मिश्रा, रामदेव : (२६ ऑगस्ट, १९०८ – २५ जून, १९९८)

भारतातील परिस्थितीकी विज्ञानाचे जनक मानले जाणारे रामदेव मिश्रा यांचे शालेय शिक्षण वाराणसीतील केंद्रीय हिंदू विद्यालय आणि उच्च शिक्षण बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे झाले. सन १९३७ मध्ये त्यांनी लीड्स विद्यापीठातून ‘इकलॉजी ऑफ ब्रिटीश लेकस्’ या विषयात डब्ल्यू. एच. पिअर्साल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. मिळवली.

भारतात परतल्यावर त्यांनी भागलपूर, वाराणसी आणि सागर येथील विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन करुन देशात पारिस्थितिकी (Ecology) या विषयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इतर विद्यापीठात जाऊन पारिस्थितीकी या विषयाची सुरुवात करून दिल्याने देशात पारिस्थितीकीबद्दल जाणीवजागृती निर्माण होण्यास मदत झाली. सैन्याच्या वसाहतीपासून संशोधनास सुरुवात करून त्यांनी गवताळ प्रदेश, वने, तलाव, महत्त्वाचे वृक्ष व झुडपे यावर संशोधन केले. प्रत्यक्ष निरीक्षणाबरोबरच प्रायोगिक संशोधनावर प्रथमपासून भर दिला. देशांतील पहिला फायटोट्रोन (प्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादीचे प्रमाण नियंत्रित ठेवता येणारी प्रयोगशाळा) उभारला. त्यांनी साठ विद्यार्थ्याना पीएच्.डी.साठी मार्गदर्शन केले आणि शंभरावर संशोधन निबंध प्रसिद्ध केले. काउन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सी.एस.आय.आर), युनिव्हर्सिटी ग्रांटस कमिशन (यू.जी.सी), पी. एल 480  यांनी पुरस्कृत केलेल्या अनेक प्रकल्पांचे त्यांनी संचालन केले.

मिश्रा यांनी विषुववृत्तीय परिसंस्थांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन केले. विषुववृत्तीय वने,  गवताळ  प्रदेश, तलाव व सरोवरे या परिसंस्थावरील त्यांचे संशोधन पथदर्शी ठरले. या परिसंस्थानची प्राथमिक (Primary) उत्पादकता, ऋतूंप्रमाणे आणि कालांतराने त्यांमध्ये होणारे फरक, निरनिराळ्या परिसंस्थामधील मूलद्रव्यांची चक्रगती, महत्त्वाच्या वनस्पती प्रजातीचा पर्यावरणीय दृष्टीकोनातून अभ्यास इत्यादी संशोधनाचा त्यांनी देशात पाया घातला.

मिश्रा (इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (इंन्सा), एनएएस्सीएल, एन.आय, ई.वर्ल्ड अकादमी ऑफ आर्टस अँड सायन्स आदी संस्थांचे फेलो होते. विद्यार्थी आणि सहकारी यांना बरोबर घेऊन त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकल्प पार पाडले. युनेस्कोचा इंटरनॅशनल बायोलॉजीकल प्रोग्राम, मानव आणि बायोस्फिअर प्रोग्राम, युनोची वाळवंटीकरण समस्या यावर ते कार्य करत. ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पती विभागाचे १९५८ मध्ये अध्यक्ष, इंडिअन बोटॅनीकल सोसायटीचे अध्यक्ष, भारत सरकारच्या नॅशनल कमिटी फॉर इंव्हॅरनमेंट प्रोटेक्शन ॲड कोऑर्डीनेशन (NCEPC) चे ते उपाध्यक्ष होते. याच कमिटीचे पुढे पर्यावरण मंत्रालयामध्ये रुपांतर झाले. युनेपचा डेझर्टीफिकेशन कंट्रोल सभेचे आणि स्कोपच्या हेलसिंकी, नैरोबी सभांचे ते सल्लागार होते. त्यांना रशियन सायन्स अकादमीने सन्मानित केले होते तर अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्थेचे ते निमंत्रित शास्त्रज्ञ होते. याशिवाय त्यांना मालवीय सुवर्णपदक, बिरबल सहानी सुवर्णपदक, जवाहरलाल नेहरू सुवर्णपदक, संजय गांधी सन्मान, स्वामी प्रणवानंद सरस्वती सन्मान इ. सन्मान मिळाले होते.

मिश्रा सुमारे दहा वैज्ञानिक नियतकालिकांचे संपादक होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी जी. एस. पुरी यांच्याबरोबर लिहिलेले इंडियन मॅन्युअल ऑफ प्लँट इकॉलॉजी  हे पुस्तक या विषयातला संदर्भ ग्रंथ असे मानले जाते. त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर ट्रॉपिकल इकॉलॉजी या संस्थेची स्थापना केली.

समीक्षक : चंद्रकांत लटटू