उच्च शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. मुंबईतल्या बुऱ्हाणी महावि़द्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले आहे.
रजनी परुळेकर यांचे दीर्घकविता (१९८५), काही दीर्घ कविता (१९९३), स्वीकार (१९९३), चित्र (१९९६), पुन्हा दीर्घकविता (१९९९) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. पुरुषकेंद्री कवितेला छेद देत रजनी परुळेकर यांनी आत्मभान व्यक्त करणारी कविता लिहून स्त्रियांचे भावविश्व पारदर्शीपणे कवितेतून व्यक्त केेले आहे. जगण्याच्या अनेकविध अनुभवांना त्यांनी काव्यात्म रुप दिले. १९७० पूर्वीच्या कवयित्रींची अभिव्यक्ती आत्मकेंद्री आणि सौंदर्यवादी जाणिवांच्या वर्तुळात सीमित होती. १९७० नंतर रजनी परुळेकर यांनी समकालीन अस्तित्त्वाची जाणीव व्यक्त करीत स्त्रीला जाणवलेले आत्मभान कवितेतून अतिशय प्रगल्भतेने व्यक्त केले. त्यांनी केवळ स्त्री म्हणून स्वतःकडे पाहिले नाही तर माणूस म्हणून पारदर्शीपणे जे जीवनानुभव घेतले त्या जीवनानुभवांना त्यांनी आपल्या कवितेचा आशय बनविले. जगण्याच्या प्रत्येक अनुभवाला निकोप मनाने सामोऱ्या जात त्या जगण्यावर भाष्य करताना दिसून येतात. स्त्रीची अस्मिता, स्त्रीला आलेले आत्मभान त्यांच्या कवितेत प्रकर्षाने जाणवत राहते. स्त्री म्हणून पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेने मांडलेली चौकट त्या तोडतात आणि पुरुष प्रतिमेत स्वतःला अडकवून न घेता नव्याने आत्मभान आलेल्या स्त्रीची एक नवी प्रतिमा त्या उभी करतात. प्रथमतः व्यक्तिनिष्ठ असणारी त्यांची कविता समग्र स्त्रीत्त्वाचा परिघ अधोरेखित करत समष्टिनिष्ठ होते.
जीवन जगतानाचे आलेले अनुभव, विविध नातेसंबंधाच्या विणीतले सूक्ष्म ताणतणाव, स्त्री म्हणून आलेले जैविक व सामाजिक अनुभव या आशयसूत्रांतून रजनी परुळेकर यांची कविता आकारत जाते. एक स्त्री म्हणून आलेले अनुभव तर त्या मांडतातच पण माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून या अनुभवांना त्या अधिक नेमकेपणाने अधोरेखित करतात. विविध मानवी नातेसंबंधाचे कंगोरे त्या शब्दबध्द करतात. त्यांच्या कवितेतील स्त्री-पुरुष नातेसंबंध हे जसे संवादोत्सुक दिसतात तसेच ते विसंवादीही दिसून येतात. स्त्री-पुरुष नात्याचे तरल अनुबंधही त्यांच्या कवितेत दिसून येतात. स्त्री-पुरुष नात्याविषयीचे विविध कंगोरे त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. स्त्री-पुरुष हे प्रियकर-प्रेयसी असतात तर कधी मित्र-मैत्रीण असतात. आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या पुरुषांच्या अनेक पैलूंचे, प्रसंगांचे वर्णन त्यांच्या कवितांतून पाहता येते. पुरुषी व्यक्तिमत्त्वांच्या विविध छटांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून दिसून येते.
सत्तरच्या दशकात स्त्रीवादी जाणिवा अभिव्यक्त होवू लागल्याचे दिसून येतात. या दशकात पाश्चात्य संस्कृतीचे संदर्भ घेवून स्त्रीवादी विचारधारा उदयास आली. या विचारधारेने स्त्रियांच्या स्वतंत्र विचार क्षमतेला महत्व देण्यात यावे ही भूमिका मांडली. रजनी परुळेकर यांच्या कवितेत या स्त्रीवादी जाणीवा दिसून येतात. त्यांनी पुरुषांकडे नकारात्मक भावनेने कधीच पाहिले नाही. मात्र स्त्रियांचे शोषण करणारा पुरुष त्यांनी नाकारलेला दिसतो. त्यांना अभिप्रेत असलेला स्त्रीवाद हा मानवतावादच असल्याचे दिसून येते. त्यांची कविता स्त्रीवादी असली तरी पुरुषांना नकारात्मक दृष्टिकोनातून ती पाहत नाही. स्त्रियांना माणूस म्हणून समान न्याय द्यायला हवा. या मानवतावादी भूमिकेतून त्या स्त्रीवादी असल्याचे दिसून येते. पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेतील स्त्रियांचे असणारे दुय्यमत्व त्यांना अस्वस्थ करते. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या पुरुषांविषयी त्यांना चीड असली तरी समस्त पुरुष वर्गाला त्या नकारात्मक भावनेतून पाहत नाहीत. पुरुष हा स्त्रीचा, तिला प्रेरणा देणारा मित्र असू शकतो यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे पुरुषाचे नकारात्मक चित्रण त्यांच्या कवितेत दिसून येत नाही.
रजनी परुळेकर यांची कविता व्यक्तीनिष्ठ असली तरी अनेकदा व्यक्तीनिष्ठतेची चौकट ओलांडून स्त्रीवादी व स्त्रीनिष्ठ झाल्याचे दिसून येते. आयुष्यात भेटलेल्या स्त्रिया त्यांच्या कवितेचा विषय होतात. स्त्रियांशी संवादी असणे हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. मैत्रीण या नात्याशी संवाद साधणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या. या कविता वाचताना लक्षात येते की, त्या केवळ मैत्रीणीशीच संवाद साधत नाहीत तर समस्त स्त्रीजातीशी त्या संवाद साधतात. जगण्याच्या अवतीभोवती असलेल्या अनेक स्त्रियांच्या भावविश्वाशी त्या एकरुप होतात आणि आपले जगणे त्यांच्या जगण्याशी जोडू पाहतात. त्यांच्याशी त्यांचे भावनिक नाते जडलेले दिसून येते. हे भावनिक नाते बहुतांशी स्मरणरंजनाचे असते. भूतकाळात भेटलेल्या या स्त्रियांमध्ये काहीजणी वर्गमैत्रिणी असतात, काहीजणी निकटच्या मैत्रिणी असतात, कधी विद्यार्थींनी, कधी शेजारीण तर कधी अपरिचीत स्त्रीही असते. वर्तमानकाळात जगताना आलेल्या कटू अनुभवावर मात करण्यासाठी लहानपणीच्या विविध आठवणींसह या स्त्रियां आठवतात. बालपणीच्या आठवणी कवयित्री तुकडया तुकडयाने आठवत राहते.
रजनी परुळेकरांनी कवितेत प्रतिमा प्रतीकांचा वैविध्यपूर्ण वापर केलेला दिसतो. आपल्या अनुभवविश्वातील अनेक प्रतिमा-प्रतीकांचा त्या उपयोग करतात. विशेषतः स्त्रीच्या भावजीवनाशी जोडलेल्या प्रतिमा त्या अनेकदा वापरतात. उदा. ‘ हिरव्या चुडयांसारख्या लाटा ’ , ‘ रांगोळयांच्या ठिपक्याप्रमाणे दिसणारे चेहऱयांवरचे डाग ’, ‘ गाडग्या.मडक्यांतील किडूकमिडूक ’, ‘ कुजबुजणारी दारं.खिडक्या ’ , ‘ भावपूर्ण धाग्यांची विण ’, ‘ खांबावरचे नक्षीकाम ’, ‘ डोळयांतले हिरवे काजळ ’, ‘ विरलेलं काशिदाकाम ’, ‘ देवकेळीसारखी विद्यार्थींनी ’, ‘ अक्षतांसारखे प्रसंग ’, ‘ पत्र्याच्या चाळणीतून रांगोळीत उमटणाऱ्या फुलांसारख्या आठवणी ’ इत्यादी. स्वयंपाकघरातील वस्तू, फळं, भाज्या यांचाही उपयोग कवयित्री प्रतिमा सारखाच करते. उदाहरणार्थ, ‘ फणसाच्या काटयासारखे ताठ उभे राहिलेले केस ’ , ‘ पोटऱ्यातला दमदारपणा जाऊन कोथिंबिरीच्या काडयांसारखे बनणारे पाय ’, ‘ किलोभर सुरणासारखं कुबड ’ , ‘ सुकलेल्या पालेभाजीसारखी अवघ्या शरीराची जुडी ’, ‘करपलेली भाजी न ढवळता वरची भाजी काढून घेणारी गृहिणी ’ वगैरे. रजनी परुळेकर यांनी काव्यात्म अभिव्यक्तीसाठी दीर्घ कवितेचा रुपबंध निवडलेला आहे. त्या दीर्घ कवितेचा रुपबंध स्वीकारुन एखादया घटना प्रसंगाचे सविस्तर कथन करताना दिसून येतात. उदा. ‘ दोन्पाय ’, ‘ डफ ’, ‘ तुला ’, ‘ वारा ’, ‘ गर्भखुणा ’ , ‘ तू रागावली आहेस ’, ‘ वंशवृक्षाच्या फांदीवर ’, ‘ एकटया आर्त संध्याकाळी ’, ‘ करंटया शरीरास ’, ‘ हे वास्तू ’, ‘ व्यंजनेच्या रानात ’, ‘ तरीही सम साधत नाही ’, ‘ निद्रेस’, ‘ अखेरचे पत्र ’ . इ. कविता.
रजनी परुळेकर त्यांच्या दीर्घ कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, स्वीकार या संग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार तसेच चित्र या संग्रहाला ना.धो. महानोर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कविता दशकाची या उपक्रमात त्यांची कविता समाविष्ट होती.
संदर्भ :
- नीरजा (संपा), निवडक रजनी परूळेकर – निद्राहीन रात्रीच्या कठोर काठावर,लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई.