तांबोळी, लक्ष्मीकांत सखाराम : (२१ सप्टेंबर १९३९). मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार. जन्म जिंतूर, जिल्हा परभणी येथे झाला. शालेय शिक्षण जिंतूर येथे. महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद येथे. एम. ए. (मराठी) बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.ग्रामीण परिसर व तेथले प्रश्न, वास्तव यांच्या अनुभवातून साहित्य लेखनाची वाटचाल. नोकरी माध्यमिक शिक्षकापासून. एडेड स्कूल, पूर्णा येथे काम केले.माध्यमिक शिक्षक सरस्वती भूवन, औरंगाबाद.   देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे अधिव्याख्याता म्हणून काम केले व प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले (१९६३-९९).

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांची साहित्य संपदा – काव्यसंग्रह : हुंकार (१९५९),अस्वस्थ सूर्यास्त (१९७०), मी धात्री मी धरित्री (१९९१), गोकुळवाटा (२००४), जन्मझुला (२०१३) ; कथासंग्रहतवंग (१९६८), सलाम साब (१९८१) ; कादंबरी : दूर गेलेले घर (१९७०), कृष्णकमळ (१९७५), अंबा (१९७८), गंधकाली (१९७९) ; ललितलेखन : कबिराचा शेला (१९९६), सय सावल्या (२००६), झिरपा (२००८); समीक्षा : काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती (१९९३) इत्यादी.

दुःखाची अनंत रुपे आहेत. दुःखाची जाण, दांभिकतेची चीड, बेगडीपणाबद्दल तिटकारा आणि तिरस्कार त्यांच्या एकूण कवितेत व्यक्त होतो. अस्वस्थ सूर्यास्त  या कविता संग्रहातील कविता रितेपणा, वेदना, स्वतः बरोबरच निसर्ग व माणूस यांचा शोध घेत असताना जाणवणारी वेदनेची सार्वत्रिकता इत्यादी विषय येतात. उपहासगर्भ शैलीचा उपयोग ते त्यांच्या निवेदनात करतात. त्यांच्या कवितांमधून जीवनातली निराशा, अपेक्षाभंग, मूल्यहीनता, व्यवहारिकता, भ्रष्टाचार या कारणांमुळे मनाला होणार्‍या वेदना मांडल्या आहेत. गोकुळवाटा  हा काव्यसंग्रह एक गीतमालिका असून त्यामध्ये राधाकृष्णाच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास आहे. जन्मझुला  या कविता संग्रहातील कविता मानवाच्या अंगभूत दुर्बलतेचा, असहाय्यतेचा आणि परात्मभावाचा वेध घेते. मृत्यूसंबंधीची एक प्रगल्भ जाणीव तांबोळी यांच्या कवितेत व्यक्त झाली आहे. ही कविता मृत्यूभयाने ग्रासलेली नसून ती मृत्यूच्या अटळ वास्तवाचा समजूतदारपणे स्वीकार करते. त्यांच्या कवितेला आध्यात्मिकतेचा आधार असल्यामुळे त्यांच्या कवितेतील परात्मभावाची जाणीव भारतीय संस्कृतीशी  जोडून येते.

त्यांच्या कादंबऱ्यांतून समकालीन जीवनाचे चित्रण येते. एका बाजूला देव, धर्म, आध्यात्म यावरील श्रद्धा तर दुसर्‍या बाजूला सर्व काही तर्काच्या निकषांवर पारखू पाहणारी बुद्धी हा सनातन संघर्ष त्यांच्या दूर गेलेले घर  या कादंबरीतून येतो. अवघडलेपण हा या कादंबरीचा विषय आहे. मराठवाड्यातील एक पडझडता डगमगता धर्ममठ हे या कादंबरीचे केंद्र आहे. सात पिढ्यांचे संताबुवा महाराज घराणे हा या कादंबरीचा कालपट. दीर्घ असूनही कादंबरीत तो अटोपशीर आला आहे. त्यांचे कबिराचा शेला हे आत्मनिष्ठ, काव्यात्म, भावनेची डूब असलेले, अंतर्मुख करणारे ललित लेखन आहे. सय सावल्या या ललितलेखनात मध्ये राम शेवाळकर, धुंडा महाराज देगलूरकर, वा. ल. कुलकर्णी, ए. वी. जोशी, अनंत भालेराव इत्यादींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. रुढ समीक्षेपेक्षा आस्वादक समीक्षेच्या वळणाने त्यांनी समीक्षालेखन केले आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोन डोळ्यांनी कवितेचा प्रदेश न्याहाळणारी अभिजात रसिकता त्यांच्या समीक्षेत आढळते. त्यांच्या कवितेतील भावसौंदर्याप्रमाणे समीक्षेतील विचारसौंदर्य देखील मनमोकळे, प्रांजळ व निर्मळ असे  आहे.

लक्ष्मीकांत तांबोळी यांना उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९७०), नरहर कुरुंदकर पुरस्कार (२००५), यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि महाकवी विष्णुदास पुसस्कार (२००८), कुसुमताई चव्हाण पुरस्कार (२०१०), सूर्योदय पुरस्कार (२०१०) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कविता व कथा यांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू भाषांमधून अनुवाद प्रसिद्ध झाले.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.