कर्णिक, मधु मंगेश : ( २८ एप्रिल १९३१). प्रसिद्ध मराठी साहित्यिक. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कर्णिकांनी गेल्या सहा-सात दशकात सातत्यपूर्ण लेखन करून साठोत्तरी कालखंडात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या समृद्ध आणि वाड्मयीन व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी व ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र व आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले. त्यांचे कथा आणि कादंबरी वाड्मयप्रकारातील योगदान लक्षणीय आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध स्तरातील साहित्य आणि संस्कृती विषयक संस्थांवर त्याने सातत्याने आणि कृतिशील कार्य केले आहे. साहित्यनिर्मिती आणि साहित्यविषयक कार्यामुळे त्यांना बरीच लोकप्रियता लाभली आहे.

मधू मंगेश कर्णिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करुळ गावचे. त्यांचे मूळ नाव आरस. कर्णिक ही त्यांच्या पूर्वजांना इंग्रजांनी दिलेली सनद. त्यावरून त्यांचे नाव कर्णिक पडले. अन्नपूर्णाबाई कर्णिक यांच्या पोटी मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म झाला .त्यांचे वडील ब्रिटिशांच्या काळात खोत होते. ते सातव्या इयत्तेपर्यंत शिकले होते. मधु मंगेश कर्णिक चार वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी आईचे निधन झाले. परिणामी त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागले. कर्णिक कुटुंबातील दहा अपत्यांपैकी मधु मंगेश कर्णिक नवव्या क्रमांकाचे होते. त्यांचे शालेय शिक्षण करूळ कणकवलीत झाले .तेव्हा त्यांच्यावर मोडक व साळवी मास्तरांचा विशेष प्रभाव पडला. कणकवली येथील माध्यमिक विद्यालयातून ते १९५१ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. कोकणातील जैतापूर जवळील विजयदुर्ग बंदर या ठिकाणी परिवहन खात्यात लेखनिक म्हणून त्यांच्या नोकरीस आरंभ झाला (१९५२).
१९५३ साली त्यांची विजयदुर्गहुन कोल्हापूरला आणि १९५६ मध्ये त्यांची मुंबईला बदली झाली. मुंबईतील अनुभवामुळे त्यांच्या लेखनाचा परिघ विस्तारत गेला. ५ सप्टेंबर १९६६ रोजी गोवा प्रशासनामध्ये कर्णिकांना प्रसिद्धी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. १९६६ साली महाराष्ट्राच्या मंत्रालयात कर्णिक साहाय्यक प्रसिद्धी संचालक म्हणून नियुक्त झाले. १ एप्रिल १९७३ रोजी कर्णिक महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे मॅनेजर झाले, पुढे तेथेच जनरल मॅनेजर पदावर आरूढ झाले. ३० सप्टेंबर १९८३ रोजी स्वेच्छेने त्यांनी राजीनामा दिला.

कर्णिक यांच्या साहित्यनिर्मितीचा आरंभ शालेय जीवनापासून झाला. ते इंग्रजी चौथीत असताना मालवणच्या पारूजी नारायण मिसाळ यांच्या बाल सन्मित्र  पाक्षिकात त्यांची पहिली कविता छापून आली. त्यापासून प्रेरणा घेऊन मधू मंगेश कर्णिक लिहू लागले. १९५१ साली रत्नाकर  या साप्ताहिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे नाव कृष्णाची राधा‌. विजय तेंडुलकर संपादित वसुधा  मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. मुंबईवरून निघणाऱ्या कथासृष्टी  मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. १९५५ च्या कथा सृष्टीच्या दिवाळी अंकात पैंजण  नावाची त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली. मात्र ती पुढे प्रकाशित झाली नाही. मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखणीचा झपाटा इतका विलक्षण होता‌ की त्याकाळी बहुतेक दिवाळी अंकात त्यांची कथा वाचायला मिळत असे. त्यांच्या मनावर व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशी माणसं  या कादंबरीचा फार मोठा प्रभाव पडला. त्या धर्तीवर मालवणी मुलखातील कोकणी माणसाला कर्णिकांनी शब्दरूप दिले. १९५८ साली मालवणच्या मराठी साहित्य संमेलनात पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते कोकणी गं वस्ती  या पहिल्यावहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना चांगल्या कथाकाराच्या पंक्तीत नेऊन बसवले. त्यानंतर वाड्मयशोभा, किर्लोस्कर, वसंत ,वसुधा, सत्यकथा  या मासिकामध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

मधु मंगेश कर्णिक यांची साहित्य संपदा : कथासंग्रह – कोकणी गं वस्ती (१९५८), पारध (१९६०), तोरण (१९६३), मंत्र (१९६३), भुईचाफा (१९६४), मांडव (१९६४), गुंजा (१९६५), संकेत (१९६६), तहान (१९६६), डोलकाठी (१९६६), झुंबर (१९७२), केवडा (१९७२), गवळण आणि इतर कथा (१९७४), पुरुष सूक्त (१९७४), चंद्रोदय (१९७८), देवकेळ (१९७८), काळे कातळ तांबडी माती (१९७८), प्रतिमा (१९८०), उत्तरायण (१९८०), अनिकेत (१९८०), गावाकडच्या गजाली (१९८१), काळवीट (१९८२), लामण दिवा (१९८३), अभिषेक (१९८३), मनस्विनी (१९८३), दरवळ (१९८४), चटक चांदणी (१९८५), कमळण (१९८७), कळस (१९९०), स्पर्श उत्कटाचे (१९९०), समर्पण (१९९२), पुण्य भोवरा (१९९३), स्वर अमृताचा (१९९४), त्रिवार (१९९४), कॅलिफोर्नियात कोकण (१९९६) क्षितिज (१९९६), पांघरूण(२००१), किरणपाणी (२००२), सुरस आणि चमत्कारिक कथा (२००६) कोळा सूर्य (२००८); कादंबरी – देवकी (१९६२), सूर्यफूल (१९६६), माहिमची खाडी (१९६९), सनद (१९८६), कातळ (१९८६), वारूळ (१९८६), निरभ्र (१९९७), जुईली (१९८५), संधिकाल (२००१); ललित लेखन सोबत १९६२), जिवाभावाचा गोवा (१९८६), माझा गाव माझा मुलुख (१९९०), नैऋत्येकडचा वारा (१९९०), विहंगम (२००७), हृदयंगम (२००७); व्यक्तिचित्रेलागेबांधे (१९६५), अबीर गुलाल (१९९०); बालसाहित्य जगन्नाथ आणि कंपनी (१९९३), शाळेबाहेरील सौंगडी (१९९३), चिमणचारा (२००२). तसेच त्यांचे वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित दूत पर्जन्याचा हे चरित्र प्रसिद्ध आहे. तर करुळचा मुलगा  हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय काही दूरदर्शन मालिका, मराठी हिंदी चित्रपटांच्या पटकथा, आकाशवाणीवरील नभोनाट्ये, श्रुतिका, भाषणे, अनुवाद, स्तंभलेखन यातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. लघुउद्योग  ह्या मासिकाचे संपादन त्यांनी केले आहे. लघुउद्योग विषयी चार ग्रंथ आणि लघुउद्योग  नावाचे पुस्तकही यांच्या नावावर आहे.

मधू मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी ,भाकरी आणि फूल  व संधिकाल  या कादंबऱ्या मराठी कादंबरी परंपरेत महत्त्वाच्या ठरतात. माहिमची खाडी  या कादंबरीद्वारे मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचे भणंग जीवन दर्शन घडवले तर भाकरी आणि फूल मधून दलित मानसिकतेत दर पिढी गणिक विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीत पडत जाणारा फरक नेमकेपणाने अधोरेखित केला. संधिकाल मधून कोकण आणि मुंबई मध्ये होत असणाऱ्या बदलांच्या संवेदना आरस या कुटुंबाला मध्यवर्ती ठेवून अचूकरित्या टिपल्या आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही प्रकारात कर्णिक समरसून लिहीत होते. मानवी व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण, मनुष्यस्वभावाचे अचूक ज्ञान, कमालीचा आत्मविश्वास, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, सदैव हसतमुख, जन्मजात प्रतिभा आणि समृद्ध अनुभवविश्व या कारणामुळे कर्णिकांच्या कथात्मक लेखनात मानवी जीवन आणि निसर्ग निर्मितीबद्दलच कुतूहल प्रकटले आहे. अनेक जातीची, धर्माची, पंथाची माणसे त्यांच्या कादंबरीत पहावयास मिळतात. नातेसंबंधातील गुंतागुंत, नियतीशरणता, मन आणि देहबोलीतील उत्कटता, दरिद्री भुकेकंगाल माणसाबद्दलची करुणा, परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष त्यांच्या कथात्मक साहित्यात पहावयास मिळतो. महानगर आणि ग्रामीण जीवन म्हणजेच मुंबई आणि कोकण हे कर्णिकांच्या लेखनाचे केंद्र राहिले आहे तसेच जीवन अनुभवातील विविधता हे त्यांच्या वाड्मयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कथात्मक साहित्य बरोबरच त्यांनी ललित गद्य लेखन केले आहे.लागेबांधे आणि अबीर गुलाल या व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथातून कोकणी माणसाचे सचित्र दर्शन घडते. जगन्नाथ आणि कंपनी ,शाळेबाहेरील सौंगडी, चिमणचारा  लिहून त्यांनी बालसाहित्यात हजेरी लावली आहे. तर देवकी,केला तुका झाला माका  या नाटकातून वेगळ्या जीवन अनुभवाचे दर्शन घडवले. शब्दांनो मागुते या  हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. करुळ गावाबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आहे‌. ‌त्या प्रेमाला त्यांनी करुळचा मुलगा  या आत्मचरित्र मध्ये शब्दबद्ध केले आहे.

मधू मंगेश कर्णिक यांचा पिंड जसा साहित्यिकाचा आहे. तसाच तो सामाजिक सांस्कृतिक कार्यकर्त्याचाही आहे. कोकणी माणूस आणि कोकणी मुलुख हा त्यांच्या निष्ठेचा विषय आहे. या निष्ठेतून कोकण मराठी साहित्य परिषद, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, केशवसुत स्मारक, कोकण कला अकादमी अशा कितीतरी चांगल्या गोष्टी निर्माण केल्या. रत्नागिरी येथे भरलेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे (१९९०). अस्मितादर्श साहित्य मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार तोरण(१९६४), तहान (१९६६), माहिमची खाडी (१९६९); मॅजेस्टिक पुरस्कार, मॅग्नम फौंडेशन पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार गंगाधर गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

संदर्भ :

  • केळूसकर, महेश (संपा.), मधू मंगेश कर्णिक: सृष्टी आणि दृष्टी, मौज प्रकाशन, मुंबई.
  • खरात, महेश, मधू मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्व आणि वाड्मयीन कर्तृत्व, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२.