मेहेर-होमजी, विस्पी एम. : (१८ जानेवारी १९३२ – ) विस्पी मेहेर – होमजी यांचा जन्म मुंबईत झाला आणि लहानपण दक्षिण गुजरातमधील उद्वाडा या गावात झाले. हे गाव झोरास्त्रिअन पारशी जमातीच्या भारतातील सर्वात प्राचीन अग्नी ठेवलेल्या अग्यारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील वैद्यकीय व्यावसायिक असून वृक्षमित्र होते. गावाच्या परिसरात सागवान वृक्ष-वनाच्या खुणा शिल्लक होत्या. अशा परिसरात वाढलेल्या मेहेर – होमजी यांच्या मध्ये निसर्गाची आवड निर्माण झाली. वनस्पतीशास्त्र विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. एससी. पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने त्यांना मुंबईच्या विज्ञान संस्थेत पुढील अभ्यासासाठी मेल्ड्रम पारितोषिक मिळाले. तेथे असताना त्यांचा संपर्क आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पारिस्थितीकीतज्ञ प्रा. भरुचा, जीवाष्मतज्ञ प्रा. महाबळे, वनस्पतीतज्ञ फादर सांतापाव आणि तिवर-वनांचे आद्य अभ्यासक डॉ. नवलकर या  वैज्ञानिकांशी झाला. १९५५ साली ते एम. एस्सी. झाले.

त्याच वर्षी पुद्दूचेरीत नव्याने स्थापन झालेल्या इंडो-फ्रेंच संशोधन केंद्रात मेहेर-होमजी यांना संशोधनासाठी संधी मिळाली. तेथे भारतीय द्वीपकल्पाची वनसंपत्ती आणि पर्यावरण यांचे नकाशे तयार करण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पावर पी. एल. लेग्रीस (P. Legris) या फ्रेंच वनविद्या-तज्ज्ञासोबत मेहेर-होमजी यांनी काम केले.

मेहेर-होमजी यांना फ्रांसमधील टूलुज (Toulouse) विद्यापीठात, वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. गसौ (Prof. Gaussen)  यांच्याबरोबर काम करून, वन-संपत्तीचे नकाशे (Vegetation Cartography) करण्यासाठीच्या संस्थेत डी. एस्सी.चा प्रबंध लिहिण्याची संधी मिळाली. दुसऱ्या महायुद्धात आकाशातून घेतलेल्या छायाचित्रांच्या सहाय्याने वनस्पतींचे आणि संबंधित मृदा, पाऊस-पाणी हवामान, कृषी इत्यादींचे नकाशे तयार करण्याचा प्रकल्प प्रा. गसौ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केला गेला. या प्रकल्पावर आधारित मेहेर-होमजी यांचा ‘Bio-climates of the Indian Subcontinent and the Analogous Types in the World’  हा प्रबंध इतका पथदर्शी आणि उपयुक्त ठरला कि टूलुज विद्यापीठाने तो संपूर्ण प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला. पाठोपाठ मुंबई विद्यापीठाने त्यांना १९६२ साली ‘Phytogeography of the Semi-Arid Zones of India’ या प्रबंधावर पीएच्. डी. प्रदान केली.

मेहेर-होमजीनी यूरोप, आशिया, उत्तर आफ्रिका येथील  अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या. जर्मन वनस्पतीसमाज-शास्त्रज्ञ (Phytosociologist) प्रा. टक्सन आणि फ्रान्समधील मॉपेल्लिए (Montpellier) विद्यापीठातील रुक्षभूमी-तज्ञ प्रा. एम्बेर्गेर यांच्याकडेही शिक्षण घेतले.

भारतीय द्वीपकल्पाचे त्यांनी सहकाऱ्यांबरोबर तयार केलेले नकाशे (१:१०,००,०००) आणि पश्चिमघाटाचे (१:२,५०,०००) प्रमाणाचे नकाशे यांचा वनांचे वर्गीकरण आणि जैव-वैविध्य जतनाची योजना तयार करण्यासाठी उपयुक्त ठरले. भारतातील वनांचा आद्यइतिहास, वनस्पतींच्या भौगोलिक प्रसरणाची न उलगडणारी कोडी, जैव-हवामानाचे प्रकार, वनसंहार आणि पर्जन्यघट, सूक्ष्म हवामानाचा वनसंपत्तीवर होणारा परिणाम आणि किनाऱ्याची धूप, इत्यादी पर्यावरणाच्या समस्यांवर त्यांनी अव्याहतपणे संशोधन केले. भारतातील जैव-हवामानाचे प्रकार ओळखून एका प्रदेशातील वनस्पती प्रजाती त्याच प्रकारच्या अन्य प्रदेशात वाढवणे आणि प्रस्थापित करणे, सुलभ केले. वर्षातील शुष्क ऋतूचा काळ आणि पर्जन्य-ऋतूचा काळ यांचा वनस्पती प्रसारणाशी असलेला संबंध प्रस्थापित केला.  वनराई प्रकाराचा क्षेत्रविस्तार आणि तेथील ऱ्हास झालेला क्षेत्रविस्तार अभ्यासून वनसंरक्षण किती प्रमाणात करावे हे ठरवण्यास मदत केली. हवामानातील बदलाची अनिश्चीतता विचारात घेऊन वर्षाच्या सरासरी हवामानापेक्षा त्या वर्षातील हवामानाची शक्यता वर्तवणे महत्त्वाचे आहे असे सुचवले. वनसंहार आणि समुद्र-तटाकीच्या ऱ्हासातील संबंध दाखवून दिले. उदा., वादा येथील अग्यारीतील अग्नी अव्याहत ज्वलंत ठेवण्यासाठी बाभूळवन-निर्मिती, पिच्छावरण तिवरसंरक्षण, विख्रोळीचे तिवरवन, निलगिरी बायोस्फिअर मर्यादा आखणे, इत्यादी कार्यात मेहेर-होमजी यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले.

मेहेर-होमजी यांनी दोनशेवर शोधनिबंध प्रसिद्ध केले असून अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत – संशोधन संचालक, फ्रेंच इन्स्टिट्यूट, पुद्दूचेरी; डीन, इकॉलॉजी स्कूल, पाँडिचेरी विद्यापीठ; गव्हर्निंग बोर्ड सभासद–इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरू; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ; भारतीय वन्यप्राणी संस्था, डेहराडून, इत्यादी.

भारतातील सर्व सायन्स अकाडेमींचे मेहेर-होमजी फेलो आहेत, शिवाय पलिओ-बोटानिकल सोसायटीचे संस्थापक फेलो आहेत. त्यांना प्राप्त असलेले अन्य सन्मान – सर अल्बर्ट सेवर्ड मेमोरिअल (दोनदा) व्याख्याता, भारतीय वन-पर्यावरण मंत्रालयाची पितांबर पंत राष्ट्रीय पर्यावरण फेलोशिप, एम्बेर्गेर-सावेज इकॉलॉजी फाउंडेशन (फ्रान्स) सन्मान, फ्रान्स सरकारचे Officer in the Order of Palmes Academiques सन्मान इत्यादी.

निवृत्तीनंतर मेहेर-होमजी मुंबईत स्थायिक झाले आहेत.

संदर्भ:  

  • Gaussen, H., P. Legris, M. Viart and V. Meher-Homji. 1961. International Map of Vegetation and Environmental Conditions: Cape Comorin & Explanatory Booklet. French Institute, Pondicherry. Trans. Sect. Sci. Tech.
  • Singh K. P., ‘V. M. Meher-Homji’, Tropical Ecology (Vol. in Honour of Dr. V. M. Meher-Homji). 38(2):161-162.
  • Pascal, Jean-Pierre., ‘A review of scientific contributions of V. M. Meher-Homji’, Tropical Ecology 38(2): 163-170.
  • Damania A. B., ‘Professor Vispi M. Meher-Homji : Botanist and Ecologist.’ Asian Agri-History, 12(4): 307-309, 2008.
  • Damania A. B., ‘Asian Agri-History’, Vol. 19, No. 2, 2015
  • http://insaindia.res.in/detail/N88-0996

समीक्षक: चंद्रकांत लटटू