डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस : ( ८ ऑगस्ट, १९०२ – २० ऑक्टोबर, १९८४ )

पॉल डिरॅक यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. ब्रिस्टल विद्यापीठातून इंजिनिअरिंगमधली बी.एस्‌सी. (१९२१) आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. (१९२६) या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन व मिशिगन (१९२९) आणि प्रिस्टन (१९३१) या विद्यापीठांत अभ्यागत व्याख्याते म्हणून काम केले. अमेरिकेतून परत इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांची केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१९३२). त्यांनी प्रिस्टन इथल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडीज’ या संस्थेत काम केले (१९४७–४८ मध्ये आणि पुन्हा १९५८–५९).

विशेष म्हणजे, होमी भाभा (Homi Bhabha) यांना पीएच्.डी.साठी पॉल डिरॅक यांनी मार्गदर्शन केले होते. योगायोगाचा भाग असा की, पॉल डिरॅक आणि होमी भाभा या दोघांनीही राल्फ फाउलर (Ralph Fowler) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.केली.

डिरॅक यांनी १९२६ मध्ये इलेक्ट्रॉन आणि तत्सम घुर्णन गती असलेल्या मूलभूत कणांना लागू पडणारी सांख्यिकी शोधून काढली. या सांख्यिकीच्या आधारे वेगवेगळ्या ऊर्जा पातळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनचे विवरण सांगणे शक्य होते. या सांख्यिकीला फर्मी-डिरॅक सांख्यिकी (Fermi Dirac statistics) असे संबोधले गेले; कारण अशाच प्रकारच्या सांख्यिकीचा शोध एनरिको फर्मी (Enrico Fermi) यांनी स्वतंत्रपणे लावला होता.

डिरॅक यांनी १९२८ मध्ये  पुंजयामिकीला सापेक्षता सिद्धांताची जोड देऊन त्यांनी इलेक्ट्रॉनचे संपूर्ण विवरण चार तरंग समीकरणांनी (wave equations) करता येते, ही अभिनव कल्पना मांडली. या समीकरणांवरून इलेक्ट्रॉन्सची परिवलन गती वर्तविता येते. या समीकरणांवरून इलेक्ट्रॉन्सना ऋण ऊर्जा स्थिती असतात, असा निष्कर्ष निघतो. या ऋण ऊर्जा स्थितीचे सुरुवातीला कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. परंतु पुढे एका शोधनिबंधात डिरॅक यांनी अशी कल्पना मांडली की, या ऋण ऊर्जा स्थितीत एखादी पोकळी किंवा रिक्तता निर्माण झाली तर ती धन विद्युतप्रभार असलेल्या इलेक्ट्रॉनचे म्हणजेच पॉझिट्रॉनचे गुणधर्म दाखवेल. पुढे कार्ल डेव्हिड अँडरसन (Carl David Anderson) यांनी पॉझिट्रॉनचा शोधही लावला (१९३२).

या संशोधन कार्यावर आधारित असलेल्या त्यांच्या इलेक्ट्रॉन सिद्धांताकरिता डिरॅक यांना त्यांच्या वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक एर्व्हीन श्रोडिंजर यांच्याबरोबर विभागून देण्यात आले (१९३३). अँडरसन यांनाही पॉझिट्रॉनच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९३६).

रॉयल सोसायटीने डिरॅक यांची सदस्य म्हणून निवड केली (१९३०) आणि त्यांना रॉयल पदक (१९३९) आणि कॉप्ली पदक (१९५२) असे बहुमानही दिले. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती (१९४८). डिरॅक यांना पहिले रॉबर्ट ओपनहॅमर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले (१९६९).

डिरॅक यांनी लिहिलेले ‘क्वांटम थिअरी ऑफ इलेक्ट्रॉन’ (१९२८),‘प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स’ (१९३०), तिसरी आवृत्ती (१९४७) हे ग्रंथ आणि पुंज सिद्धांतावरील त्यांचे अनेक निबंध सुप्रसिद्ध आहेत. १९७५ साली त्यांनी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात पाच व्याख्याने दिली. ही व्याख्याने १९७८ साली ‘डायरेक्शन्स इन फिजिक्स’ नावाने ग्रंथरुपात प्रकाशित करण्यात आली.

आपल्या आयुष्यात डिरॅक यांनी अनेक देशांत भ्रमंती केली आणि तिथल्या विद्यापीठांत अध्ययन आणि अध्यापन केले. या विद्यापीठांमध्ये कोपेनहेगन, गॉटीन्जेन, व्हिस्कॉन्सीन, मिशिगन, प्रिन्स्टन इत्यादी विद्यापीठांचा समावेश आहे.

मूलभूत सैद्धांतिक भौतिकशास्त्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पॉल डिरॅक यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अमेरिकेतील टल्लाहस्सी, फ्लोरिडा (Tallahassee, Florida) इथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रघुनाथ शेवाळे