टीनबर्गेन, निकोलस : ( १५ एप्रिल, १९०७ – २१ डिसेंबर, १९८८)

निकोलस टीनबर्गेन यांचा जन्म नेदरलँडमधील हेग (Hague) शहरामध्ये झाला. त्यांचे वडील इतिहास आणि डच भाषेचे शिक्षक होते तर आई गृहिणी होत्या. शैक्षणिक वातावरण असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेपासून त्यांना निसर्ग आणि प्राणी आवडत असत. प्रारंभी त्यांनी मासे आणि पक्षी यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना जीवशास्त्रात आवड निर्माण झाली. निकोलस यांना तत्कालीन औपचारिक अभ्यासक्रम आवडत नसे. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर निकोलस यांनी वोगेलवर्ट रोझीटेन (Vogelwarte  Rossitten) पक्षीनिरीक्षण संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

संस्थेचे संस्थापक जे. थीयेनमन यांच्याकडून उत्तेजन मिळाल्यामुळे निकोलस यांनी प्रगत जीवशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी लायडन (Leiden) विद्यापीठात प्रवेश घेतला. लायडन विद्यापीठातून १९३२ साली त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळवली. मधमाशी खाणार्‍या गांधील माशीच्या वर्तनावर त्यांचा प्रबंध होता. प्रयोगाद्वारे गांधील माशी हालचालीसाठी कांही खुणांचा वापर करते हे त्यांनी सिद्ध केले.

नेदरलँड सरकारकडून त्यांना पत्नीसोबत १९३२-१९३३ साली आंतरराष्ट्रीय ध्रुवीय प्रदेशाच्या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. एस्किमो जमातीबरोबर काही महिने राहताना त्यांनी स्नो बंटींग्जव फॅलोरोप्स पक्ष्यांचा तसेच एस्किमो वापरीत असलेल्या बर्फावरून चालणार्‍या स्लेज डॉग्ज म्हणजे बर्फावर घसरगाड्या ओढणार्‍या कुत्र्यांच्या वर्तनांचा अभ्यास केला. ध्रुवीय प्रदेशाच्या मोहिमेनंतर त्यांना लायडन विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळाली. इथे ते तौलनिक शरीररचनाविज्ञान (Comparative Anatomy)  शिकवत असत. पदवीपूर्व वर्गांसाठी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यासक्रम त्यांनी तेथे  सुरू केला.

नैसर्गिक परिस्थितीतील प्राण्यांच्या वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ कॉनरॅड लॉरेन्झ यांना १९३६ साली एका छोटया परिषदेसाठी सहज प्रवृत्ती किंवा उपजत ज्ञान या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. टीनबर्जन आणि लॉरेन्झ यांची ओळख त्यावेळी झाली. त्यानंतर दोघांनी मिळून नैसर्गिक परिस्थितीत रहाणाऱ्या प्राण्यांच्या वर्तनांचा आराखडा तयार केला. तत्कालीन संशोधन क्षेत्रांतील हे नवीन शास्त्र होते. दोघांनी मिळून प्राण्यांच्या वर्तनांची अनेक गृहितके मांडली. आधी प्रशिक्षण दिलेल्या प्राण्यांना जगण्यासाठी या वर्तनांचा अधिक उपयोग होतो हे त्यांनी सिद्ध केले.

दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी टीनबर्गेन यांना जर्मनीमध्ये दोन वर्षांसाठी कैदेची शिक्षा झाली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना प्राण्यांच्या वर्तनांवर व्याख्याने देण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बोलाविण्यात आले. निकोलस इंग्लंडमध्ये राहण्यास गेले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्याते म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी १९५१ साली उपजत प्रेरणांचा अभ्यास  (‘The Study of Instinct’) या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. अनेक प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये सांकेतिक खुणांचा वापर कसा विकसित झाला असावा याची माहिती या पुस्तकात आहे. त्यांच्या संशोधनामुळे नैसर्गिक परिसरातील प्राण्यांच्या वर्तनांचा मूलभूत अभ्यास चालू झाला.

त्यांची १९६६ साली ऑक्सफर्ड वोल्फसन (Oxford Wolfson) कॉलेजमध्ये प्रोफेसर तसेच सन्माननीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याठिकाणी त्यांनी लहान मुलांमध्ये येणारी ‘मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता’ या विषयावर अभ्यास केला. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये The Herring Gull’s World, Curious Naturalists, The Animal in its World Vol.1 आणि The Animal in its World, Vol.2 यांचा समावेश आहे .

हयूज फालकस (Hugh Falkus) या निर्मात्याबरोबर त्यांनी वन्यप्राण्यांच्या जीवनावर अनेक चित्रफिती निर्माण केल्या आहेत. त्यांच्या Signal For Survival, Italia आणि American Blue Ribbon या चित्रफितींस पारितोषिके मिळाली. शास्त्रीय दृष्टीकोनातून लहान मुलांसाठी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे लेखक म्हणून निकोलस प्रसिद्धीस आले. Kleew आणि The Tail of John Stickle ही दोन पुस्तके विशेष प्रसिद्धीस आली. प्राण्यांच्या वर्तनांवर केलेल्या महत्त्वाच्या संशोधनामुळे निकोलस टीनबर्गेन हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे या संदर्भातील संशोधन मानवासाठीसुद्धा उपयोगी पडते.

मधमाशीच्या संपर्क भाषेच्या अभ्यासाबद्दल निकोलस टीनबर्गेन, कार्ल वॉन फ्रीस्क, आणि कोनार्ड लॉरेन्झ या तिघांना मिळून शरीरक्रियाविज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील १९७३ सालचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Nikolaas Tinbergen |Dutch Zoologist| Britannica.com.
  •  Nikolaas Tinbergen, Biography, Childhood, life.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा