ताकेतोरी मोनोगातारी : अभिजात जपानी ग्रंथ. या ग्रंथाच्या लेखकाच्या नावाबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. एक तर्क असा केला जातो की सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान मिनामोतो शितागो हा याचा लेखक असू शकतो. जपानी नोबेल पुरस्कार विजेते कावाबाता यासुनारीह्यांनी ताकेतोरी मोनोगातारीचे पुनर्लेखन केले आहे. हेइआन कालखंडाच्या १० व्या शतकाच्या सुरूवातीला लिहिल्या गेलेल्या या ग्रंथामध्ये काल्पनिक गोष्टींचा समावेश केला आहे. ह्या पुस्तकामधली कागुया हिमे (प्रकाशाची राजकन्या) ही गोष्ट जपानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. एका लाकूड्तोड्याला बांबूच्या बेटामध्ये एक बांबू चमकताना दिसतो.

कल्पनाचित्र

तो बांबू कापल्यावर त्यातून एक सुंदर मुलगी बाहेर येते. त्या मुलीला तो लाकूडतोडया आणि त्याची पत्नी वाढवतात. चमकणार्‍या बांबू मधून बाहेर आली म्हणून तिचे नाव कागुया म्हणजे तेजाने चमकणारी असे ठेवले जाते. मोठी झालेली कागुया अतिशय सुंदर दिसत असते. त्यामुळे तिचा हात मागण्यासाठी अनेक तरुण लाकूडतोडयाकडे येतात. कागुया त्या सर्व तरुणांपुढे काही गोष्टी घेऊन यायची अट घालते. त्या सर्व गोष्टी मिळवणे कठीण असल्यामुळे  त्या घेऊन येण्यात कोणीच यशस्वी होत नाही. कागुयाच्या सौदर्याची ख्याती ऐकून प्रत्यक्ष जपानचा सम्राटसुद्धा तिच्याशी लग्न करू इच्छितो ; परंतु ती त्याला सुद्धा नकार देते. मात्र दिवसेंदिवस कागुया दु:खी दिसू लागते. सतत चंद्राकडे बघत राहते. तिचे हे वागणे बघून लाकूडतोडया आणि त्याची पत्नी दु:खी कष्टी होतात आणि ते तिला दुःखी असण्याचे कारण विचारतात. तेव्हा ती सांगते की ती चंद्रलोकात राहणारी असून तिथून ती पृथ्वीवर आली होती. आता तिची परत चंद्रलोकात जायची वेळ झाली आहे. त्यामुळे सर्वांना सोडून जायच्या कल्पनेमुळे ती दु:खीकष्टी आहे. लाकूड्तोड्याला खूप दु:ख होते आणि तो सम्राटाला ही गोष्ट सांगतो. सम्राट म्हणतो की तो सैनिक पाठवून कागुयाला वाचवेल. चंद्रावर जाऊ देणार नाही; परंतु तसे होत नाही. कागुया परत चंद्रलोकात निघून जाते. ह्या गोष्टी मध्ये परग्रहावरची व्यक्ती पृथ्वी वर येणे, तसेच चंद्रलोकतून आलेल्या रथाचा आकार यानासारखा असणे ह्या गोष्टी आहेत. हेइआन कालखंडामध्ये लिहीलेल्या ग्रंथामध्ये ह्या गोष्टी आल्या आहेत, ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्या काळच्या लोकांची कल्पनाशक्ती किती अफाट होती ह्याचा प्रत्यय इथे येतो. त्यामुळे या पुस्तकाला जुन्या काळातील वैज्ञानिक काल्पनिक कथा म्हणणे योग्य ठरेल. या केवळ मनोरंजनात्मक कथा असून ह्या कथांमध्ये उपदेशपर भाष्य कुठेही केलेले नाही.

या कथेवर आधारित कार्टून सिनेमे आणि मुलांसाठीची चित्रकथांची पुस्तके जपानमध्ये लोकप्रिय आहेत. इंग्रजी भाषेमध्ये “The tale of Bamboo Cutter” ह्या नावाने त्याचा अनुवाद झाला आहे.

संदर्भ :