एलियनगर्ट्रूड बेल : (२३ जानेवारी, १९१८ –  २१ फेबुवारी, १९९९  ) गर्ट्रूड बेल एलियन ह्यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे आईवडील लिथुआनिया देशातून अमेरिकेत स्थलांतरित आले  होते. शालेय जीवनात गर्ट्रूडना सर्व विषयांची आवड होती. बालवयात गर्ट्रूड  यांनी आजोबांचा कर्करोगाशी चाललेला झगडा पाहिला. त्यातून त्यांनी कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीचा अभ्यास करून कर्करोगावर उपाय शोधण्याचा निश्चय केला.

रसायनशास्त्रातील पदवी मिळवून एम्.एस्सी. साठी गर्ट्रूड एलियन न्यूयॉर्क विद्यापीठात दाखल झाल्या. इतरत्र लहान मोठी कामे करत शेवटी त्या बरोज-वेलकम कंपनीच्या प्रयोगशाळेत जॉर्ज हिचिंग्ज  (George H. Hitchings)  ह्यांच्या सहाय्यक म्हणून रुजू झाल्या.  प्रारंभी प्रा. हिचिंग्ज ह्यांच्या सहाय्यक आणि नंतर सहकारी अशा नात्याने गर्ट्रूड आणि हिचिंग्ज यांचे साहचर्य  चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकले .

गर्ट्रूड ह्यांचा मूळ विषय सेंद्रिय रसायनशास्त्र होता.  त्यांनी जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधीविज्ञान  आणि प्रतिक्षमताविज्ञान यामध्येही रस घेतला.

गर्ट्रूड एलियन आणि हिचिंग्ज  ह्या दोघांनी सर्वसामान्य मानवी पेशींची आणि कर्करोगग्रस्त मानवी पेशींची जीवरासायनिक तुलना केली. या  तुलनेमुळे  जीवाणू, विषाणू आणि अन्य सजीवांची  सामना करण्याची पद्धत शोधण्यात त्यांना यश मिळाले. पूर्वीच्या औषधवैज्ञानिकांनी एखाद्या आजारावर कोणते औषध परिणामकारक आहे हे केवळ अनुमानाने शोधले होते. त्यामुळे  योग्य औषध शोधास अधिक वेळ लागत होता.

अनेक  रोगांवर नवी रासायनिक औषधे ह्या दोघांनी शोधून काढली. उदा.,  ६-मरकॅप्टोप्यूराइन हे श्वेतपेशी कर्करोग (leukaemia) साठीचे व अवयव रोपणावरील अझाथायोप्राइन किंवा इम्युरान हे प्रतिक्षमता दडपणारे   (immuno-suppressor) व  नेलाराबाईन हे  कर्करोग विरोधी औषधे शोधून काढली.  अझाथायोप्राइनचा वृक्क (किडनी) रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात उपयोग होतो. अझाथायोप्राइन नेमके दुसऱ्या व्यक्तीच्या ऊतींविरोधी प्रतिद्रव्ये निर्माण करण्यास अडथळा करते.

ह्या संशोधक द्वयीने रोगकारक जीवाणू, विषाणूंची पुनरुत्पत्ती आणि अन्य शरीरक्रिया रोखणारी औषधे उपलब्ध करून दिली.

गर्ट्रूड एलियन ह्यांच्या प्रयत्नांतून विरुद्ध प्रतिलेखन (Reverse transcriptase)  हे आरएनएपासून डीएनए बनवण्यासाठी उपयोगी पडणारे विकर  निकामी कसे करता येइल यावर संशोधन केले. त्यातूनच झायाडोथायमिडीन हे एच.आय. व्ही. (HIV AIDS) रोगाच्या विषाणूंना निष्प्रभ करू शकणारे औषध कालांतराने निर्माण झाले.

प्लास्मोडियम  या एकपेशीय सूक्ष्मपरजीवीमुळे (Plasmodium) हिवताप (Malaria)  होतो. या रोगाला जगभरात  लाखो लोक दरवर्षी बळी पडतात. या मलेरिया आजारावर  पायरीमेथामिन परिणामकारक ठरेल हे ह्या दोघांनी दाखवून दिले. ट्रायमेथोप्रिमची योजना  मूत्रमार्ग जंतुसंसर्ग  (urinary tract infection) बरा करण्यासाठी, ॲलोप्युरीनॉल हे औषध रक्तातील यूरिक आम्ल साठत राहण्याच्या विकारावरील  (आमवात- Gout)  उपचारासाठी आणि असायक्लोवीर, नागीण (Herpes zoster) या रोगावरील उपचारासाठी उपलब्ध करण्याचे श्रेयही ह्या दोघांनाच जाते.

ह्या दोन संशोधकांनी शोधून काढलेली अनेक औषधे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अत्यावश्यक औषधांच्या सूचित समाविष्ट झाली आहेत.

अनेक नव्या औषधांच्या उपचारावरील संशोधनासाठी ह्या दोघांना  १९८८ सालचे शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा  नोबेल पुरस्कार विभागून  दिला  गेला. वयाच्या ८१ वर्षी नॉर्थ कॅरोलिना येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा