क्रॅमर पॉल जॅक्सन : ( ८ मे, १९०४ – २४ मे, १९९५ )
क्रॅमर यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना राज्यातील ब्रूकविल येथे झाला. वनस्पतीशास्त्रातील डॉक्टरेट त्यांनी १९३१ मध्ये ओहायो विद्यापीठातून मिळविली. त्याच वर्षी ड्यूक विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होऊन तेथेच ते काम करीत राहिले आणि १९७४ मध्ये तेथून निवृत्त झाले. ड्यूक विद्यापीठात त्यांना जेम्स बी. ड्यूक (James B. Duke) प्रोफेसर हे सन्माननीय प्राध्यापक पद लाभले.
वनस्पतींची मुळे जमीनीतून पाणी घेतात त्यासाठी पानांमध्ये निर्माण होणारा ऋण दाब कारणीभूत असतो असे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग आजही मान्यता पावलेले आहेत. मुळाचा अग्रभाग मूळकेसांनी आच्छादलेला असतो. मूळकेसांच्या टोकाच्या मागे असलेला भाग पाणी शोषून घेतो हे त्याचे मत होते. खोडाच्या काष्ठ ऊतीमध्ये निर्माण झालेला ऋण दाब पानांमध्ये निर्माण होतो, त्यासाठी बाष्पोत्सर्जन महत्त्वाचे आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. याचा परिणाम म्हणून पाणी पानांपर्यंत खेचले जाते.
नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे फेलो आणि ऑस्ट्रेलियन अकॅडेमी ऑफ सायन्सचे क्रॅमर सभासद होते. अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीने त्यांचा जगप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच वनस्पतीतील पाण्याच्या मूलभूत संबधावरचा जगन्मान्य नेता म्हणून गौरविले. ड्यूक विद्यापीठात क्रॅमर यानी फायटोट्रॉन उभे करावे यासाठी अमेरिकन शासनाकडे पाठपुरावा केला. एका मोठ्या इमारतीत असलेल्या मोठ्या खोल्यांमधून वालुकामय प्रदेशापासून वर्षा वनांपर्यंत सर्व परिसरातील वातावरण कृत्रिमरित्या बनवता येईल अशी सोय या फायटोट्रॉन मध्ये केली आहे. या कृत्रिम वातावरणात वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करता येतो.
क्रॅमर यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेसचा सेवा पुरस्कार मिळाला होता. बायॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेचा मेरीट पुरस्कार, सोसायटी ऑफ अमेरिकन फॉरेस्टर जीवनगौरव पुरस्कार आणि अमेरिकन सोसायटीचे बार्न्स आजीव सदस्यत्व असे काही अन्य गौरव मिळाले आहेत. त्याशिवाय नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ, मियामी विद्यापीठ, ओहियो विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठांच्या मानद पदव्या त्यांना देण्यात आल्या आहेत.
उत्तर कॅरोलिनामधील चॅपेल हिल येथे त्यांचे निधन झाले.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा