देथाविजयदान : (०१ सप्टेंबर, १९२६१० नोव्हेंबर,२०१३). विजयदान सबलदान देथा उपाख्य बिज्जी. राजस्थानी लोककथा व म्हणींचे संकलक आणि सुप्रसिद्ध राजस्थानी कथाकार. जन्म सबलदान देथा आणि सायर कंवर या दांपत्यापोटी ०१ सप्टेंबर, १९२६ रोजी बोरुंदा (जोधपुर ) येथे झाला . राजस्थानमधील लोकसंस्कृतीचे चित्रण विजयदान देथा यांनी राजस्थानी  लोकशैलीमध्ये व मातृभाषेमध्ये केले. संपूर्ण आयुष्यभर  गावामध्ये राहून त्यांनी  लेखन केले. त्यांनी १९५३ ते १९५५ दरम्यान हिंदी मासिक प्रेरणाचे संपादन केले. त्यानंतर त्रेमासिक रूपम, राजस्थानी संशोधन पत्रिका परम्परा यासह कोमल कोठारी यांच्या सोबत वाङ्मय लोकसंस्कृती या नियतकालिकाचे संपादन केले. समाज परिवर्तनाच्या उद्देशाने त्यांनी कथा लिहिल्या. केवळ शब्दच्छल व परकीय लेखकांचे अनुकरण आणि आभासी विषय यापेक्षा मातीशी इमान राखणारे लेखन त्यांनी केले. राजस्थानी भाषेत ८०० पेक्षा अधिक लघुकथा लिहिणाऱ्या विजय दान यांच्या साहित्यकृती हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. उषा (हिंदी कविता ,१९४६) ; साहित्य और समाज (१९६०), मेरा दर्द ना जाने कोय (१९९७) हे निबंध; अनोखा पॅड (सचित्र बालकथासंग्रह,१९६८),अलेन्खू हिटलर (१९८४),उलझन (१९८२)चौधरायन की चतुराई (१९९६) अंतराल ,सपन प्रिया (१९९७), प्रिया मृणाल (१९९८) इत्यादी लघुकथा संग्रह; अतिरिक्ता (समीक्षा ,१९९७) आणि महामीलन (कादंबरी,१९९८) इत्यादी ग्रंथलेखन त्यांनी केले आहे. मातृभाषेत लेखनावर भर देणाऱ्या बिज्जी यांच्या बहुतांश लेखनाचा अनुवाद त्यांचा मुलगा कैलाश कबीर यांनी हिंदी भाषेत केला आहे. यामध्ये बाताँ री फुलवारीचा फूलवारी हा हिंदी अनुवाद समाविष्ट आहे.

राजस्थानच्या विविधांगी लोकसंस्कृतीचे चित्रण एकाचवेळी हिंदी आणि राजस्थानी लोकभाषेतून देथा यांनी केले आहे. ‘चतुर मेंढपाळ’ ,’मूर्ख राजा’ ,’चालाक भूत’ आणि ‘सुंदर राजकुमारी’ हे देथा यांच्या कथेतील मुख्य आणि लक्षणीय पात्र आहेत. त्यांनी त्यांच्या कथांमधून लोकसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांचा दुवा साधला आहे. यांच्या ३० पेक्षा अधिक कथांवर चित्रपट तयार झाले आहेत. नाट्य अभिनेता हबीब तन्वीर यांनी चरणदास चोर या कथेचे नाट्यरूपांतर केले. ही देथा यांना  दृढ ओळख निर्माण करून देणारी कलाकृती ठरली.त्यांच्या  साहित्यसेवेची दखल घेऊन त्यांना बाताँ री फुलवारी या राजस्थानी पुस्तकासाठी   साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला(१९७४). राजस्थान रा रतन अजमेर पुरस्कार (१९८०)भारतीय भाषा परिषद कोलकाता पुरस्कार (१९९२),  नाहर पुरस्कार मुंबई (१९९५), बिहारी पुरस्कार(२००३), साहित्य चुडामणी पुरस्कार (२००६)इत्यादी पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. हृदयविकाराने बोरुंदा या गावी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • दोमडिया, डी. एम.; मेहता, शैलेश हिंदी साहित्य का विश्वकोश, रावत प्रकाशन, नवी दिल्ली, २०१७.

प्रतिक्रिया व्यक्त करा