गोमाटोस, पीटर जे. : ( १३ फेब्रुवारी, १९२९ )

पीटर गोमाटोस यांचा जन्म केंब्रिज, इंग्लंड येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी केंब्रिज रिंज व लॅटीन स्कूलमध्ये घेतले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी बी.एस.ची पदवी घेतली. पुढे जॉन हॉपकिन्स विद्यापीठात प्रवेश मिळवून ते एम.डी. झाले. रुग्णालयात सहायक म्हणून काम केल्यावर अमेरिकन नौदलात मेडिकल ऑफिसर या नात्याने त्यांनी सेवा दिली. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलचे काम केले. रॉकफेलर विद्यापीठातून त्यांना पीएच.डी. मिळाली आणि ते संशोधक या पदावर राहिले. प्रसिद्ध स्लोन केटरिंग इन्स्टिट्यूट येथे प्राण्यामधील विषाणूंच्या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून ते नियुक्त झाले. अमेरिकन लष्करात वेगवेगळ्या पदावर ते कार्यरत होते. सहायक संचालक या नात्याने त्यांनी एडस् रोगावर संशोधन केले. संसर्गजन्य व ॲलर्जीला कारणीभूत असणारे रोग यांवर संशोधन करणाऱ्या संस्थेचे सल्लागार अशी पदे त्यांनी भूषविली.

प्राण्यांच्या तसेच मानवांच्या श्वासनलिकेत आढळणाऱ्या रिओव्हायरस (या विषाणूत दुहेरी धाग्यांचे आरएनए असते, सहसा आरएनए एकेरी धाग्याचे असते) या विषाणूवर गोमाटोस यांनी इगॉरटॅम (१९२२-१९९५) यांच्याबरोबर १९६० पासून संशोधन करण्यास सुरुवात केली. १९६३ मध्ये त्यांना शोध लागला की या विषाणूच्या जनुकीय घडणीत दुहेरी धाग्यांचे आम्ल रायबोन्युक्लीइक ॲसिड (RNA) आहे याची नोंद त्यांनी प्रथमच केली. नंतर झाडांमधील गाठींमध्येही त्यांना दुहेरी धाग्यांचे आम्ल आढळून आले. रिओ विषाणूंच्या प्रतिकृतींवर मोठ्या प्रमाणात त्यांनी रॉबर्ट लॅन्डरिच यांच्यासह संशोधन चालू ठेवले. एक्सरे स्फटिकीकरण करून त्यांनी आम्लाची त्रिमितीय (३डी) रचना मांडून परीक्षण केले. ही पद्धत वापरून इतर संशोधकांनी रोग निर्माण करणारी विषाणूंची जनुकीय रचना दुहेरी धाग्यांच्या आम्लाने बनलेली असते हे सिद्ध केले. या आम्लाचा उपयोग पेशी रोगप्रतिकार प्रथिन इंटरफेरॉन बनवण्यासाठी करतात व विषाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. ही उपचार पद्धत यकृताचा आजार व मल्टिपल स्क्लेरोसिस यासाठी वापरली जाते. पेशींच्या अंतर्गत क्रियेचे नियमन करणे व आम्लाची निर्माण झालेली छोटी दुहेरी धागे असलेली प्रतिकृती त्या क्रियांना प्रतिबंध करते. याचा उपयोग आनुवंशिकतावाहक जनुकांचे नियमन व इतर रोगांचे निवारण करण्यासाठी होऊ शकतो असा विचार त्यांनी मांडला.

रॉकफेलर फाउंडेशन, स्लोन केटरिंग इन्स्टिट्यूट, अमेरीकन आर्मी व नेव्ही या मान्यताप्राप्त संस्थेत सल्लागार आणि उच्चपदावर त्यांनी काम केले. ग्रीक चर्चमधील कारभारी, पाश्चात्य संगीत नाटक (ऑपेरा) व कलेचा जाणकार आणि बॉस्टन येथील  फुटबॉल संघाचा प्रेमी म्हणून त्यांची ख्याती होती.

द गोमाटोस कलेक्शन हे पीटर गोमाटोस यांनी आपल्या मातापित्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मेरी माउंट विद्यापीठातील इमर्सन राइश (Emerson Reinsch) या ग्रंथालयास भेट दिली.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे