रेडी, फ्रॅन्सिस्को(१८ फेब्रुवारी, १६२६ – १ मार्च, १६९७)

फ्रॅन्सिस्को यांनी शालेय शिक्षण संपवून पिसाविद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली. पिसा येथे अभ्यास करीत असतांना सर विल्यम हार्वे यांची प्रायोगिक सिद्धतेविषयीची मते त्यांना ऐकायला मिळाली होती. इ.स.१६६४ मध्ये त्यांनी व्हायपर सर्पावरची निरीक्षणे या नावाचा प्रदीर्घ शोधनिबंध या अकॅडेमीचे सचिव असलेल्या लॉरेंझो मॅगलेटी यांच्याकडे पाठविला होता. सर्पदंशावर त्यांनी अनेक प्रयोग केले आणि सिद्ध करून दाखविले. जर सर्पदंशामुळे रक्तात विष मिसळले गेले तरच त्याचा परिणाम होतो आणि व्हायपरचे विष पिवळ्या स्त्रावाच्या स्वरूपात असून ते त्याच्या दातांमध्ये साठविलेले असते आणि त्यावेळच्या सार्वत्रिक समजाप्रमाणे सापाच्या पित्ताशयात नसते. सर्पदंशाच्या जखमेकडून हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह जर कापडाने घट्ट बांधून थांबविला तर सापाच्या विषाचा हृदयावर होणार परिणाम टाळता येतो असेही त्यांनी आपल्या प्रयोगांनी सिद्ध करून दाखविले होते. त्यांच्या या प्रयोगांनी प्रायोगिक विषचिकित्सा विज्ञान ह्या शाखेला सुरुवात झाली. रेडी यांनी आपल्या प्रयोगांनी माशी जेंव्हा मांसाच्या तुकड्यावर अंडी घालते तेंव्हाच त्यातून माशा उत्पन्न होतात हे सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी रुंद तोंडाच्या सहा काचेच्या बरण्या घेतल्या. त्यातील दोन बरण्यांमध्ये त्यांनी मेलेले मासे ठेवले, दोन बरण्यांमध्ये मांसाचे तुकडे ठेवले आणि उरलेल्या दोन बरण्यांमध्ये चीज ठेवले. प्रत्येक पदार्थ असलेला तीन बरण्यांचा संच त्यांनीं कसलेही झाकण न लावता उघडा ठेवला तर दुसऱ्या संचातील बरण्यांच्या तोंडाला त्यांनी मलमलीच्या कापडाने बांधून टाकले. ज्या बरण्या उघडया ठेवल्या होत्या त्यात त्यांना अळ्या आणि माशा दिसून आल्या. परंतु बंद ठेवलेल्या बरण्यांमध्ये मात्र अळ्या किंवा माशा नव्हत्या. त्यांच्या दुसऱ्या प्रयोगात त्यांनी बरण्यांचे तीन संच घेतले. त्या सर्व बरण्यांमध्ये त्यांनी मांसाचे तुकडे ठेवले होते. प्रत्येक संचातील एक बरणी उघडी ठेवली होती, दुसऱ्या बरणीला फिरकीच्या झाकणाने घट्ट बंद केले आणि तिसरया बरणीला मलमलीच्या कापडाने घट्ट बांधून ठेवले. उघडया बरण्यांमध्ये माशा आणि अळ्या दिसून आल्या, फिरकीच्या झाकणाने बंद केलेल्या बरण्यांमध्ये अळ्या आणि माशा अजिबात नव्हत्या आणि मलमलीच्या कापडाने बांधलेल्या बरणीच्या तोंडावर वरच्या बाजूला अळ्या होत्या. परंतु त्या आत जाऊ शकल्या नाहीत आणि खायलान मिळाल्यामुळे त्या मरून गेल्या. ज्या बरण्यांची तोंडे फिरकीच्या झाकणांनी बंद केली होती त्यात त्यांनी मेलेल्या माशा आणि अळ्या टाकून त्यांची तोंडे परत तशीच बंद केली. काही दिवसांनी त्यात जिवंत माशा किंवा अळ्या आढळल्या नाहीत. परंतु जेव्हा त्या बरण्यांमध्ये जिवंत अळ्या आणि माशा सोडल्या तेंव्हा त्यांच्यापासून नवीन अळ्या आणि माशांची उत्पत्ती झालेली दिसली. पण आपल्या या प्रयोगांचे निष्कर्ष जाहीर करतांना त्यांनी गॅलिलिओला झालेला त्रास टाळण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक भाषा वापरत, बायबल मधील ऋचांचा आधार घेत ते जाहीर केले. बायबलमध्ये लिहिले आहे की सर्व सजीव हे सजीवांपासून निर्माण होतात. त्यामुळे चर्चचा रोष न घ्यावा लागता त्यांना आपले म्हणणे मांडता आले. इ. स. १६६८ मध्ये त्यांनी लिहिले, ‘जरी मृत प्राण्यांच्या शरीरांमध्ये आणि मृत वनस्पतींमध्ये फार मोठया प्रमाणावर किडे निर्माण होत असले तरी माझा असा पक्का विश्वास आहे की त्यांची उत्पत्ती उस्फूर्त नसून त्यांचे प्रजोत्पादन होत असते.’ त्यांनतर एक दशकांनंतर ल्यूएनहॉक यांनी आणि काही वर्षांनंतर स्वान यांनी आपल्या प्रयोगातून हेच सिद्ध केले आणि शेवटी इ.स. १८६२ मध्ये लुई पाश्चर यांनी या वादावर कायमचा पडदा पाडला. परंतु रेडी यांनी वैज्ञानिक मार्गाने प्रयोगातून ह्याची सुरुवात केली.

रेडी यांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे परजीवी कीटकांवर त्यांनी केलेले संशोधन हे आहे. परजीवी विज्ञान या शाखेची सुरुवात त्यांच्या या अभ्यासाने झाली. ज्या कीटकांचे उत्पादन उस्फूर्तपणे होते असे समजले जात होते अशा जवळजवळ १०० कीटकांच्या प्रजातींचा त्यांनी अभ्यास केला. इ. स. १६८४ मध्ये त्यांनी यावर एक पुस्तक लिहिले, त्याचे नाव होते; प्राण्यांच्या शरीरात राहणाऱ्या सजीव प्राण्यांचा अभ्यास. या पुस्तकात ह्या कीटकांची रेखाटने त्यांनी केली होती आणि ते कुठे सापडतात याचे ही विवेचन केले होते.

रेडी यांनी इटालियन भाषेत मधुशाला या विषयावर बक्कस इन तुस्कान नावाचे खंडकाव्य लिहिले होते. आज देखील ते लोकप्रिय आहे. १७ व्या शतकातील ज्या उत्कृष्ट साहित्यरचना केल्या गेल्या त्यातील हे खंडकाव्य एक उत्तम लिखाण समजले जाते. कवी आणि वैज्ञानिक ह्या दोन्ही क्षेत्रातील सृजनशीलता रेडी यांच्या जवळ होती.

रेडी यांचे पिसा येथे राहत्या घरी झोपेतच प्राणोत्क्रमण झाले.

संदर्भ :

  • Leikola A (1977-78) ‘Fransesco Redi as a pioneer of experimental biology’ Lychnos LardomshistsamfArsb 1977-78 (103) 115-122 PMID 11628017.
  • Redi, Fransesco, Encyclopedia Britannica. Inc Retrieved 22 October, 2013.

समीक्षक : रंजन गर्गे