ब्लूमबर्ग, बरुच सॅम्युअल : (२८ जुलै १९२५- ५ एप्रिल २०११)

न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले  ब्लूमबर्ग हे उच्च माध्यमिक शालेय शिक्षणानंतर अमेरिकेच्या सागरी सेवेत रुजू झाले. १९४६ च्या काळात कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत राहिले. या सेवेच्या अनुभवाचा वैद्यकीय संशोधक म्हणून त्यांना बराच उपयोग झाला. त्यांनी भौतिकशास्त्र ह्या विषयामध्ये पदवी पूर्व काळात शिक्षण घेतले. त्यानंतर गणित ह्या विषयात पदवी घेतली. वडलांच्या सल्ल्याने १९४७ साली कोलंबिया येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला प्रारंभ केला. सुरुवातीची दोन वर्षे वरिष्ठासमवेत अनेक संशोधनात  सहभाग घेतला. नंतरची दोन वर्षे मात्र रूग्णसेवेवर भर दिला. संपूर्ण आयुष्य रुग्णसेवा, वैद्यकीय अध्यापन आणि संशोधन अशा गोष्टींसाठी त्यांनी वाहून घेतले.

हिपॅटायटीस हा यकृताचा संसर्गजन्य आजार आहे. अगदी १९४० च्या सुमारास, विषाणूपासून होणाऱ्या  हिपॅटायटीसचे दोन प्रकार असत हे वैज्ञानिक सत्य शास्त्रज्ञाना उलगडले होते. वेगवेगळ्या विषाणुंद्वारा यकृतात संसर्ग करणाऱ्या हिपॅटायटीसचे अनेक प्रकार आहेत. त्यातील बी व सी प्रकारचे विषाणू शरीरात मुख्यत्वे करून रक्ताद्वारे व लैंगिक संबंधामुळे संसर्ग करतात. हे विषाणू यकृतातील पेशींवर परिणाम करतात. त्यामुळे यकृताच्या पेशींवर सूज येते. यामुळे रक्तातील बिलिरुबिन नावाचे रसायन वाढल्यास डोळ्यात पिवळेपणा दिसू लागतो. त्यालाच कावीळ झाली असे म्हणतात.

हिपॅटायटीस-बी ह्या आजारात यकृताचा सौम्य प्रमाणात त्रास किंवा अगदी अतिशय गुंतागुंतीचा गंभीर विकार अशा दोन्ही प्रकारची लक्षणे दिसू शकतात. अशा उपद्रवी हिपॅटायटिस-बी विषाणूचा शोध हा योगायोगाने लागला असे म्हणावे लागेल. १९५० साली अमेरिकेतील बरुच सॅम्युअल ब्लूमबर्ग हे मेडिकल अँथ्रोपोलॉजी म्हणजे मनुष्य जातीच्या विकासाचा  अभ्यास करीत होते. एखाद्या व्यक्तीला काही विशिष्ट प्रकारचे आजार का होतात, काही रुग्णांनाच एखादी व्याधी का होत असावी अशा मूलभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी ते संशोधन करीत होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशात प्रसंगी अगदी जंगलात जाऊन आदिवासी लोकांच्या रक्ताचे नमुने ते गोळा करीत असत आणि त्याचा अनुवंशिकता व आजार इत्यादी बाबींसाठी सखोल अभ्यास करीत.

रक्ताद्वारे पसरणाऱ्या आजारांच्या अभ्यासासाठी ब्लूमबर्ग आणि त्यांचे सहकारी फिलिपिन, भारत, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अशा अनेक देशात फिरून रक्ताचे नमुने गोळा करीत. त्यावेळी आजच्यासारखे तेव्हा अनुवंशिकता तपासण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. या अभ्यास प्रक्रियेत ब्लूमबर्ग यांनी हिमोफिलिया या आजाराच्या रुग्णाचे रक्त तपासण्याचे ठरवले. कारण या व्याधीने ग्रासलेल्या रुग्णाला अनेक  रक्तदात्याकडून  वारंवार रक्त घ्यावे लागते.

रक्तात  वेगवेगळ्या रक्तदात्यांचे रक्त मिसळल्याने हिमोफिलियाच्या रुग्णाच्या रक्तात स्वत:च्या अनुवांशिक  गुणाव्यतिरिक्त इतर रक्तदात्याचे  गुण काही प्रथिन कणांच्या स्वरूपात सापडतील व  अभ्यासता येतील आणि अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रतिजन (अँटीजेन) म्हणजे प्रथिन कणांच्या अस्तित्वामुळे काही रोग प्रतिरोधक प्रतिपिंड (अँटीबॉडी) रक्तात सापडू शकतील, असा ब्लूमबर्ग ह्यांचा कयास होता. त्याप्रमाणे त्यांनी हिमोफिलिया झालेल्या रुग्णाच्या रक्तातील  वेगवेगळ्या प्रतिजनशी इतर व्यक्तीच्या प्रतिपिंडाशी होणारी प्रक्रिया तपासण्याचे ठरवले.

प्रयोगादरम्यान अमेरिकेतील एका हिमोफिलिया रुग्णाच्या रक्तातील प्रतिपिंडाचे नमुने तपासताना, एका ऑस्ट्रेलियन आदिवाशाच्या प्रतिजनबरोबर झालेली अनोखी प्रक्रिया आढळून आली. त्या प्रतिजनला त्यांनी ‘ऑस्ट्रेलिया अँटीजेन’ असे नाव दिले. ऑस्ट्रेलिया अँटीजेन हे प्रथिन कण हिपॅटायटीस-बी विषाणूच्या वरच्या आवरणावर असतात. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात याचा उल्लेख HBsAG म्हणजे हिपॅटायटीस-बी सरफेस अँटीजेन असा करतात. याच ऑस्ट्रेलिया अँटीजेनमुळे हिपॅटायटीस-बी हा आजार होतो हे अनेक प्रयोगाअंती त्यांना आढळून आले आणि १९६७ साली ब्लूमबर्ग ह्यांनी  हिपॅटायटीस-बी या विषाणूचे अस्तित्व जगासमोर आणले.

या शोधामुळे वैद्यकीय जगतात फार मोठी क्रांती झाली. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एर्हविंग मिलमन यांच्या सोबतीने हिपॅटायटीस-बी विषाणू रक्तात शोधण्यासाठी त्यांनी तपासणी तयार केली. त्यानंतर १९७१ पासून रक्तपेढ्यांसाठी, रक्तदात्याच्या रक्ताची तपासणी करून मगच रक्त रुग्णाला देण्याचे नियम तयार झाले. रक्ताद्वारे पसरणाऱ्या या आजारावर त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले.

ब्लूमबर्ग यांचे संशोधन एवढ्यावरच थांबले नाही. ऑस्ट्रेलिया अँटीजेन रक्तात असलेल्या रुग्णाच्या रक्तातूनच हे प्रतिजन वेगळे करून आणि त्यावर विशिष्ट् तापमानावर प्रक्रिया करून हिपॅटायटीस-बी विषाणूसाठी प्रतिबंधक लस बनविली. लस बनविण्याची ही एक नवीन वैज्ञानिक पद्धत होती. हिपॅटायटीस-बी ह्या  विषाणूने बाधा झालेल्या रुग्णाला यकृताचा कर्करोग होण्याची अतिशय जास्त संभावना असते. अगदी एड्सपेक्षाही अधिक मृत्यू हिपॅटायटीस-बीच्या संक्रमणाने झालेल्या यकृताच्या आजाराने झालेले आढळतात.

हिपॅटायटीस-बीच्या प्रतिबंधक लसीकरणामुळे या विषाणूच्या प्रसारावर फार मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले आणि पर्यायाने ह्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता कमीत कमी झाली. अशा प्रकारे कर्करोगावर प्रतिबंधक अशी ही पहिली लस तयार करण्याचे श्रेय ब्लूमबर्ग यांना जाते. या अनमोल शोधासाठी ब्लूमबर्ग ह्यांना १९७६ सालचा वैद्यकीतील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

एवढ्यावर समाधान न मानता ब्लूमबर्ग ह्यांनी लस बनविल्यानंतर ती लस रुग्णांना उपलब्ध करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. लस  तयार करणाऱ्या  अनेक कंपन्यांशी औषधोत्पादनासंबंधी वाटाघाटी केल्या. शेवटी फिलाडेल्फिया जवळील मर्क कंपनीशी करार करून रूग्णांसाठी लस उपलब्ध करून देण्याचे दायित्व स्वीकारले आणि रूग्णांसाठी लस उपलब्ध करून दिली. अगदी शेवटपर्यंत ते कॅलिफोर्नियाच्या नासा लुनार सायन्स सायन्स इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर येथे संशोधन कार्यात सक्रिय होते.

संदर्भ : 

समीक्षक : राजेंद्र आगरकर