पेट्रोलियम खनिज तेलाचे ऊर्ध्वपातन होताना सहसा न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर होतो. अर्थात हा अवशिष्ट घटक काही प्रमाणात ऊर्ध्वपातित भागात मिसळून वापरला जातो. त्यांच्या काळ्या रंगावरून त्यांना कृष्ण इंधने म्हणून संबोधिले जाते. शेती व्यवसायात आणि औद्योगिक क्षेत्रात ही कृष्ण इंधने मोठ्या प्रमाणात वापरली जातात, कारण ती तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असतात. काळ्या तेलांचा ज्वलनबिंदू उच्च असतो व त्यांचा भडका बिंदू ६६० से. च्या वर असल्याने ते पेट्रोलियम पदार्थाच्या ‘क’ वर्गात मोडतात.
लाइट डीझेल ऑइल (एलडीओ) : डीझेल तेलात लाइट डीझेल ऑइल हा एक प्रकार आहे. हे कृष्ण इंधन वर्गातील मिश्रण असते. शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या पंपसेट या इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जी यंत्रे प्रति मिनिटाला ७५० पेक्षा जास्त भ्रमणे (आरपीएम) करतात, त्यांच्यासाठी डीझेल तेल वापरतात. तर मिनिटाला ७५० पेक्षा कमी भ्रमणगती असलेल्या यंत्रांसाठी साधारणत: एलडीओ इंधन वापरले जाते. अवशिष्ट घटकाच्या अंशामुळे या काळ्या तेलाचा जाडसरपणा डीझेलपेक्षा जास्त असतो. उच्च वेगी (High speed) डीझेल तेलाची विष्यंदता ४०० से.ला २ – ७.५ सेंटीस्टोकच्या दरम्यान असते, तर एलडीओ या इंधनाची २.५ — १५.७ सेंटीस्टोकपर्यंत असते.
फरनेस ऑइल (एफओ) : हे देखील कृष्ण इंधन होय. त्याची निर्मिती खनिज तेलातून उरलेल्या जाड चोथ्यापासून करतात. त्याला फ्युएल ऑइल किवा बंकर ऑइल असेही संबोधितात. या तेलात काही प्रमाणात एलडीओ इंधनाचा भाग असतो. साधारणत: उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी या इंधनाचा वापर होतो.
फरनेस ऑइलचा वापर मुख्यत: प्रक्रिया कारखाने (Process industries) व उष्णता ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये (Thermal Power Station) वाफ निर्मितीसाठी करतात. वीट, सिमेंट, चुना, काच तसेच धातू हाताळणाऱ्या कारखान्यातील भट्टीत देखील या इंधनाचा वापर होत असतो. हळू गतीने चालणाऱ्या बोटीतील एंजिनाचे जनित्र (Generator) या इंधनावर कार्यरत करता येतात. चहानिर्मिती करताना ‘इनडायरेक्ट फायरिंग’साठी, गॅस टर्बाइनमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी तसेच खते तयार करण्यासाठी सुध्दा या इंधनाचा वापर होत असतो. हे इंधन जळताना, हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यातील गंधकाचे प्रमाण कमी ठेवावे लागते. ते जळून गेल्यावर त्याची अवाजवी राख बनली तर ती बर्नरच्या टोकावर जमा होऊन त्याची छिद्रे बुजू शकतात. त्यासाठी इंधनाच्या ज्वलनाने तयार होणाऱ्या राखेचा अंश नियंत्रित ठेवावा लागतो.
फरनेस ऑइल वर्गीकरण : फरनेस ऑइलच्या जाडपणावरून त्याचे चार भाग पडतात. कमी विष्यंदता/Viscosity (५०० से. ला जास्तीत जास्त ८० सेंटीस्टोक), मध्यम विष्यंदता – १ (८० —१२५ सेंटीस्टोक), मध्यम विष्यंदता – २ (१२५ — १८० सेंटीस्टोक) आणि उच्च विष्यंदता (१८० — ३७० सेंटीस्टोक) असे ते वर्गीकरण असते. या चार प्रकारच्या इंधनात गंधकाचे प्रमाण अनुक्रमे ३.५, ४, ४ आणि ४.५ टक्के इतके असे असते. त्यामुळे गंधकाचे कमी प्रमाण (१ टक्का) असलेले ‘लो सल्फर हेवी स्टॉक’ (एलएसएचएस) हे पर्यायी कृष्ण तेल वापरले जाते. त्यास ‘हेवी पेट्रोलियम स्टॉक’(एचपीएस) असेही म्हटले जाते. हे नाव आपल्या देशातील मथुरा तेलशुध्दिकरण कारखान्यात निर्मित होणाऱ्या इंधनास दिले गेले आहे.
आपल्या देशामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस (ओएनजीसी) या तेल उत्खनन कंपनीतर्फे उपसल्या जाणाऱ्या खनिज तेलात या पर्यायी इंधनाचा अंश मोठ्या प्रमाणात आढळतो. रेसिड्युएल फुएल ऑइल, हॉट हेवी स्टॉक, फर्टिलायझर फीड स्टॉक असेही या पर्यायी इंधनाला संबोधिले जाते. हे इंधन प्रामुख्याने भट्ट्यांसाठी वापरले जाते. ते कमी गंधकयुक्त असल्याने पर्यावरणस्नेही ठरते. तसेच त्याच्या वापराने धातूच्या भट्ट्यांचे गंजण्यापासून रक्षण होते. परंतु त्याच्या जाडसर स्वरूपामुळे वातावरणाच्या सर्वसाधारण तापमानाला ते घट्ट बनते आणि ते प्रवाही करण्यासाठी तापवावे लागते.