कॉख, रॉबर्ट : ( ११ डिसेंबर, १८४३ – २७ मे, १९१० )

रॉबर्ट कॉख यांचा जन्म जर्मनीमधील क्लस्टल या गावी झाला. त्यांना बालपणातच वाचनाची गोडी लागली. जर्मन साहित्यातील काही निवडक पुस्तके त्यांच्या वाचनात आली. ते बुद्धिबळ चांगले खेळत होते. शालेय शिक्षण घेत असतांना त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली. जीवशास्त्रात त्यांना चांगलीच गती होती. १८६६ मध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर गॉटिंगन विद्यापीठाची व्यावसायिक डॉक्टर पदवी ही प्राप्त झाली. वैद्यकीय शिक्षण घेत असतांना त्यांना जेकब हेन्ले यांनी शरीरशास्त्र शिकविले. या प्राध्यापकांचा कॉख यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. डॉक्टर हेन्ले यांनी १८४० मध्ये आपल्या शोधनिबंधात संसर्गजन्य रोगांचे मूळ हे परजीवी जंतू असतात असे म्हंटले होते. हाच धागा पकडून कॉख यांनी भावी आयुष्यात सातत्याने कार्य केले. सैन्यात दोन तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची वैद्यकीय अधिकारी पात्रता परीक्षा दिली आणि १८७२ ते १८८० या काळात वोल्स्टाईन या शहरात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. हे काम करीत असतांना त्यांचे संसर्गजन्य रोगांवरचे संशोधन चालू होते.

वोल्स्टाईन जिल्ह्यात जनावरांमध्ये अँथ्रॅक्स या रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने होत असे. कॉख यांना खरे तर त्यांच्या रोजच्या रुग्णसेवेतून फारसा वेळ मिळत नव्हता तरी त्यांनी वेळात वेळ काढून या रोगावरचे आपले संशोधन सुरु केले. त्यांना प्रयोगशाळा हवी होती म्हणून त्यांनी घराचेच रूपांतर प्रयोगशाळेत केले. त्यांच्या पत्नीने त्यांना सूक्ष्मदर्शक भेट दिला होता त्या भांडवलावर त्यांचे अँथ्रॅक्स संशोधन सुरु झाले. पॉलेन्डर, रेया आणि डावेन या त्रयींनी अँथ्रॅक्स जीवाणू शोधले होते. कॉख यांनी त्यांच्या शिस्तशीर पद्धतीने हेच जीवाणू अँथ्रॅक्ससाठी कारणीभूत आहेत हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने उंदरांवर प्रयोग सुरु केले. अँथ्रॅक्सने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या प्लीहेमधील स्त्राव त्यांनी उंदरांमध्ये लाकडी सुयांच्या सहाय्याने टोचला आणि काही उंदरांच्या शरीरात निरोगी जनावरांच्या प्लीहेतील स्त्राव टोचला. ज्या उंदरांना रोगग्रस्त जनावरांचा स्त्राव टोचला होते ते सर्व पटापट मेले तर दुसऱ्या गटातील उंदीर मात्र निरोगी राहिले. रोगी जनावरांच्या रक्तातून ह्या रोगाचा संसर्ग होतो ह्या निरीक्षणाला त्यांच्या या प्रयोगांनी सबळ पुरावा दिला. पण खुद्द रॉबर्ट कॉख यांचे स्वतःचे मात्र समाधान झाले नव्हते. ज्या अँथ्रॅक्स जीवाणूंचा जनावरांशी कधी संबंध आला नाही त्यांच्यामध्ये रोग निर्माण करण्याची शक्ती आहे की नाही ह्याची त्यांना खात्री करून घ्यावयाची होती.

या अभ्यासासाठी त्यांनी या जीवाणूंना प्रयोगशाळेत वाढविणासाठी बैलाच्या डोळ्यातील स्त्राव वापरून त्यांच्यासाठी खाद्यद्रावण बनविले आणि त्यात अँथ्रॅक्सचे जीवाणू टाकले. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांची वाढ कशी होत आहे याचा त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांचे विभाजन कसे होते याचे फोटो काढले. त्यांच्या असे लक्षात आले की खाद्यद्रावणातील वातावरण जेंव्हा प्रदूषित होते किंवा त्यात पोषण मूल्य उरत नाही किंवा त्याचा सामू बिघडतो तेंव्हा या जीवाणूंची वाढ थांबते आणि या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या पेशी स्वतःचे रूपांतर स्पोअर किंवा कोशासारख्या स्थितीमध्ये करतात. ह्या स्थितीत त्यांच्या अन्न, पाणी आणि हवा हे जीवनावश्यक घटकशून्य होतात आणि वर्षानुवर्षे त्यांच्यातील प्राणतत्व कायम राहाते.

जेंव्हा त्यांना परिस्थिती अनुकूल बनते त्यावेळी या समाधी अवस्थेमधून ते बाहेर येतात आणि पुन्हा त्यांच्या वाढीला प्रारंभ होतो. या जीवाणूंच्या अनेक पिढया प्रयोगशाळेत खाद्य द्रावणात वाढविल्यानंतर देखील त्यांच्यातील रोग निर्माण करण्याची क्षमता अजिबात कमी होत नाही हे त्यांनी ह्याच वाढविलेल्या जीवाणूंमुळे निरोगी जनावरांमध्ये अँथ्रॅक्सचा प्रादुर्भाव होतो हे दाखवून दिले आणि अँथ्रॅक्स रोगासाठी हेच जीवाणू जबाबदार आहेत हे निर्विवादपणे सिद्ध करून दाखविले. त्यांच्या या अथक मेहेनतीची दखल घेण्या साठी कॉन आणि कॉनहाइम यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांचे हे कार्य एका शोधनिबंधाच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचविले. १८७६ मध्ये कॉन यांनी स्वतः संपादित करीत असलेल्या वनस्पतीविज्ञानाच्या नियतकालिकात हा शोध निबंध छापला आणि रॉबर्ट कॉख एकदम प्रकाशात आले. पण त्यामुळे त्यांचे काम अजिबात थांबले नाही. त्यांनी आपल्या जीवाणू वाढविण्याच्या, विविध रंग वापरून त्यांच्या पेशींच्या अभ्यासाच्या आणि सूक्ष्मदर्शकाखाली फोटो घेण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि आपले काम परिपूर्ण कसे होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न चालू ठेवले.

एव्हढे असूनही त्यांच्याकडे प्रयोगशाळा नव्हती. १८८०मध्ये राष्ट्रीय आरोग्य केंद्राचा सदस्य म्हणून नेमणूक झाल्यावर  त्यांना बऱ्यापैकी सोयी असलेली प्रयोगशाळा मिळाली आणि तिचा योग्य वापर करून त्यांनी संशोधन केले व त्यांना  नोबेल पुरस्कार मिळाला.

जीवाणू वाढविण्यासाठी त्यांनी बटाटे, गाजर, रक्त अशा विविध माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पेट्री नावाच्या सहकार्याने या जीवाणू वाढीसाठी जी काचेची डबी बनविली ती आज देखील सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत पेट्री डिश या नावाने वापरात आहे. एखादा जीवाणू एका विशिष्ट रोगासाठी कारण आहे का हे ठरविण्यासाठी रॉबर्ट कॉख यांनी काही गृहीतके निश्चित केली त्यांना कॉख-हेन्ले गृहितके म्हणतात. ही गृहितके खरी उतरली तरच त्या जीवाणूला त्या रोगासाठी जबाबदार धरता येते. याच सुमारास त्यांनी क्षय रोगाच्या जीवाणूंवर काम करण्यास सुरुवात केली आणि १८८२ मध्ये त्यावर एक शोध निबंध प्रसिद्ध केला. १८८३  इजिप्त देशात कॉलरा रोगाची साथ पसरली होती त्याचे संशोधन करण्यासाठी त्यांना जर्मन सरकारतर्फे तिथे पाठविले होते. कॉलरा एक प्रकारच्या स्वल्पविरामासारख्या दिसणाऱ्या जीवाणूंमुळे होतो. त्यांचे नाव व्हिब्रियो कॉलरी असे आहे. त्याचा अभ्यास त्यांनी इजिप्तमध्ये आणि नंतर भारतातील कॉलऱ्याच्या साथीत केला आणि ते जीवाणू प्रयोगशाळेत वाढविण्यात त्यांना यश आले. आपल्या अनुभवावर आधारित कॉलरा प्रतिबंधक प्रणाली त्यांनी सरकारला सादर केली आणि तिचा लगेचच स्वीकार करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासंबंधी नियमही त्यानुसार बनविण्यात आले.

इ.स. १८८५ ते १८९३ या काळात त्यांनी विविध पदांवर काम केले पण ते करतांना त्यांच्या संशोधनात अजिबात खंड पडला नाही. बर्लिनमध्ये संसर्गजन्य रोगांवर संशोधन करण्यासाठी एक नवी संस्था स्थापन करण्यात आली तिचे निदेशकपद त्यांना मिळणे साहाजिकच होते. त्या संस्थेत पॉल अर्लीच, व्हॉन बेहरिंग यासारखे शास्त्रज्ञ काम करायला आले. कॉख यांनी काही दिवस दक्षिण आफ्रिकेत जनावरांच्या बुळकांडी या रोगावर आणि भारतात मलेरिया रोगावर काही संशोधन केले. क्षयावर त्यांचे काम चालूच होते. परंतु क्षय नियंत्रणासाठी ते जे प्रयत्न करीत होते त्यात मात्र त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. पण जनावरांचा क्षय आणि मानवाचा क्षय या रोगांचे जंतू वेगवेगळे असतात हे त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले. याविषयावर बरीच वादावादी झाली होती पण शेवटी कॉख यांचेच म्हणणे ग्राह्य ठरले.  इ. स. १८९९ मध्ये त्यांना मलेरियावर काम करण्यासाठी इटलीमध्ये पाठविण्यात आले. रोनाल्ड रॉस यांचे काम त्यांना अभ्यासता आले आणि मलेरियाच्या विविध प्रकारांचाही अभ्यास तिथे त्यांना करावयास मिळाला.

रॉबर्ट कॉख यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यात हायडलबर्ग आणि बोलोग्ना या विद्यापीठांची सन्माननीय डॉक्टरेट, जर्मनीचा जर्मन ऑर्डर ऑफ क्राऊन, ग्रँड क्रॉस ऑफ जर्मन ऑर्डर ऑफ्रेड इगल्स, ऑर्डर ऑफ रशिया आणि ऑर्डर ऑफ टर्की हे सर्व सन्मान त्यांना मिळाले. १९०५ साली वैद्यकीय क्षेत्रातील क्षयावरील त्यांच्या कामासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

वयाच्या ६६ वर्षी कॉख यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ‘Fellows of the Royal Society’ London Royal Society Archived from the original on 2015-03-16.
  • ID Three profiles Robert Koch.
  • ‘Koch’ Random House Websters`s Unabridged Dictionary.

समीक्षक : रंजन गर्गे