गोडेलडेव्हिड : ( १९५० )

जैवतंत्रज्ञानातील उद्योगाचे प्रणेते.  डेविड गोडेल यांचा जन्म सान डिएगो, यूएसए येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलोरेडो विद्यापीठ कॅलिफोर्निया विद्यापीठ, सान डिएगो येथे झाले. रसायनशास्त्रातील पदवी मिळवल्यावर त्यांनी पीएच.डी. बोल्डर येथील कोलोरॅडो विद्यापीठातून मिळविली. त्यांनी पोस्ट डॉक्टरेटसाठीचे संशोधन स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांची नेमणूक बॉब स्वान्सन (Swanson) यांनी संशोधक म्हणून जेनेनटेक या कंपनीमध्ये केली.

डेविड गोडेल त्यांच्या जनुक तंत्रज्ञानातील आणि रेण्वीय जीवशास्त्रातील यशस्वी प्रयोगांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यशक्ती आणि स्पर्धात्मक संशोधनामुळे त्यांनी एकट्याने जेनेनटेक ही कंपनी जैवतंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी म्हणून नावारुपाला आणली. त्यांनी फुटवा करा अथवा मरा ( Clone or Die culture) चा संस्कार कंपनीला दिला. जेनेनटेकमध्ये संचालक म्हणून काम करीत असताना, जनुकीय अभियांत्रिकीचा वापर प्लास्मिनोजेन संप्रेरक जीवाणूंच्या सहायाने रोग निवारण्यासाठी मानवी इन्शुलिन, मानवी वाढीसाठीचे संप्रेरक, अल्फा इंटरफेरॉन, गामा इंटरफेरॉन, मानवी ऊती इत्यादी तयार करण्यासाठी यशस्वीपणे केला. या प्रथिनांचे उत्पादन करण्याचा प्रयत्न ही औषध कंपनी करीत आहे. इश्चेरिशिया कोलाय  या जीवाणुपासून मानवी इन्शुलिन तयार करून जनुकीय अभियांत्रिकीत फार मोठी क्रांती झाली.

स्टीव मॅकनाइट (Mcknight) आणि रॉबर्ट तीजन (Tijan) यांच्या सहयोगाने १९९१ मध्ये त्यांनी तुलारिक (Tularik) कंपनीची स्थापना केली. तुलारिक ह्या कंपनीचे ते अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या जनुक संयोगाच्या आणि जनुक अभिव्यक्तीच्या संशोधनामुळे ते नॅशनल अकादमी ऑफ सायन्सचे सदस्य तसेच अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सवर निवडून आले. त्यांना शास्त्रविषयासंबंधित अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. जीवरसायनशास्त्रातील एली लिली (Eli Lily) इनव्हेनटर ऑफ द इयर, जेकोल हस्काल्गाबे, संधिवाताच्या संशोधनासाठीचा होवले तसेच वॉरन अल्परट फाउंडेशन आणि स्वीडिश अकादमी ऑफ फार्मास्युटीकल सायन्सच्या शील (Scheele) या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे  २०० हून अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी लिहिलेले द हार्वे लेक्चर्स हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

संदर्भ :

 समीक्षक : रंजन गर्गे