देवल, चंद्रप्रकाश : (१४ ऑगस्ट १९४९). सुप्रसिद्ध हिंदी आणि राजस्थानी साहित्यिक. कविता, अनुवाद अशा विभिन्न पातळीवर लिहिताना त्याचवेळी इंग्रजी, हिंदी आणि राजस्थानी अशा विविधांगी भाषेत लेखन करणे हे त्यांचे वैशिष्ट आहे. भारतीय साहित्यातील प्रमुख भाषांतील काव्यसंग्रहांचा त्यांनी राजस्थानी भाषेत केलेला अनुवाद हे त्यांचे मोलाचे कार्य समजले जाते. जन्म राजस्थान मधील उदयपूर जिल्ह्यातील गोटीपा या गावात झाला. त्यांचे बालपण गावामध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे आजोबा भैरव सिंह ददवाडिया यांच्या सानिध्यात पूर्ण झाले. त्यांचे आजोबा प्राचीन राजस्थानी डिंगल (वीररस प्रधान काव्य) वाचन परंपरेमध्ये निष्णात होते. १९७० मध्ये मदन कंवर यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला. १९७१ मध्ये उदयपूर विद्यापीठामध्ये विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. १९७३ मध्ये जोधपूर विद्यापीठामध्ये त्यांनी रसायनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९७५ मध्ये जवाहरलाल नेहरू आयुर्विज्ञान महाविद्यालयातील जीवरसायन विभागात नियुक्ती झाली. १९८७ मध्ये जीवरसायनशास्त्रामध्ये पीएच.डी. पूर्ण केली.

चंद्रप्रकाश देवल यांची साहित्य संपदा –  काव्यसंग्रह : राजस्थानीपागी (१९७७), कावड (१९८९), मारग (१९९२), तोपनामा (१९९७), राग-विजोग (१९९८); हिंदीआर्तनाद (१९८८), बोलो माधवी (१९९५), स्मृती गंधा (१९९६), अवसान (१९९९) अनुवाद कार्य  – उपनिसदावली (सात उपनिषदो के काव्यानुवाद सहित,१९९०), काळ मी कुरुजा (अकाल मे सारस या केदारनाथ सिंह या हिंदी काव्यसंग्रहाचा अनुवाद,१९९४), कठै ई नी वठै (कही नही वही या अशोक वाजपेयी यांच्या हिंदी काव्य संग्रहाचा अनुवाद,१९९४), जटायू (शीतांशु यशचंद्र यांच्या जटायू या गुजराती काव्यसंग्रहाचा हिंदी अनुवाद,१९९५), श्री राधा (रमाकांत रथ यांच्या श्री राधा या ओडिया काव्यसंग्रहाचा अनुवाद,१९९६), सबदा रौ आभौ (सीताकांत महापात्र यांच्या शब्देर आकाश का या ओडिया काव्यसंग्रहाचा अनुवाद,१९९६), नी छाया नी तावडौ (हरभजन सिंह यांच्या धुपौ ना छावे या पंजाबी काव्यसंग्रहाचा अनुवाद ,१९९७), लाख पर्याणी करू लांबो (सुभाष मुखोपाध्याय यांच्या जते दुरई या बंगाली काव्य संग्रहाचा अनुवाद,१९९७), सजा (क्राईम एन्ड पनिशमेंट या जगप्रसिद्ध या कादंबरीचा अनुवाद,१९९९), गोडो उरिक में (सेम्युअल बेकेट यांचे जगप्रसिद्ध नाटक वेटिंग फॉर द गोडोचा अनुवाद ,१९९९),इत्यादी.

सत्तरच्या दशकातच आपली मातृभाषा असलेल्या राजस्थानीमध्ये त्यांनी छंदोबद्ध कविता लिहिण्यास सुरुवात केली. स्वत:मधील कवीत्वाची ओळख पटल्यानंतर त्यांना जाणीव झाली की अभिव्यक्त होण्यासाठी मातृभाषेचेच माध्यम योग्य आहे. गणेशलाल व्यास  उस्ताद आणि विजयदान देथा यांच्या लेखनापासून प्रेरणा घेऊन राजस्थानी भाषेमध्ये नवलेखन आणण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी आपला पहिला काव्य संग्रह पागी  प्रसिद्ध केला. राजस्थानी नव कवितेच्या प्रारंभिक काळातील त्यांचा हा काव्यसंग्रह गणला जातो. त्यामुळे देवल यांना एक नवीन ओळख निर्माण झाली. त्यांच्या काव्यातील विविधता ही समकालीन घटनांची वेध घेणारी आणि त्यानुरूप काव्याची भाषा निर्माण करण्याची होती. बऱ्याच अवधीनंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह कावड प्रसिद्ध झाला. त्यातील काव्यानुभव पहिल्या रचनेपेक्षा वेगळा नसला तरी शांत पण परखड भाष्यामुळे वाचकांच्या मनाचा वेध घेणारा होता. राजकारण, सामाजिक व्यवस्था व आर्थिक संबंधावर प्रकाश टाकणे हा देवल यांच्या काव्यसंग्रहातील कवितेचा आशय होता. त्यांचा तिसरा काव्यसंग्रह मारग मध्ये तीन स्तर स्पष्टपणे जाणवतात, ते म्हणजे कवी, विचारवंत आणि प्रेक्षक हे होय. रचनाकार, वाचक आणि समीक्षक या तीन भूमिकांच्या संयोगातून ते आपले शोधकार्य चालू ठेवताना दिसतात. धार्मिक वर्चस्वाला विरोध करताना लोकसंस्कृती आणि लोकजीवनातील अडथळ्यांचा विचार करणाऱ्या देवलांच्या कविता खऱ्या, तर समतोल (बॅलन्स) आणि वैविध्य असणाऱ्या कविता सिद्ध होतात.

देवल यांनी आपल्या भाषेत समीक्षेची असलेली उणीव लक्षात घेऊन आपल्याच रचनेचे विश्लेषक बनले.आपल्याच बनवलेल्या रचनेला पुन्हा तोडून नव्याने रचना केली. तोपनामा  हा त्यांचा पुढचा काव्यसंग्रह हे त्याचे प्रमाण आहे. राजस्थानी कवितेला खऱ्या अर्थाने आधुनिक बनविण्यात चंद्रप्रकाश देवल यांच्या सर्जनशीलतेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.आर्तनाद  या कवितासंग्रहानंतर त्यांना बोलो माधवी (१९९५) या कवितासंग्रहाने हिंदी मधील कवी म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. एकच केंद्रवर्ती प्रतिक किंवा विषय घेऊन त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियेतून ते काव्य विस्तारीत रुपात मांडण्यात ते एक सिद्धहस्त कवी होते. हे त्यांच्या स्मृतीगंधा  या तिसऱ्या हिंदी काव्यातून दिसून येते. हिंदी, ओडिया, पंजाबी, गुजराती, बंगाली आणि संस्कृतमधून आजवर त्यांनी दहा अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. आपली मातृभाषा राजस्थानीला समृद्ध करण्याच्या इच्छेतून जागतिक स्तरावरील दोन अजरामर रचनांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे.

त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे, त्यामध्ये साहित्य अकादेमी पुरस्काराचा समावेश आहे. सातत्याने आपली भाषा आणि त्यातील साहित्याचा विकास आणि प्रसार कसा होईल या दृष्टीने विचार करून प्रयत्न करणाऱ्या चंद्रप्रकाश देवल यांचे नाव समकालीन भारतीय भाषांमधील कवींमध्ये उल्लेखनीय आहे.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/chandra_prakash_deval.pdf