समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्ती एकत्र येऊन हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. सामाजिक चळवळी समाजव्यवस्थेत अनुकूल स्वरूपातून सामाजिक बदल घडवून आणतात. समाजातील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांना समोर ठेवून चळवळी आकारास येतात. त्यामध्ये मिरवणूका, मोर्चे, घोषणा, आंदोलने इत्यादी कृतींचा उपयोग केला जातो. ते दृष्य स्वरूपात असतात.

सामाजीक चळवळी हे समाजशास्त्रातील महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र मानले गेले असून त्याचा अभ्यास करत असतांना अनेक अभ्यासकांनी विविध संकल्पनात्मक चौकटी विकसित केल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करत असतांना फुक्स आणि लिन्केन बाख यांनी असे प्रतिपादन केले की, सामाजिक चळवळींच्या अध्यापनाचे अभ्यासक्षेत्र प्रामुख्याने दोन घटकात विभागले आहे. एकीकडे सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासाने चळवळीत सहभाग घेतलेल्या सामाजिक कर्त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर भर दिला; तर दुसरीकडे व्यापक सामाजिक–राजकीय व्यवस्था, संघर्ष यांवर भर देत सामाजिक चळवळींकडे ‘राजकीय प्रकल्पाचे वाहक’ म्हणून बघितले आहे. या संदर्भात रुडाल्फ हेर्बेल, नील स्मेल्सर, जॉन विल्सन, ड्रेसलर व विलिस, हर्बर्ट ब्लूमर, टर्नर व किलियन, लुंडबर्ग, जे. आर. गसफील्ड इत्यादी समाजशास्त्रज्ञ-विचारवंतांनी ‘सामाजिक चळवळ’ या शब्दाची व्याख्या केली आहे.

 • पॉल विल्किंन्सन यांच्या मते, ‘समाजाच्या कोणत्याही थरात मोठ्या प्रमाणावर सामूहिक बदल घडविण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद असे कोणतेही धोरण स्वीकारण्याची तयारी ठेवून केलेले काम म्हणजे सामाजिक चळवळ होय’.
 • पार्थ मुखर्जी यांच्या मते, ‘सामाजिक चळवळ ही सर्वसमावेशक, पर्यायी आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम असते’.
 • जे. आर. गसफील्ड यांच्या मते, ‘प्रस्थापित समाजरचनेत बदल घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामुदायिक स्वरूपाच्या मागण्या म्हणजे सामाजिक चळवळ होय’.
 • जॉन विल्सन यांच्या मते, ‘सामाजिक व्यवस्थेत व्यापक प्रमाणावरील परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडून येणाऱ्या बदलांना प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक, संघटित रित्या, असंस्थीकृत साधनांचा अथवा मार्गांचा अवलंब करून करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय’.
 • रुडाल्फ हेर्बेल यांनी सामूहिक भावनांच्या प्रगटीकरणावर भर दिला आहे. त्यांच्या मते, ‘संघटना बांधणे हे व्यक्तिगत आकांक्षांना सामूदायिक रीत्या प्रगट करण्याचे साधन आहे’. थोडक्यात, व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षांना एकत्रितपणे व्यक्त करण्याचे कार्य म्हणजे सामाजिक चळवळ होय.

वरील व्याख्यांवरून सामाजिक चळवळीचे स्वरूप किंवा प्रमुख अर्थ पुढील प्रमाणे सांगता येते :

(१) सामाजिक चळवळीत अनेक लोक एकत्र येऊन जाणीवपूर्वक व हेतुत: सामुहिक प्रयत्नांतून सामाजिक परिवर्तनाला प्रभावित करणारी एखादी कृती करतात.

(२) सामाजिक चळवळी जुनाट, अमानवी रूढी, परंपरा इत्यादींना विरोध करण्यासाठी तसेच कालबाह्य सामाजिक संकेत, गुलामी, पारतंत्र्य इत्यादींच्या विरोधात नव-स्वातंत्र्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आखल्या जातात.

(३) सामाजिक चळवळीत अंतर्भूत असणारे सामुहिक प्रयत्न कमी-अधिक संघटित स्वरूपातील असणे अभिप्रेत असते.

(४) सामाजिक चळवळीचे स्वरूप सामुदायिक कृतीचे, लवचिक किंवा ताठर असू शकते.

(५) काही सामाजिक चळवळी समाजाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात, तर काही चळवळी अडथळे निर्माण करतात.

(६) चळवळीद्वारा मानवी संबंधामध्ये व परस्परविषयक दृष्टिकोनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न होतो.

समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांना धरून होत नसेल, तर या मूल्यांपासून वंचित असलेला समूह एका समान पातळीवर नेतृत्व, विचारप्रणाली, कार्यकर्ते इत्यादींचे नियोजन करून एकत्र येतो व आंदोलन, चळवळ, मोर्चे, घेराव अथवा उपोषण इत्यादी मार्गांद्वारे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात, सामाजिक चळवळी वा आंदोलने या समाजातील अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेच्या असमाधानकारक कार्याचा परिणाम आहेत. मुळात ‘सामाजिक चळवळ’ ही संकल्पना ‘विकास’ या संकल्पनेप्रमाणे सापेक्ष आहे. त्यामुळे या संकल्पनेची अशी एकमेव व्याख्या करता येणार नाही. ती व्यक्तीपरत्वे व संघटनेपरत्वे बदलू शकते, सामाजिक परिवर्तानाला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे हे प्रमुख उद्दिष्टे सामाजिक चळवळींचे असते.

सामाजिक चळवळींचे अभ्यासक्षेत्र  : सामाजिक चळवळी या सामूहिक क्रिया असल्याने सामाजिक चळवळीसाठी गतिशीलता, विचारप्रणाली आणि दिशाभिमुख परिवर्तन हे तीन घटक फार महत्त्वाचे असतात.  जगभर सुविधा प्राप्त नसलेला समूह मग तो जातीय, वांशिक अल्पसंख्यांक असो किंवा निम्न जाती वर्गातील असो, तो समूह असमानता, भेदकरण आणि वंचितता यांविरुद्ध संघटित होतो व आपले आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकारांसाठी लढत असतो. सामाजिक चळवळी या विशेषत: पर्याय, विचारधारा, कार्यकर्ते, नेतृत्व आणि संघटना या पाच घटकांवर आधारित असतात. हे सर्व घटक एकमेकांवरच अवलंबून आणि एकमेकांना पूरक असतात. स्थानिक प्रश्नांसारख्या संकुचित उद्दिष्टांपासून ते समाजपरिवर्तनाच्या विशाल उद्दिष्टांपर्यंत चळवळींचे उद्दिष्टे बदलत असतात. याशिवाय समाजातील असंतोषाची भावना, चळवळीला प्रेरणा देणारी परिस्थिती आणि गती देणारे नेतृत्व यांचाही चळवळींवर परिणाम होतो.

सामाजिक चळवळीचे टप्पे : सामाजिक चळवळी पुढील टप्प्यांतून मार्गक्रमण करीत विकसित होत असतात.

(१) प्राथमिक अवस्था : समाजव्यवस्थेपुढे रोज अनेक समस्या उभ्या राहतात. काही घटकांवर अन्याय होतो, तर काही घटक विशिष्ट लाभांपासून वंचित राहतो. त्या वेळी त्यांच्यातील अथवा बाहेरील एखादा विचारवंत, समाजसुधारक आपल्या विचारांची मांडणी करतो आणि त्या शोषित समाजाला आपल्याकडे आकर्षित करून चळवळ उदयास आणतो. म्हणजेच समाजव्यवस्थेतील लोकांत असणारी अस्वस्थतेची भावना ही सामाजिक चळवळीच्या निर्मितीची प्राथमिक अवस्था अथवा उगम असतो.

(२) संघटन अवस्था : या अवस्थेत समाजातील लोकांचे हक्क, त्यांवर होणारे अत्याचार, त्यांचे हितसंबंध हे काही लोकांच्या विचारांमुळे पुढे येतात. त्यामुळे पिडित समाज एकत्र संघटित होऊन त्यास चळवळीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामध्ये चळवळीचे निश्चित ध्येयधोरणे आखून कृतिकार्यक्रम आखण्यात येतो. चळवळीचे तत्त्वज्ञान सर्वदूर प्रसारित करून अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळवून चळवळ अधिक संघटित केली जाते.

(३) संस्थागत अवस्था : या अवस्थेत चळवळ समाजात प्रस्थापित होऊन लोकांवर तिचा प्रभाव पडतो आणि तिला समाजमान्यता प्रप्त होते. चळवळीचे नियम, कार्यपद्धती ठरविली जाते. चळवळीचे ध्येय व उद्दिष्टे साध्य होण्याच्या टप्प्यात चळवळ असते. चळवळीपुढे विशेष कार्यक्रम शिल्लक राहत नाही. परिणामी चळवळीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज नसल्याचा विचार अनुयायांमध्ये येऊन संस्थागत अवस्था तयार होते आणि हळूहळू अनुयायी चळवळीतून बाहेर पडतात.

(४) विनाश अवस्था : चळवळी या हक्कांसाठी, उद्दिष्टांसाठी, हेतुंसाठी, ध्येयांसाठी उगम पावतात आणि त्यांची पूर्तता झाली की, चळवळीतील अनुयायी चळवळीपासू दूरावून तिच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. तिच विनाश अवस्था होय. चळवळीचे रूपांतर संस्थेत झाले की, ती चळवळ राहत नाही.

चळवळी वरील टप्प्यांतून मार्गक्रमण करीत असताना काही चळवळी आपले उद्दिष्ट साध्य करतात, तर काही चळवळी अयशस्वी होतात. आज अनेक कामगार चळवळी वरील अवस्थांतून गेल्या आहेत. सामान्यत: विशिष्ट सामाजिक परिस्थितीतच सामाजिक चळवळींचा उदय होत असतो. म्हणजे प्राप्त सामाजिक परिस्थितीविषयी लोकांच्या मनात असमाधानाची भावना निर्माण होणे; आपल्यासारखेच इतरही असंख्य लोक असमाधानात आहेत अशी जाणीव त्यांच्यात निर्माण होणे; प्राप्त परिस्थितीत आपण सामूहिक प्रयत्नांद्वारा बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होणे; कोणीतरी पुढाकार घेऊन लोकांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडणे; काही नैमित्तिक अन्यायकारक घटना घडणे व त्याला तीव्र प्रतिक्रिया उमटणे इत्यादी गोष्टी घडून आल्या की‚ सामाजिक चळवळी निर्माण होत असतात. समाजातील समूहांमध्ये जर असमाधान, सापेक्ष वंचिततेची परिस्थिती, व्यवस्थेबद्दल वैफल्यता असेल, तर सामाजिक चळवळी उदयास येतात.

गेल्या काही दशकांमध्ये सामाजिक चळवळींचे समाजशास्त्र हे समाजशास्त्राचे विस्तारत असलेले अंग आहे. भारतातील आदिवासींच्या आणि शेतकऱ्यांच्या उठावांचे अथवा चळवळींचे अध्ययन हा भारतीय इतिहासाच्या तसेच लोकसमूहांच्या अभ्यासाच्या परंपरेतील प्रमुख प्रवाहाचा भाग आहे. सामाजिक चळवळी या विशेषत: ऐतिहासिक, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय या तीन दॄष्टीकोनातून अभ्यासता येतात. नागरिकांचे नागरी आणि लोकशाही अधिकार हे सांसदीय शासन व्यवस्थेमध्ये सुरक्षित नाहीत. म्हणूनच नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या सुरक्षिततेसाठीच्या चळवळींमध्ये वाढ झाली आहे. सामाजिक चळवळींचे वर्गीकरण प्रामुख्याने भाषिक, धार्मिक, जातीय, वांशिक, सांप्रदायिक, शेतकरी, कामगार, आदिवासी, विद्यार्थी आणि स्त्रिया या सोबतच सामाजिक चळवळींच्या सुधारणावादी, परिवर्तनवादी आणि क्रांतीकारी स्वरूपावरून देखील करता येते. तसेच चळवळींच्या विचारप्रणालीवरून देखील चळवळींचे वर्गीकरण करता येते. सामाजिक चळवळींचे परिवर्तनाच्या गुणवत्तेवरून संचय, पर्यायी, रुपांतरण या तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे.

सामाजिक चळवळींचे प्रकार : विचारप्रणालीयुक्त, संघटनात्मक आणि दैवीगुणाधिष्ठित हे चळवळीचे तीन आदर्श प्रकार सांगितलेले आहेत. हे तीन आदर्श प्रकार संघटन, विचारप्रणाली आणि नेतृत्व या तीन घटकांवर अवलंबून असतात. त्यानुसार कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, स्त्री चळवळ, कष्टकरी चळवळ, विद्यार्थी चळवळ, मध्यमवर्गीय चळवळ, मानवी हक्क आणि पर्यावरणवाद्यांची चळवळ इत्यादी चळवळींचे प्रकार सांगता येतील. प्रत्येक चळवळीचे स्वरूप भिन्नभिन्न असतात. एखादी चळवळ दुसऱ्या चळवळीच्या वैशिष्ट्यांचे कमी-अधिक मिश्रण असणारी असू शकते. तरीसुद्धा चळवळींच्या प्रमुख उद्दिष्टांवरून त्यांचे ठळक प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील.

(१) सुधारणा चळवळ : समाजाच्या मुलभूत सामाजिक संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल गडवून न आणता समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ म्हणजे सुधारणा चलवळ होय. या चळवळीला समाजातील काही मूल्ये व प्रथा मान्य असतात, तर काही मूल्ये व प्रथांना विरोध असतो. अशा प्रथा व मूल्यांत बदल घडवून आणण्याचा या चळवळीचा प्रयत्न असतो. समाजसुधारकांना समाजव्यवस्था पूर्णपणे बदलावी असे न वाटता, समाजव्यवस्थेतील काही वाईट प्रथा, रूढी, परंपरा बदलावी असे वाटते. म्हणजेच समग्र समाजव्यवस्थेला त्यांचा विरोध नसून त्यातील काही पैलूंत बदल घडावे आणि उर्वरित व्यवस्था आहे तशी राहावी, असे त्यांना वाटते. समाजसुधारक नेहमी आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी घटनात्मक, शांततामय मार्गांचा अवलंब करतात. उदा., व्याख्याने, सभा-संमेलने, लेख इत्यादी. तसेच ते शासनाकडे अर्ज करतात, कायदे पास करण्यासाठी शासनावर दबाव आणतात. लोकशाही समाजात लोकांना आपले मत मांडणे, विरोध प्रकट करणे, सामाजिक संस्थेच बदल घडवून आणणे इत्यादीबाबतींत स्वातंत्र असल्यामुळे सुधारणा चळवळी लोकशाही समाजात जास्तीत जास्त निर्माण होतात.

भारतीय समाजात एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अनेक सुधारणा चळवळी अस्तीत्वात आल्या. उदा., ब्राम्हो समाज. या चळवळीत सती बंदी, विधवापुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसाठी राजा राममोहन रॉय या समाजसुधारकांनी अथक प्रयत्न करून सुधारणा घडवून आणल्या. स्त्रीवादी चळवळ वा स्त्रीमुक्ती चळवळ ही आजची सुधारणा चळवळ होय.

(२) क्रांतिकारक चळवळ : समाजव्यवस्थेत सापेक्षत: संपूर्ण, अचानक आणि सामान्यत: हिंसक मार्गाने घडून येणारे परिवर्तन म्हणजे क्रांती होय. क्रांतीमुळे समाजात हळुहळु, टप्प्याटप्प्यांने, शांतततामार्गाने, सातत्याने घडून येणाऱ्या व्यापक स्वरूपाचे परिवर्तन घडून येते. उदा., औद्योगिक क्रांती. सामाजिक चळवळींना जेव्हा क्रांतिकारक चळवळी म्हटले जाते, तेव्हा समग्र समाजव्यवस्थेत अल्पावधीतच व्यापक प्रमाणावरील संस्थात्मक स्वरूपाचे मूलगामी बदल घडून येणे सामान्यत: अपेक्षित असते. प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये बदल करून नवीन समाजव्यवस्था अस्तीत्वात आणणे हे क्रांतिकारी सामाजिक चळवळीचे प्रमुख उद्दीष्ट असते. क्रांतिकारक चळवळीच्या माध्यमातून समाजसुधारक केवळ समाजव्यवस्थेतील दुषित व्यवस्था काढत असतो; मात्र क्रांतिकारक हा संपूर्ण प्रस्थापित समाजव्यवस्थाच बदलून त्या जागी सुयोग्य समाजव्यवस्था आणत असतो. त्यामुळे समाजसुधारक आणि क्रांतिकारक हे एकमेकांविरोधी असल्याचे दिसते. समाजव्यवस्थेतील बदल किती प्रमाणात घडवून आणायचा आणि त्यासाठी कोणता मार्ग अवलंबायचा यांबाबतीत दोहोंत भेद असतो.

लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र सामाजिक असंतोष असेल, तरच क्रांतिकारक चळवळ तयार होत असते. लोकशाही समाजात लोकांना आपल्या असंतोषाची अभिव्यक्ती करण्यासाठी अनेक मार्ग, पद्धती उपलब्ध असतात. लोक जाहीरपणे रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त करू शकतात; मात्र शासन समाज रस्त्यावर उतरायच्या आधीच संबंधित गोष्टीची दखल घेऊन समाजाचे समाधान होईल असा निर्णय घेतो व शासकीय धोरणांत तसेच कायद्यात बदल करते. यामुळे क्रांती उग्र स्वरूप धारण करीत नाही. याउलट ज्या ठिकाणी हुकूमशाही आहे, त्या ठिकाणच्या समाजव्यवस्थेतील असंतोष सत्ताधाऱ्याकडून दाबून टाकले जाते. परंपरागत आहे तशी समाजव्यवस्था टिकून ठेवली जाऊन सुधारणा होऊ दिल्या जात नाही. कालांतराने अशा ठिकाणी क्रांती घडून येते. उदा., झिंबाबब्वे (ऱ्होडेशिया) येथील ‘ब्लॅक गुरीला चळवळ’.

(३) पुनरुज्जीवनवादी चळवळ : परिवर्तनाला विरोध करून पंपरागत मूल्ये, विचारप्रणाली यांकडे अधिक लक्ष देऊन पूर्ववत स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याचा उद्देश या चळवळीचा असतो. हिला प्रतिगामी चळवळ असेही म्हणतात. ही चळवळ परिवर्तनात्मक विकास न घडवता अधोगतीचे प्रतिक म्हणून कार्य करते. पुन्हा मागे जाणे, हा या चळवळीचा उद्देश असतो.

(४) प्रतिकार चळवळ : समाजव्यवस्थेत झालेला बदल नष्ट करणे किंवा होत असलेला बदल थांबविणे किंवा त्याचे निर्मूलन करणे, हा प्रतिकार चळवळीचा मुख्य उद्देश असतो. परंपरागत आदर्श, मूल्ये, परंपरा, विशिष्ट भूमिका या बाबी नैतिक स्वरूपाच्या अधपतन, राजकीय भ्रष्टाचार, नवनवीन कायदे इत्यादींमुळे नष्ट होत आहेत; या भावनेतून ही चळवळ आकारास येते. जेव्हा जेव्हा काही बदल वेगाने घडून येतात आणि प्रस्थापित समाजव्यवस्था कोलमडू लागते, तेव्हा तेव्हा प्रतिकार चळवळीचा उदय होतो. उदा. हिंदी भाषा विरोधी चळवळ.

(५) स्थलांतर चळवळ : शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे करण्यात येणाऱ्या स्थलांतराला स्थलांतर चळवळ म्हणतात. एखाद्या ठिकाणी राहणे जेव्हा अनेकांना असंतोषजनक वाटते आणि दुसऱ्या ठिकाणी आपली प्रगती होईल असा सामूहिक विचार अनेकांच्या मनात येतो, तेव्हा तो समूह पूर्वठिकाणाहून नवीन ठिकाणी जाण्याचे ठरवून स्थलांतर करतात, त्यास स्थलांतर चळवळ म्हणतात. उदा., १९६१ मध्ये बर्लिनची भिंत बांधण्यापूर्वी पूर्व जर्मनितील सुमारे ४० लाख लोकांनी स्थलांतर केले.

(६) अभिव्यक्ती चळवळ : प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या स्वरूपामुळे जेव्हा लोकांचा भावनिक, मानसिक कोंडमारा होतो; त्यांना भौतिक व सामाजिक स्थितीतून किंवा अशा समाजव्यवस्थेला टाळता येणे शक्य नसते; अशा समाजव्यवस्थेपासून स्वत:ची सुटका करून घेण्यास आपण असमर्थ असल्याची मानसिकता बनते, तेव्हा अभिव्यक्ती चळवळी जन्मास येतात. साधरणपणे आपले वर्तमान दुख: विसरून, आपल्या जीवनातील असमाधान व चिंता यांपासून मुक्त होऊन मन:शांती प्राप्त करण्याच्या उद्देशाने लोक एकत्र येऊन या चळवळीत सहभागी होतात. मनाला जे चांगले वाटेल, त्याप्रमाणे रमणे आणि स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून देऊन स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी अनेक लोक जेव्हा सामूहिक प्रयत्न करतात, तेव्हा त्यास अभिव्यक्ती चळवळ म्हणतात. उदा., अमेरिकेतील ‘हिप्पी चळवळ’, ‘हरे राम हरे कृष्ण चळवळ’ इत्यादी.

(७) धर्मपंथीय चळवळ : विशिष्ट धर्मांतर्गत एखाद्या तत्त्वाचा अंगीकार करणाऱ्या लोकांचा पंथ धर्मात अस्तित्वात येतात आणि विशिष्ट तत्त्वांना पुढे ठेवून ते एक समान आचरण करीत असतात. यातून धार्मिक संकेत आकारास येऊन त्याप्रमाणे लोक वर्तन करतात आणि धर्मपंथीय चळवळी जन्मास येतात. उदा. ओशो पंथीय चळवळ.

(८) आदर्श समाजवादी चळवळ : संपूर्ण समाज आदर्श समाज बनविणे वास्तवता शक्य नसल्याने एखाद्या लहानशा समुदायात आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळी म्हणजे आदर्श समाजवादी चळवळ होय. विषमता, शोषण, अन्याय, जुलूम जबरदस्ती, मानवी मूल्यांचा ऱ्हास इत्यादी दोषांपासून मुक्त असे मानवी मूल्यांचा विकास व्हावा, हे ध्येय आदर्श समाजवादी चळवळी बाळगतात. उदा., अमेरिकेतील ‘कम्युनन्स’ चळवळ.

सामाजिक चळवळीबाबत विश्लेषण करतांना १९९० नंतर भारतीय अर्थकारणात जे महत्त्वाचे बदल झाले, त्यातून दोन प्रकारच्या सामाजिक चळवळी उदयास आल्या. एका बाजूला शासनाच्या विकासविषयक धोरणांमुळे जे समूह प्रकल्पग्रस्त होऊन विस्थापित झाले त्या समूहांच्या चळवळी, आदिवासींच्या चळवळी, भटक्या विमुक्तांच्या चळवळी, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या चळवळी, पर्यावरण रक्षणाच्या चळवळी इत्यादी सुरू झाल्या. तशाच दुसऱ्या बाजूला धार्मिक मूलतत्त्ववादी चळवळी, जमातवादी चळवळी, नव-अध्यात्मिक चळवळी, नव-आरक्षणवादी चळवळी, प्रदेशवादी चळवळी यांनीही भारतीय लोकशाहीचा सामाजिक अवकाश व्यापला गेला.

सामाजिक चळवळीचे कारणे : समाजापुढील विविध प्रश्न, सामाजिक उद्दिष्टपूर्तीच्या प्रक्रिया, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीच्या आधारे सामाजिक चळवळींची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतात.

(१) सांस्कृतिक प्रवाह : एखाद्या समाजव्यवस्थेत पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरागत सात्विक वैशिष्टे व वर्तनप्रकार यांत होणाऱ्या बदलांना सांस्कृतिक प्रवाह म्हणतात. साधारणपणे सर्वच समाजामध्ये सांस्कृतिक प्रवाहाची प्रक्रिया मंद गतीने चालू असते. या मंद गतीचा वेग वाढावा व समाजाची प्रगती जलद गतीने व्हावी, या उद्देशातून सामाजिक चळवळी आकाराला येतात.

(२) सामाजिक विघटन : सामाजात उद्भवणाऱ्या अनेक समस्या तसेच व्यक्तींच्या स्वैर वर्तनामुळे समाजातील नीतिनियम, प्रमाणके, मूल्यव्यवस्था इत्यादींप्रमाणे व्यक्ती वर्तन न करता स्वमताप्रमाणे वर्तन करतो आणि विघटनाची प्रक्रिया घडून येते. यामुळे समाजातील ही विघटनात्मक परिस्थिती व्यक्तींना विचलित करते. त्यांच्या मनात असुरक्षितता, वैफल्य इत्यादी भावना जागृत होऊन त्यातून सामाजिक चळवळ उदयास येते.

(३) सामाजिक असंतोष : प्रस्थापित समाजव्यवस्थेविषयी लोकांच्या मनातील व्यापक सर्वसामान्य असमाधान म्हणजे सामाजिक असंतोष होय. व्यापक व बहुसंख्य लोकांच्या मनात असमाधानाची भावना सापेक्ष वंचितता, अन्यायाचे संवेदन आणि सामाजिक दर्जा – विसंगती या कारणांमुळेही सामाजिक चळवळी निर्माण होतात.

समाजशास्त्रीय विचारवंतांमध्ये सामाजिक चळवळी किंवा सामाजिक आंदोलनाविषयी वेगवेगळी मतप्रवाह दिसून येतात. (१) काही समाजशास्त्रज्ञ इतर प्रकारचे सामूहिक वर्तनप्रकार आणि सामाजिक चळवळी या दोहोंत जवळचा संबंध असल्याचे मानतात, तर काहीजण सामाजिक चळवळी या एका विशिष्ट स्वरूपाचा सामूहिक वर्तनप्रकार आहे, असे मानतात. (२) काहींच्या मते आंदोलने म्हणजे सामाजिक व्यवस्थेवरील नकारात्मक मतप्रदर्शन होय. (३) सामाजिक आंदोलने संस्थात्मक संरचना, विचार करण्याच्या पद्धती, नियमने, नैतिक मूल्ये यांना आव्हान देतात आणि काही वेळा पर्यायही पुढे ठेवतात. (४) आंदोलने संघर्षात्मक दृष्टीकोनातून सामाजिक घटनांचा अन्वय लावतात, म्हणून ते स्थैर्यविरोधी असतात. (५) आजच्या आपल्या सामाजिक आयुष्याची अनेक वैशिष्ट्ये आंदोलनाचे फलित म्हणूनच अस्तित्वात आलेली असतात. वरील मुद्द्यांवरून शास्त्रज्ञांमध्येही सामाजिक चळवळींबद्दल एकमत नसल्याचे दिसून येते.

संदर्भ :

 • खैरनार, दिलीप, समाजशास्त्र परिचय, पुणे, २००८.
 • धनागरे, द. ना., संकल्पनांचे विश्व आणि सामाजिक वास्तव, पुणे, २००५.
 • भोळे, भास्कर; बेडकिहाळ, किशोर, बदलता महाराष्ट्र, सातारा, २००४.
 • व्होरा‚ राजेंद्र; पळशीकर‚ सुहास, भारतीय लोकशाही : अर्थ आणि व्यवहार, पुणे, २०१०.
 • शाह, घनश्याम, भारतातील सामाजिक चळवळी, पुणे, २०१०.
 • साळुंखे‚ सर्जेराव, समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पुणे, २०१७.
 • सुमंत, यशवंत, भारतीय लोकशाहीचे चर्चाविश्व : काही निरीक्षणे, पुणे, २०१२.
 • Fucha and Linken bach , The Oxford Indian Campanion to Sociology and Social Anthropology, New Delhi, 2003.
 • Oommen, T. K., Social Movement, New Delhi, 2010.
 • Rao, M. S., A Social Movements and Social Transformation, New Delhi, 1979.
 • Singh, Rajendra, Social Movements, Old and New a Postmodernist Critique, New Delhi, 2001.

समीक्षक  : मयुरी सामंत