गणोरकर, प्रभा : (जन्म ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. १९७० ते २०२०  या चार दशकांच्या कालखंडातील अतिशय महत्त्वाच्या कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव बंड श्री. शिवाजी विद्यालय येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे झाले. त्यांनी बी.ए. (१९६३) तर एम.ए. (१९६५) पूर्ण केले. द.भि. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी  ‘ चिं.त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यातील शोकात्म भान ’ या विषयावर नागपूर विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी अमरावतीच्या विदर्भ महावि़द्यालयात (१९६८ ते १९८२), मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात (१९८२ ते २००३) मराठी भाषा आणि साहित्य या विषयाचे अध्यापन केले.

त्यांनी १९८३ ते २००३ या काळात स्टेट इन्स्टिटयूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स मुंबई या संस्थेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या अभ्यासक्रमातील ऐच्छिक मराठी या विषयाचे अध्यापन केले. तसेच १९९९  ते २००३ या काळात त्यांनी या संस्थेच्या संचालकपदी कामही केले. प्रभा गणोरकर यांचे व्यतीत (१९७४), विवर्त (१९८५), व्यामोह (२०१५) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. बाळकृष्ण भगवंत बोरकर (१९९०) हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता  (१९९०), गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी  (१९९७), किनारे मनाचे, शांता शेळके यांची निवडक कविता  (१९९८) आशा बगे यांच्या निवडक कथा  (२०१८) ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश  (२००१)  संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश  भाग. १ आणि भाग २ (२००४) ही त्यांची सहसंपादने आहेत एकेकीची  कथा  (२०००), श्रावण बालकथा  (२०००) याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवशक्ती, मी मराठी, सत्यकथा, प्रतिष्ठान, आलोचन, युगवाणी, इत्यादी नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. मराठीतील स्त्रियांच्या कविता या वाङमयप्रकल्पासाठी त्यांना भारत सरकारच्या मानवसंसाधन विभागातर्फे सिनीअर रायटर फेलोशिप (२००५) प्राप्त झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी मराठीतील स्त्रियांच्या कविता (२०१६) हा स्त्रीलिखित मराठी कवितेचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला.

जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी प्रभा गणोरकर यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून वाटयाला आलेला सनातन संघर्ष व एकटेपण हे व्यतीत  या कवितासंग्रहातील कवितांचे लक्षणीय आशयसूत्र आहे. सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराला निर्भयपणे सामोरे जाणारी कवितागत मी, उदासी, एकटेपण, संघर्ष, अगतिकता, हतबलतेशी झुंज देत परिस्थितीशी लढू पाहते. विवर्त  या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये झाड या सूत्रप्रतिमेतून कवयित्रीने झाडाचा समग्र स्त्रीत्त्वाशी असलेला आदिबंधात्मक अनुबंध अधोरेखित केला आहे. रुजणे, वाढणे, फुलणे, फळणे, झिजणे, उखडणे आणि पुन्हा नव्याने रुजणे या सर्जन चक्राला सामोरे जात आपल्या अस्तित्त्वाची अपरिहार्यता सिध्द करणे हा कवयित्रीच्या नेणिवेतील स्त्रीत्त्वाचा नेमका अन्वयार्थ या संग्रहातील कवितांतून व्यक्त होतो. स्त्री-पुरुष नात्यातील व्यामिश्रता व प्रेमसंवेदन अनेक तरल शब्दांमध्ये प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले आहे. नवकाव्य परंपरेतल्या अस्तित्ववादाचे परिमाण प्रभा गणोरकर यांच्या कवितेत दिसून येते. कुठे जाणार हा प्रश्न घेऊन जगण्याचा प्रवास एकाकीपणे करणारी कवितागत मी स्वतःची तुलना वाळवंटातून रात्री प्रवास करणाऱ्या  काळ आणि दिशा आजमावणाऱ्या एकाकी अरबाशी करते. व्यतीत  काव्यसंग्रहातील प्रवास हा रुढ अर्थाचा प्रवास नसून आदिम एकटेपण घेऊन जगणाऱ्या माणसाच्या सनातन पराधीनतेचा प्रत्यय देणाऱ्या आत्मशोधाचा प्रवास आहे. परात्मतेची भावना ही अस्तित्ववादी जाणिवेचे फलित आहे. अस्तित्ववादी जाणिवेतून काव्यलेखन करणाऱ्या प्रभा गणोरकर यांच्या कवितेत परात्मतेची भावना प्रकर्षाने आढळते. गर्दीत असूनही जाणवणारे एकटेपण, कुणाशीही बांधले जावू नये इतकी अलिप्तता त्यांच्या कवितेतून दिसून येते. त्यांच्या कवितेतील कवितागत मी, ‘स्थलांतराच्या या प्रवासाने इतकी तटस्थता दिली की तसे हे गांव आणि मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे’, ही भावना व्यक्त करते. पुन्हा शोधणे: नवे रस्ते, नवी माणसे, पुन्हा एखादे नवे नाव, प्रवासाची ही अटळता अस्वस्थ उदासी निर्माण करते. वर्तमानकालीन जगण्यासाठी केंद्रबिंदू ठरलेल्या आठवणी,भूतकाळाविषयीची आस्था, संघर्षाचे स्मरण हे व्यामोह  या कविता संग्रहातील कवितांचे आशयसूत्र आहे.

प्रभा गणोरकर यांच्या कवितेतील संवेदन हे संवेदनशील, बुध्दिमान, प्रगल्भ, कर्तृत्ववान, संघर्षशील, स्वयंभू स्त्रीचे आहे. एकाकी, तुटलेल्या व्यक्तीला मानवी संबंधाच्या संदर्भात अनुभवास येणारी अस्तित्ववादी अपरिहार्यता या कवितेतून अभिव्यक्त होते. एकाकीपणाच्या संघर्षातून आत्मभान जपणारे स्त्रीसंवेदन त्यांच्या कवितेत प्रकर्षाने जाणवते. प्रभा गणोरकर यांच्या कवितेतील कवितागत मी ही स्वतःची अस्मिता जपणारी स्वयंभू स्त्री आहे. जगण्याचा निष्फळ व निरर्थक भाबडेपणा तिच्या ठायी नाही. ती स्वतःचं अस्तित्व आणि वेगळेपण जपणारी मनस्वी स्त्री आहे. प्रभा गणोरकर यांच्या कवितेत निसर्ग संवेदन विपुल प्रमाणात आढळते. झाडे, सूर्य, समुद्र, संध्याकाळ, पाऊस, आकाश, पक्षी इ. निसर्गाचे घटक त्यांच्या कवितेत पुनरावृत्त होतात. कवयित्रीने निसर्ग प्रतिमांच्या आधारे एकाकीपणासोबतचा संघर्ष, अस्तित्वसंघर्ष सूचकतेने शब्दांकित केला आहे. या निसर्ग प्रतिमांतून अनेकदा अस्तित्ववादी जाणिवांचे प्रकटीकरण आणि आत्मशोधाची जाणिव अभिव्यक्त झाल्याचे दिसून येते. सोबतच प्रेमानुभवही व्यक्त होतो. जगण्यातील अमानुषता, क्रौर्य, हिंसा यांचाही प्रत्यय त्यांच्या काही कवितांतून येतो.

प्रभा गणोरकर यांच्या कवितेत गाव, प्रवास, अरण्य, नदी, हे आदिबंध दिसून येतात. गाव या आदिबंधात्मक प्रतिमेप्रमाणे झाड ही आदिबंधात्मक प्रतिमा त्यांच्या कवितेत वारंवार येते. रुजणारे झाड, वाढणारे झाड, सावली देणारे झाड, उखडणारे झाड, झिजणारे झाड, विसावा देणारे झाड, झाडांची ही विविध रुपे काव्याशयाची गरज म्हणून अवतरत असली तरी या झाडाच्या आदिबंधात्मक प्रतिमेतून स्त्रीत्वाची भूमिका अधोरेखित होते. झाड आणि स्त्रीचे असलेले समानत्व अधोरेखित होते. झाड हे स्त्रीप्रमाणे नवनिर्माणाचे, सर्जनशीलतेचे आणि सुफलीकरणाचे प्रतीक आहे. त्यामुळे कवयित्रीच्या नेणिवेत झाडाचा संदर्भ स्त्रीत्वाशी जोडलेला दिसून येतो.

प्रभा गणोरकर यांना बहिणाई पुरस्कार (१९९९), शांता शेळके पुरस्कार (२०१२), कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार (२०१६), मराठीतील स्त्रियांच्या कविता  या ग्रंथासाठी भास्कर लक्ष्मण भोळे पुरस्कार (२०१६), व्यामोह या संग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार (२०१६), आशा बगे यांच्या निवडक कथा  या संपादनास रा.ना. चव्हाण पुरस्कार (२०२०) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. धामणगांव जि.अमरावती येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे (२०००)अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  • खांडगे मंदा (संपा), दीक्षित लीला, स्त्रीसाहित्याचा मागोवा, खंड २, साहित्यप्रेमी भगिनीमंडळ, पुणे, २००२.