पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण. महासागरावरून वातावरणात जाणाऱ्या, वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतर चक्र किंवा जलचक्र या संज्ञेने दाखविले जाते. पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाण जवळपास स्थिर असले तरी वातावरणातून पाण्याचे रेणू बाहेर पडत असतात किंवा आत येत असतात. पाणी एका साठ्याकडून दुसऱ्या साठ्याकडे बाष्पीभवन, संघनन, अवक्षेपण (प्रेसिपिटेशन), अंतर्व्यापन (रन-ऑफ) आणि जमिनीखालील प्रवाह यांसारख्या भौतिक प्रक्रियांद्वारे वाहत असते. जसे नद्यांचे पाणी समुद्राला मिळते किंवा समुद्रातील पाणी वाफे च्या स्वरूपात वातावरणात मिसळते. हे घडत असताना पाणी स्थायू, द्रव, वायू या तीनही अवस्थांमधून रूपांतरित होते. जमिनीवर पडणाऱ्या पाण्यापैकी एक-तृतीयांश पाणी महासागराकडे पृष्ठीय अथवा अध:पृष्ठीय जल प्रवाहातून परत जाते. उरलेले दोन-तृतीयांश पाणी बाष्पीभवनामुळे व वनस्पतीच्या बाष्पोच्छ्वासामुळे पुन्हा वातावरणात प्रवेश करते. असे स्थूलमानाने पाण्याचे स्थित्यंतर चक्र सतत चालू असते.

जलस्थित्यंतर चक्र

जलचक्रात उष्णतेची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे तापमानात बदल होतात. जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होते, तेव्हा उष्णता शोषली जाते आणि पर्यावरण थंड होते. जेव्हा संघनन होते, तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते आणि पर्यावरण उष्ण होते. उष्णतेच्या देवाणघेवाणीमुळे पर्यावरणावर परिणाम होतो. जलस्थित्यंतर चक्रामुळे पाण्याचे एका साठ्याकडून दुसऱ्या साठ्याकडे स्थित्यंतर होत असताना पाणी शुद्ध बनते, जमिनीवर ताजे पाणी उपलब्ध होते आणि पृथ्वीवरील खनिजे वेगवेगळ्या भागांत वाहून नेली जातात. यावेळी जमिनीची झीज होते तर काही भागात गाळ जमा झाल्यामुळे निक्षेपण (डिपॉझिशन) होते. महत्त्वाचे म्हणजे या चक्रामुळे पृथ्वीवरील जीवन आणि परिसंस्था टिकून राहतात.

सूर्यामुळे जलस्थित्यंतर चक्र घडून येते आणि त्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील व महासागरातील पाणी तापते आणि या पाण्याची वाफ होऊन ती हवेत मिसळते. बर्फ आणि हिम यांचे रूपांतर थेट पाण्याच्या वाफे त होते. वनस्पतींपासून बाष्पोत्सर्जन होऊन आणि जमिनीतील पाण्याची वाफ होऊन ती हवेत मिसळते. वर जाणारे बाष्पकण हवेच्या प्रवाहांमुळे वातावरणाच्या वरच्या भागात जातात आणि तेथे थंड तापमानामुळे या बाष्पकणांचे संघनन होऊन ढग तयार होतात. हवेच्या प्रवाहाने हे कण सर्वत्र वाहून नेले जातात, ढगांचे कण एकमेकांवर आपटतात व वाढतात आणि वातावरणाच्या वरच्या थराचा  अवपात (अवक्षेपाप्रमाणे) होतो. काही वेळा हा अवक्षेपा हिम किंवा गारांच्या स्वरूपात असतो आणि तो हिमनदीच्या स्वरूपात साचू शकतो, जी हजारो वर्षे गोठलेले पाणी साठवून ठेऊ शकते. बहुतेक पाणी पुन्हा महासागरात किंवा जमिनीवर पडते. त्यापैकी काही पाणी नद्यांमध्ये मिसळते आणि तेथून ते महासागराला जाऊन मिळते. भूजल हे सरोवरांत साचले जाते. पावसाचे सर्वच पाणी नद्यांमध्ये वाहत जात नाही. त्यापैकी काही पाणी जमिनीत वरवर तर काही खोलवर मुरते आणि पाण्याचा साठा पूर्ववत होतो. हे पाणी दीर्घकाळ उपलब्ध होते. जमिनीलगत असलेले पाणी काही वेळा जमिनीवर झिरपते किंवा झऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. कालांतराने पाणी पुन्हा समुद्राला येऊन मिळते आणि पुन्हा जलचक्राला सुरुवात होते.

प्रत्येक परिसंस्थेत असलेल्या निरनिराळ्या घटकांत आंतरक्रिया घडत असतात. या आंतरक्रियांतूनच काही घटकांचे चक्रीय परिवहन उद्भवते. जलस्थित्यंतर चक्र, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऊर्जा चक्र ही याची उदाहरणे आहेत. प्रत्येक परिसंस्था या विविध चक्रांमुळे नियंत्रित होते. मानवी जीवनसुद्धा या चक्रांच्या प्रक्रियेशी जोडलेले आहे. जलस्थित्यंतर चक्रात बदल झाल्यास कृषी, उद्योग, वातावरणातील रासायनिक घटनेत बदल, धरणनिर्मिती, निर्वनीकरण आणि वनरोपण, विहिरी तसेच नद्यांपासून मिळणारे पाणी, शहरीकरण अशा मानवाशी संबंधित असलेल्या बाबींवर परिणाम होऊ शकतो. मानवी कृतींमुळे वातावरणात बदल होत आहेत. वातावरणातील बदलांमुळे पावसाच्या प्रारूपात बदल होत आहे. पावसाचे प्रारूप बदलल्यामुळे जगातील काही देशांत प्रदीर्घ अवर्षण तर काही देशांत महापूर अशी स्थिती निर्माण होत आहे. याचा परिणाम स्थानिक परिसंस्थांवर होऊन त्यातही बदल होत आहेत.

पृथ्वीवरील सु.८६% बाष्पीभवन समुद्रातील पाण्यापासून होत असते आणि त्यामुळे समुद्राचे तापमान घटते. हे तापमान जर कमी झाले नसते तर बाष्पीभवनामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वाढले असते. मानवी हस्तक्षेपामुळे हे जलस्थित्यंतर चक्र विस्कळीत झाले तर पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा