राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र : (स्थापना – १९९८) अंटार्क्टिका अभ्यास केंद्र या नावाने स्थापना झालेल्या केंद्राचे नाव २००५ साली, राष्टीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र असे बदलण्यात आले. गोवा  राज्यातील वास्को येथे या केंद्राचा प्रारंभ झाला.  भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत हे केंद्र स्वतंत्रपणे कार्य करते.

या केंद्रातील संशोधन चार प्रमुख विभागात करण्यात येते .

१. ध्रुवीय संशोधन व अभ्यास.

२. हिमालयविषयक संशोधन व अभ्यास, पृथ्वी भूपृष्ठावरील गोठलेल्या पाण्याचा अभ्यास.

३. दक्षिण महासागरातील पाण्याचा अभ्यास.

४. पृथ्वीवरील भूविज्ञान शाखांचे संशोधन व अभ्यास.

     राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र, गोवा.

पृथ्वीशी संबंधित सर्व विज्ञान शाखांचा अभ्यास या संस्थेत करण्यात येतो. अंटार्क्टिक संशोधनामध्ये उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रावरून अंटार्क्टिका खंडाची प्रतिकृति बनवणे, अंटार्क्टिका खंडातील बर्फाची भौगोलिक रचना, पाण्यातील सूक्ष्मजीवांच्या विविधतेचे मूल्यांकन तसेच अंटार्क्टिकावरील पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास हिमालय व तिबेट पठार उचलल्या जाण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. तसेच या प्रक्रियेचा व भारतीय उपखंडात पडणाऱ्या मान्सून पावसाच्या परस्पर संबंधाचा अभ्यासही येथे केला जातो.

अंटार्क्टिकाचा अभ्यास करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सहकार्याने भारतीय दक्षिण ध्रुवावरील मोहिमांचा कार्यक्रम राबवला जातो. अत्यंत उच्च श्रेणीतील या संशोधनासाठी सुमारे १५०० वैज्ञानिक एकत्र येतात. भारतीय वैज्ञानिकांनी पहिली दक्षिण ध्रुव मोहीम १९८१ साली, पूर्ण केल्यानंतर १९८४ साली, दक्षिण गंगोत्री या भारतील संशोधन तळाची अंटार्क्टिकावर उभारणी करण्यात आली. त्या पाठोपाठ १९९० साली, मैत्री व २०११ साली, भारती संशोधन तळ तयार झाले. दूर संवेदन उपग्रहासाठी भारतीय अवकाश संशोधन संघटनेला भारती हा तळ उपलब्ध करून देण्यात आला. पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षा उपग्रहाकडून येणाऱ्या संदेशवहनासाठी अंटार्क्टिकावरील भारती तळ अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहे.

उत्तर ध्रुवीय प्रदेशातील संशोधनाचा नॅकॉर संस्थेने २००७ साली प्रारंभ केला. यासाठी २००८ साली, नॉर्वे येथे हिमाद्री या भारतीय संशोधन तळाची स्थापना केली. या संशोधनाचा उद्देश वातावरणातील बदलांचा सूक्ष्म अभ्यास करणे आणि हिमनद्यांचा अभ्यास करणे असा आहे. नॉर्वेतील कॉग्जफिओर्डेन येथे हे संशोधन केले जाते. आर्क्टिक उत्तर ध्रुव प्रदेशातील बरेच जैविक व सूक्ष्मजैविक संशोधन येथे केले जाते.

भारतीय किनारपट्टी जवळील २०० किलोमीटर सागरी सीमेमधील व आंतरराष्टीय सागर तळाशी आढळणारे बहुधात्वीय गोळे व गाळाचे विश्लेषण या संस्थेत केले जाते. मध्य हिंदी महासागरात असे गोळे साठण्याच्या क्रियेच्या व उत्पत्तीच्या अभ्यासावर अधिक भर दिलेला आहे. राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या संस्थेतील  हिमगाभा अंतरक (आइस कोअर लॅबोरेटरी) प्रयोगशाळेत उत्तर व दक्षिण ध्रुव प्रदेशात खोल गाभ्यात असलेल्या बर्फाचे नमुने अभ्यासासाठी पाठवले जातात. भारतातील या प्रकारचे संशोधन करणारी ही एकमेव प्रयोगशाळा आहे. लवकरच या संस्थेसाठी महासागर तळाशी व तळाखालील पृष्ठाभागाखाली संशोधन करू शकेल असे अद्ययावत बहुउद्देशीय जहाज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा