आपटे, नारायण हरि : (११ जुलै १८८९ – १४ नोव्हेंबर १९७१). सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारक, संपादक, छापखानदार, प्रकाशक, मनोविश्लेषक, चित्रपट- पटकथाकार, वक्ते आणि समाजसुधारक, प्रतिभावान व सर्जनशील लेखक असे अनेक पैलू आहेत. बालांपासून वृद्धांना भावेल असे चतुरस्त्र लिखाण त्यांनी केले आहे. सांगली जवळील समडोळी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आष्टा, समडोळी तर माध्यमिक शिक्षण सातारा येथे न्यू इंग्लीश स्कूल येथे झाले. व्हर्नाक्युलर पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी क्रांतिकार्य करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी घर सोडले आणि ब्रिटीशकालीन उत्तर भारताची भ्रमंती केली. त्यांचे वास्तव्य जयपूर येथे १९०७ ते १९१२ यादरम्यान होते. त्यांनी राजस्थान मधील थोर क्रांतिकारक अर्जुनलाल सेठी यांनी स्थापना केलेल्या श्री वर्धमान विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम केले. जयपुर मध्ये असताना रासबिहारी बोस यांच्याशी ते सशस्त्र बंडाची खलबते करीत असत. त्यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यांनी नव्वदहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून, लघुकथा, इतिहास, बाल-किशोर साहित्य इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले आहेत.

सामाजिक, कौटुंबिक जीवन, स्त्री जीवनातील प्रश्न यासारखे विषय त्यांच्या कादंबरीलेखनातून प्रतीत होतात. दुरंगी दुनियेत (१९२२), न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५), कोणी कोणाचे नव्हे (१९५१) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. पिसाच्चसाधन (१९२०), हृदयाची श्रीमंती (१९२०), वैभवाच्या कोंदणात (१९२५), भाग्यश्री (१९२६), अजरामर (१९४९), असा अद्भुतरम्य कादंबरीप्रकारही त्यांनी हाताळला आहे. तर बालवाङ्मयात बाळांचे बाळ, महात्मा मोहन, बोलकी बाहुली, फुलराणी, बागेतील कारंजे, मी मोठा होणार, विचित्र ही वसुंधरा, आफ्रिकेच्या जंगलात अशा १६ छोट्या पुस्तकांचे योगदान त्यांनी दिले आहे. आराम – विराम (१९३४) आणि बनारसी बोरे (१९३२) हे त्यांचे लघुकथासंग्रह आहेत. याशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मंगलम् (१९४९) यासारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नाती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी अमेरिकेचा इतिहास आणि पंजाबचा लढवय्या शीख अशी इतिहास विषयक ग्रंथही निर्माण केले आहेत. आपटे यांनी आपण आहो माणसे (वैचारिक मनोविश्लेषणात्मक कादंबरी,१९४५) आणि देशसेविकेचे रहस्य (१९३२) या प्रयोगशील कादंबऱ्यांचे लेखन केले आहे.

किर्लोस्कर खबर या नियतकालिकाचे ते सात वर्ष सहसंपादक होते. आल्हाद आणि मधुकर या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. वाचकांचे नुसते मनोरंजन न करता, त्यांच्या मनावर योग्य आणि कालानुरूप संस्कार करणे तसेच जागृत राहून स्वयंप्रेरणेने स्वत:वरील व राष्ट्रावरील संकट ओळखून वागले पाहिजे आणि समाजाला जाणीव करून देणे हे आपटे यांनी स्वतःच्या लिखाणाचे ध्येय मानले आहे. त्यांची लेखनशैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे. लेखक हा वाचकाचा सन्मित्र असावा अशीच आपटे यांच्या लेखनाची बैठक होती. त्यांचा दृष्टिकोण प्रामुख्याने उपदेशप्रधान आहे. कथेची भाषा अत्यंत साधी, संवाद आणि प्रसंगही जेमतेमच असून क्वचित विनोद त्यांनी केलेला दिसतो. त्यांच्या अकरा कादंबर्‍यांवरून मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट काढण्यात आले आहेत.

नारायण हरी आपटे यांनी वडोदरा (बडोदा) येथे भरलेल्या मराठी वाङ्मय परिषदेच्या (१९३३) तिसऱ्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, पुणे येथे भरलेल्या दहाव्या शारदोपासक संमेलनाचे (१९४१) अध्यक्ष तर सातारा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९६२) स्वागताध्यक्ष ही पदे भूषविली आहेत. कर्मगावी कोरेगाव येथे ते निवर्तले.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा; टाकळकर, उषा; डहाके, वसंत, आबाजी; दडकर, जया, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड), मुंबई ,२००४.