राजस्थानची लोकनृत्ये : राजस्थानची संस्कृती इतकी विविधांगी आहे की, या संस्कृतीचे विविधरंग येथील लोकजीवनात आढळतात. विविध सणांच्या वेळी राजस्थानमध्ये नव्या, ऊर्जासंपन्न सांस्कृतिक रंगांची उधळण अनुभवायला मिळते. प्रेक्षणीय नृत्ये, आत्मसुखद संगीत, सुश्राव्य गीते, आकर्षक पेहराव या सर्वांमुळे राजस्थानच्या संस्कृतीला एक विलोभनीय रूप प्राप्त झाले आहे. राजस्थानात  पारंपरिक प्रयोगात्म कलांचे अनेक व्यावसायिक संच आहेत. प्रत्येक समाज घटक आणि जाती समूह यांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. शेतीच्या हंगामातीलविधी असोत, स्थानिक जत्रा, सण, उत्सव असोत, संगीत आणि नृत्याच्या सादरीकरणाने येथील कलावंत आणि प्रेक्षक यांचा आनंद द्विगुणित होतो. राजस्थान विलोभनीय शिल्पकला, राजमहाल, गड, हवेल्या, वालुकामय कलाकृती, जत्रा, उत्सव यामुळे लोकप्रिय राज्य आहे. शौर्य, पावित्र्य आणि सण-उत्सवांनी राजस्थानचा  सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवला आहे. राजस्थानला लोकनृत्याची समृद्ध परंपरा आहे. ही लोकनृत्ये खालील प्रमाणे –

घूमर नृत्य

घूमर नृत्य : घूमर लोकनृत्य ही जणू राजस्थानची सांस्कृतिक ओळख झाली आहे. घुमरचा प्रवास राजघराण्यातील नृत्य प्रकारापासून सुरु झाला तो थेट आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. उत्सवात अथवा एखाद्या मंगल प्रसंगी घूमर लोकनृत्य सादर केले जाते.  राजस्थानी स्त्रियांचे सौंदर्य आणि नजाकत यांचा सुंदर समन्वय या लोकनृत्यात होतो. पारंपरिक कुर्ती, कांची, लेहंगा आणि चेहऱ्यावर खालपर्यंत येणारे झुमके अशा साज शृंगार केलेल्या मारवाड, मेवाड आणि धुंधार प्रदेशातील कलावंत स्त्रिया हे नृत्य सादर करतात. गीता सोबत त्यांच्या हातांच्या लयदार हालचाली, गिरक्या, कटी विलास हे त्यांच्या नृत्याचे वैशिष्ट्य असते. हार्मोनियम, सनई, ढोल, ढोलक  ही वाद्ये वाजविणारे पुरुष कलावंत धोतर, अंगरखा, जाकीट आणि डोक्यावर साफा म्हणजे राजस्थानी फेटा परिधान करतात .

चारी नृत्य

चारी नृत्य : चारी नृत्य हे राजस्थानचे पारंपरिक नृत्य नसले तरी अलीकडच्या काळात ते खूपच लोकप्रिय झाले आहे. गुज्जर आणि माली समाजात हे अतिशय लोकप्रिय आहे. चारी नृत्यातील कलावंतांच्या हालचाली अतिशय विलोभनीय असतात. चारी नृत्य हे पारंपरिक अग्नी नृत्य असल्याचा दावा अनेक अभ्यासक करतात. धातूच्या भांड्यात अग्नी ठेवून डोक्यावर घेत नर्तक समतोल राखीत नृत्य करतात. हे नृत्य करताना नर्तक आपल्या हालचालींमध्ये सातत्याने विविधता राखतात. कापसाच्या बिया म्हणजे सरकीचे तेल बुडवून ते पेटवितात आणि धातूच्या भांड्यात ठेवतात. पेटत्या भांड्यांसह हे नृत्य होत असल्याने हालचाली अडचणीच्या ठरतील अशा नसतात. डोक्यावर ठेवलेल्या अग्नी असलेल्या भांड्याचा समतोल राखण्याचे काम हे मोठ्या कौशल्याचे काम असते. ढोल, बंकिया, झांजा ही वाद्ये चारी नृत्यात उपयोगात आणतात. घागरा, कुर्ती, ओढणी, बांगड्या, पाटल्या, झुमके, कंठी हार, बिंदी असा साजशृंगार चारी नृत्यातल्या कलावंत स्त्रिया करतात.

तेरा ताली नृत्य : लोकदेव बाबा रामदेव (रामसा पीर) याच्या संकीर्तनासाठी सादर होणारा भक्तिमय नृत्य प्रकार म्हणजे तेरा ताली होय. हा नृत्य प्रकार मारवाड आणि मेवाड मध्ये स्थायिक असलेला कामद समाज सादर करतो. कामद हा पुजारी जनसमुदाय असून पावसाळ्याच्या दिवसात आयोजित होणाऱ्या रामदेवरा मेळ्यात तेरा ताली नृत्य सादर होते. कामद स्त्रिया हे नृत्य सादर करतात.त्यांचा चेहरा घुंघट ने झाकलेला असतो, चेहऱ्यापर्यंत डोक्यावरील बिंदी पसरलेल्या असतात. डोक्यावर भांडी घेऊन त्या तेरा ताली नृत्य सादर करतात. नृत्य करताना त्या स्त्रिया त्यांची बसलेली अथवा लवलेली स्थिती बदलत नाहीत. शरीराच्या विविध भागांवर काशाच्या तेरा झाजा त्यांनी बांधलेल्या असतात. हातात मंजिरा घेऊन त्या वाजवीत राहतात. ढोलकच्या तालावर एकामागोमाग एक १३ झांजा त्या वाजवीत राहतात. झांजावर वेगवेगळ्या प्रकारचा आघात देऊन वैविध्यपूर्ण ताल निर्मितीचे त्यांचे कौशल्य असते. हे नृत्य सुरु असताना कलावंत स्त्रिया विविध प्रकारच्या क्रियांचे अनुकरण करीत असतात. गवत कापणे, ताक घुसळणे, गायीचे दूध काढणे, धान्य कांडणे, सूत  कताई करणे, पीठ मळणे असा क्रिया त्या नृत्य करताना करीत असतात.

कच्छी घोडी नृत्य

कच्छी घोडी नृत्य  : राजस्थानच्या प्रयोगात्म कलांवर वेळोवेळच्या, विशिष्ट समाजाच्या सामाजिक-ऐतिहासिक गोष्टींचा विलक्षण प्रभाव आहे. राणा प्रताप यांची शौर्यगाथा त्यांच्या चेतक या घोड्याच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. राजस्थानमधील भाट समाज लग्नाच्यावेळी अथवा अन्य सण, उत्सवाच्या वेळी घोडा नाचविण्याचा प्रकार सादर करतात. कच्छी घोडी या नृत्यात सर्वसामान्य वाटसरूंना लुटणाऱ्या भावरिया डाकू बरोबरच्या संघर्षाचे दर्शन घडविले जाते. भाट समाजातील कलावंत नर्तक रंगीबेरंगी वेष परिधान करतात आणि त्यांच्या हातात तलवारी असतात. ते नकली घोडा निर्माण करून भावरिया दरोडेखोराची कथा नाट्यरूपाने नर्तनातून सादर करतात. त्यांची नृत्ये अधिक जोरकस असतात पोवाड्याच्या साथीने ते नकली युद्ध नृत्यातून उभे करतात.

गेर नृत्य

गेर नृत्य : देशभरात होळी हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा सण पीक पाण्याच्या समृद्धीच्या कालखंडात येतो. राजस्थानात जाट, ब्राह्मण, भिल्ल आणि अन्य समाज होळी साजरी करताना गेर नृत्य सादर करतात. गेर नृत्य एका समाजाने सादर केलेले नृत्य म्हणून ओळखले जात असले तरी नृत्य सादर करण्याच्या तीनही प्रदेशाच्या शैलीत फरक आहे. गेर नृत्याचे वेगवेगळे प्रकार खालील प्रमाणे – दांडिया गेर : दांडिया गेर मध्ये नर्तन धीम्या गतीने नृत्य सुरु करतात आणि उत्तरोत्तर नृत्याची गती वाढविली जाते. ढोल आणि थाळी या वाद्यांच्या साथीने हे नृत्य सादर होते. दांड्या म्हणजे काठ्या हातात घेऊन नर्तक एकपाद भ्रमरी घेऊन उंच उडी घेतात. गोलाकार फिरताना ते झुकून नृत्य करतात. नर्तक शुभ्र धोतर खमीस आणि डोक्यावर पगडी घालतात.

आंगी गेर नृत्य: आंगी गेर नृत्य सादर करणारे कलावंत लाल रंगाचे आंगी म्हणजे लांब झबले ( फ्रॉक ) परिधान करतात आणि गोलाकार नृत्य करतात. गोलाकार नृत्य करणाऱ्या कलावंतांचे झबले सतत उडत राहते. त्यामुळे प्रेक्षकांना एक आल्हादायक अनुभूती प्राप्त होते. या नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे नर्तक अडीच फेरे घेतो. घड्याळाचे काटे फिरतात तसेच ते उलटे फिरतात अशा पद्धतीने नर्तक नृत्य करतात .

स्वांग गेर नृत्य : स्वांग गेर हा नृत्यप्रकार भिलवाडा आणि सभोवतालच्या भागात होळीच्या वेळी सादर होतो. या नृत्य प्रकारात नर्तक वेगवेगळी वेशभूषा करीत नृत्य करतात.

तलवार गेर नृत्य : तलवार गेर हा नृत्य प्रकार राजस्थानातील युद्धाशी संबंधित विशिष्ट समुदाय सादर करतात. या नृत्य प्रकारात नर्तक तलवारी नाचवित तलवार नृत्य करीत वीर रसाचे दर्शन घडवितात.

गींडाड नृत्य : हा नृत्य प्रकार शेखावती प्रदेशात होळीच्या वेळी सादर होतो. सर्व समाज जातपात विसरून एकत्र येत गींडाड नृत्य करतात . त्यासाठी ढोल, चांग, डफ ही वाद्ये वापरली जातात.

जोधपूरका गेर नृत्य : जोधपूर गेर नृत्यात नर्तक विविध पात्रे घेतात. ढोल, सनई, नगारा या वाद्यांच्या साथीने नृत्य करतात. होळीची गीते गाऊन हे जोधपूर गेर नृत्य सादर होते.

गलियोंकी गेर नृत्य : गलियों की गेर नृत्य गोलाकार नाचत नर्तक एका घरावरून दुसऱ्या घरावर जात सादर करतात.त्यावेळी शिव्या शापांची भाषा देखील वापरतात .

भिलों का गेर नृत्य : हा आदिवासी भिल्लांचा नृत्य प्रकार असून मेवाड प्रांतात नर्तक पायात घुंगरू बांधून नृत्य सादर करतात .

चंग धमाल नृत्य : शेखावती प्रदेशातील सर्व जाती जमातींचे लोक होळीच्या वेळी चंग धमाल हा नृत्य प्रकार सादर करतात. गोलाकार नृत्य करणारे कलाकार हातात डफ घेतात. स्त्रियांचा वेष धारण केलेले एक दोन पुरुष कलावंत आणि बासरी वाजविणारा कलावंत सोडला तर बाकीचे कलावंत डफ वाजविताना गीतात आणि नृत्याची वैविध्यपूर्ण कौशल्ये दाखवितात. गाणे थांबल्यावर बासरी वाजते आणि पुढे बासरीला डफाची साथ लाभते. नृत्य आणि वादन यांचे हे चक्र सतत सुरु असते.

बाम रसिया नृत्य

बाम रसिया नृत्य : बाम रसिया हा पहाडी प्रदेशावरील जाट, गुज्जर आणि आहेर समाजाकडून सादर होणारा समूह नृत्याचा प्रकार आहे. हा प्रकार होळीच्या सुमारास ब्रज आणि मेवाड प्रदेशात सादर होतो. या नृत्याचे दोन प्रकार आहेत. गुज्जर शैलीत मुख्यतः पुरुष नर्तक भाग घेतात.जाट शैलीत पुरुष आणि स्त्रिया दोघेही नृत्यात सहभागी  होतात. बाम म्हणजे मोठ्या नगाऱ्याची प्रतिकृती. नगाऱ्या सारखेच टिमकी हे छोटे तालवाद्य देखील नृत्यात वाजविले जाते. बाम रसिया मध्ये आंगरिया म्हणजेच मुख्य गायक पहिल्यांदा गाण्याची एक ओळ गातो. त्यावेळी त्याच्या गाण्याला कुठल्याही वाद्याची साथ नसते. नंतर समूहातील कलावंत गाण्याची री ओढतात. हे नृत्य सुरु असताना कलावंतांवर फुलांच्या पाकळ्यांची आणि विविध रंगांची उधळण केली जाते. कृष्णाचे संकीर्तन यावेळी सादर होणाऱ्या गीतांमधून केले जाते.

चारकुला नृत्य

चारकुला नृत्य : चारकुला हा नृत्यप्रकार कृष्ण भक्तीशी समर्पित नृत्य प्रकार असून अनेक पुराकथा या नृत्याशी जोडल्या गेल्या आहेत. राधेच्या जन्माची वार्ता ऐकताच तिच्या आजीने डोक्यावर तेलाचा  दिवा घेऊन बाहेर पडत ही वार्ता सर्वांना सांगितली. राधा आणि कृष्णाचे नाते प्रेयसी आणि प्रियकर असे होते हे सर्वश्रुत आहे. तेव्हापासून होळीच्या नंतरच्या तिसऱ्या दिवशी हे नृत्य करण्याची परंपरा चालू झाली. दुसऱ्या एका पुराकथेवरुन  मुसळधार पावसात करंगळीवर गोवर्धन पर्वत घेऊन कृष्णाने गवळ्यांचे प्राण वाचविले ह्या प्रसंगाची मानवंदना म्हणून तेलाचे दिवे घेऊन नृत्य करण्याची परंपरा सुरु झाली. त्या नृत्यात स्त्रिया १०८ तेलाचे दिवे डोक्यावर घेत लाकडाचे मनोरे तयार करतात. कृष्णाचे संकीर्तन गीतातून करता. पर्वताचे प्रतीक म्हणून डोक्यावरचे दिवे मिरवणाऱ्या स्त्रिया नृत्यातून तोल राखतात. स्त्रिया झुकतात, सरकतात, एक पाद भ्रमरी नृत्य करतात.

अग्नी नृत्य : अग्नी नृत्य बिकानेर आणि चुरु विभागातील भोपा लोककलावंत जसनाथ यात्रेच्या वेळी सादर करतात. जसनाथजी हे १५  मोठे संत होऊन गेले. त्यांनी सामाजिक सलोख्याचा संदेश दिला तसेच साध्या आणि आनंदी जीवनाची ३६ सूत्रे विषद केली. अग्नी नृत्यात लाकूड आणि कोळशाच्या मदतीने मोठा अग्नी पेटविला जातो. मोठा ढोल वाजविला जातो त्याच्या तालात भोपा कलावंत अग्निवरून उड्या घेतात. पुजारी मंत्रोच्चार धीम्या गतीने सुरु करतात आणि या विधीचा प्रारंभ होतो. नगारा आणि मंजिरीच्या नादात हे मंत्रोच्चार सुरु असतात. नगारा, मंजिरीचे संगीत तीव्र होते, उत्कर्षबिंदुला पोहोचते तेव्हा नर्तकांच्या अंगात आल्यासारखी स्थिती निर्माण होते. जळत्या लाकडांची धग कमी कमी होऊ लागल्यावर पुजारी जाळात उडी घेतात. त्यावेळी कोळसे जळत असतात. काही नर्तक जळते कोळसे तोंडात घालतात. हा देवाचाच प्रसाद असल्याची त्यांची धारणा असते नंतर अग्नी स्थान इतर लोकांना दर्शनासाठी खुले होते.

नाहर नृत्य : नाहर नृत्य हे राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील मंडाल गावातील पारंपरिक विधीनृत्य आहे. पौर्णिमेच्या आधीच्या तेराव्या दिवशी रंग तेरस म्हणून पुरुष कलावंतांकडून  हे नृत्य सादर केले जाते. माली कलावंतांकडून हे नृत्य सादर केले जाते.विविधतेतून एकता, सृजनात्मक शक्तीचे उत्थान, अशुभावर विजय या हेतूने नाहर नृत्य सादर केले जाते. जिद्द , शक्ती, भयमुक्त वातावरण, ऊर्जा तसेच सिंहाचा बाणा हे सूत्र नाहर नृत्यात असून पांढऱ्या वेशातील पुरुष कलावंत ढोल आणि बंकिया म्हणजे ढोढाना या वाद्यांसह नाहर नृत्य सादर होते.

तुंतीया नृत्य : महिलांनी लग्न प्रसंगी सादर केलेले तुंतिया नृत्य मध्य हरियाणात लोकप्रिय आहे. मध्य हरियाणात या नृत्याला खेरिया म्हणतात तर राजस्थानात तुंतीया नृत्य म्हणून संबोधतात. लग्नात  नवरीच्या घरच्या स्त्रिया नवरी सासरी निघते तेव्हा तुंतीया नृत्य करतात. ढोलक आणि डफली या वाद्यांच्या साथीने स्त्रिया रात्रभर हे नृत्य करतात. हे नृत्य अश्लील स्वरूपाचे असल्याने मुला – मुलींना या नृत्यापासून दूर ठेवतात.

डेरू नृत्य : शेखावती प्रदेशात राहणाऱ्या भिरासी समाजातील पुरुष कलावंत डेरू नृत्य सादर करतात. धोतर, कुर्ता आणि शेखावती पगडी घातलेले लोक गोगाजी म्हणजेच गागा पीर या देवतेच्या संकीर्तनाप्रीत्यर्थ हे नृत्य करतात. गागापीर ही एक प्रकारची नाग देवता असून उत्तर आणि पश्चिम भारतात ती प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि अन्य राज्यातील ग्रामीण भाविक राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील गागा पीर देवतेच्या दर्शनासाठी एकत्र येतात. निशान म्हणजेच झेंडा त्यांच्या सोबत असतो. डेरू नावाच्या वाद्यासोबत नृत्य करीत ते गोगाजीची म्हणजेच गागा पीरची गाणी म्हणतात .

ढोल नृत्य :  ढोलनृत्य हे पुरुषांचे नृत्य आहे. लग्नाच्या प्रसंगी जालोर जिल्ह्यातील ढोली सरगरा आणि माली समाज ढोल नृत्य सादर करतो.  पाच सहा ढोल-तलवारी, काठ्या-रुमाल यासह हे नृत्य सादर होते.नृत्य सुरु करताना नृत्य चमूचा प्रमुख ढोल वाजवितो आणि नृत्याचे संकेत देतो. नर्तक तोंडात रुमाल आणि तलवारी धरतात आणि नृत्य सुरु करतात. हे नृत्य इतके गतिशील आणि ऊर्जा देणारे असते कि प्रेक्षकांचे पाय ही नृत्यासाठी थिरकू लागतात.

ब्रज होळी और  फुल होळी : रासलीला, ब्रज होळी, फुलांची होळी हे नृत्य प्रकार अतिशय रंगीबेरंगी वेषभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. भगवान कृष्णाच्या जीवनातील घटनांचे प्रतिरूप या नृत्य प्रकारांमध्ये पाहायला मिळते. या नृत्यामध्ये  नगारा, ढोलक, मंजिरी आणि बासरी, हार्मोनियम ही वाद्य वापरली जातात. भगवे धोतर, बगलबंडी हा पुरुष नर्तकांचा वेश असतो तर घागरा, चोळी, ओढणी हा नर्तिकांचा वेश असतो. नृत्य करताना बांबूंच्या काठ्या, फुलांच्या पाकळ्या, काड्या आदी वस्तूंचा उपयोग केला जातो. कृष्ण आणि मोरांची पिसे, मोर असे दृश्य नृत्यात दाखविले जाते. कृष्ण मंचावर येताच त्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. कृष्ण थाळीचा सुदर्शन चक्रासारखा वापर करीत थाळी फिरवतो व थाळीतील फुलांच्या पाकळ्या प्रेक्षकांवर उधळतो.

भवाई नृत्य

भवाई नृत्य  : भवाई हा राजस्थानचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. हा नृत्य प्रकार अतिशय प्रेक्षणीय असतो, भवाई नृत्यात डोक्यावर हंडा आणि समई आदी वस्तू ठेवून त्यांचा विलक्षण तोल सांभाळीत नृत्य केले जाते. यात हातांचे कौशल्य महत्वाचे असते. पुरुष किंवा स्त्री कलावंत नृत्य सादर करतो त्यासाठी  थाळ्या, तलवारी, हात रुमाल, धातूची भांडी नृत्य दर्शनात वापरली जातात. नर्तक केवळ डोक्यावर वस्तूंचाच समतोल राखतात असे नव्हे तर परातीच्या काठांवर पाय ठेवून अथवा परात उभी करून ती पायाने फिरती ठेवतात. तोल थोडा जरी ढळला तरी सर्व प्रयोग अयशस्वी ठरण्याची शक्यता असते त्यामुळे हाता – पायांचे कौशल्य महत्वाचे असते. तलवारीच्या पात्यावर अथवा काचेच्या तुकड्यांवर नृत्य दर्शनात परमोत्कर्ष  साधतात. ढोलक, मंजिरी, सारंगी, पखवाज या वाद्यांच्या साथीने सणासुदीला हे नृत्य सादर होते.

कालबेलिया नृत्य

कालबेलिया नृत्य : काल म्हणजे मृत्यू आणि बेलि म्हणजे मित्र. कालबेलिया म्हणजे मृत्यूशी केलेली मैत्री असा शब्दश : अर्थ होतो. कालबेलिया नृत्य हे भटक्या विमुक्त कालबेलिया समाजातील कलावंत स्त्रिया सादर करतात. हे लोक व्यवसायिकरीत्या सर्प पकडणारे असतात. कालबेलिया स्त्रिया गीत आणि नृत्य सादर करण्यात पटाईत असतात. उत्सवाच्या वेळी सादर होणारे कालबेलिया नृत्य नंतर मात्र रंगमंचावरील नृत्य सादर होऊन लागले, कालबेलिया नृत्यातल्या हालचाली अतिशय आकर्षक आणि लवचिक असतात. हाताच्या मनगटाच्या अतिशय नाविन्यपूर्ण वापर या नृत्यात होतो. हे नृत्य करताना कसरतीचे खेळ देखील स्त्रिया करतात त्यात शरीराची कमान करून नोट उचलणे, अंगठी उचलणे इतकेच काय डोळ्यांच्या पापण्यांद्वारे सुया उचलणे असे धाडसी प्रयोग कालबेलिया स्त्री कलावंत करतात .

चकरी नृत्य :  कंजारी जातीच्या स्त्री कलावंत चकरी नृत्य सादर करतात. त्या अतिशय वेगात गिरक्या घेतात.  सहा ते बारा कलावंत स्त्रिया या नृत्यात सहभागी होतात. लग्नासह अन्य समारंभात हे नृत्य सादर केले जाते. ऐशीं  कळीचा काळा घागरा घातलेल्या स्त्रिया वेगवान  एकपाद भ्रमरी म्हणजे एका पायावर गोल गिरक्या घेतात. कृष्णाच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे नृत्य दर्शन कालबेलियातून केले जाते.

सहारिया नृत्ये, स्वांग नृत्य : निसर्गाशी आणि त्यातील पर्यावरणाशी पूर्णपणे  तादात्म्य पावलेली सहारिया ही मूळ आदिवासी जमात राजस्थानात प्रसिद्ध असून स्वांग म्हणजेच अनुकरणीय सोंगे घेऊन ही जमात नृत्ये सादर करते. निसर्गातील पशु, पक्षी, वन्य प्राणी यांची सोंगे या नृत्यात आणली जातात . फग आणि रसिया ही लोकगीते सादर करीत संपूर्ण शरीर विविध रंगानी रंगविलेले आदिवासी कलावंत नृत्याद्वारे, विविध सोंगाद्वारे बहार आणतात. बारान जिल्ह्यातील हदोली येथे प्रामुख्याने ही आदिवासी जमात राहते. ती अन्य नृत्ये सादर करते . विवाह प्रसंगी सादर होणार लूर नृत्य हे त्यांचे प्रसिद्ध नृत्य आहे.  लांगी नृत्य, काठी नृत्य, डूल डूल घोरी नृत्य ही नृत्ये सहारिया सादर करतात. काठ्या काठ्यांवर आपटून सादर केलेली नृत्य तसेच पोकळ बांबू द्वारे सादर केलेले डूल डूल घोरी नृत्य ही जमात सादर करते .

गरासिया गेर नृत्य  : गरासिया समाज होळीत नृत्य सादर करतो. त्याला गरासिया घेर असे म्हणतात. होळी ही अग्नी देवता समजली जाते. तोंडात केरोसीन तेल घेऊन आगीचा खेळ करीत नर्तक नृत्य करतो व स्वतःला होलिका म्हणजे अग्नी देवता म्हणून मानतो .

वालर नृत्य : राजस्थानातील गरासिया समाज वालर नृत्य करतो. सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा तालुक्यात गरासिया हा आदिवासी समाज आहे. गणगौर आणि तीज सणात हे नृत्य सादर केले जाते .

 नेजा नृत्य :  बागड प्रदेशातील नेजा समाज होळीनंतर तिसऱ्या दिवशी नेजा नृत्य हा संगीत – नृत्य प्रधान खेळ खेळतात. या समाजातील स्त्रिया एक खांब रोवून त्यावर नारळ बांधतात, या खांबावर चढू पाहणाऱ्या पुरुषांचा प्रतिकार करीत स्त्रिया हातात काठ्या घेऊन या खांबावरील नारळासाठी पहारा देतात. खांबावर चढू पाहणाऱ्या पुरुषांच्या पाठीवर स्त्रिया काठ्या मारतात .

डांगी नृत्य : भिल्लांचा घुमारो हा अतिशय लोकप्रिय नृत्य प्रकार असून तो दिवाळीत सादर होतो. स्त्रिया आणि पुरुष यांच्या समोरासमोर दोन रांगा करतात, या रांगांमधील स्त्री पुरुष मागे-पुढे होत नृत्य करतात. राजस्थानात लोकनृत्यांची विविधता आपणास दिसते. या नृत्यांसोबत रंगीबेरंगी वेषभूषाही आपणास पाहायला मिळते.

संदर्भ :

  • Ahuja,D.R.,Folklore of Rajasthan,National Book Trust,New Dehli,2010.
  • https://theculturetrip.com/asia/india/articles/8-folk-dances-from-rajasthan-you-should-know-about/

मराठी भाषांतर : डॉ.प्रकाश खांडगे