तन्दुलवैचारिक प्रकीर्णकम् : (तंदुलवेयालिय पइण्णयं). अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील हे पाचवे प्रकीर्णक आहे. हे प्रकीर्णक गद्य-पद्य मिश्रित आहे. १०० वर्षांचा पुरुष तांदूळाचे दाणे खातो त्या संख्येचा निर्देश करणारे तंदुलवैचारिक हे शीर्षक दिले आहे. यात १३९ गाथा असून पुण्यविजयजी मुनी व अमृतलाल मोहनलाल भोजक यांनी संपादित केलेल्या पइण्णय सुत्ताइं ग्रंथाच्या प्रथम भागमध्ये १७७ गाथा आहेत. या प्रकीर्णकात महावीर व गौतम गणधरांचा संवाद आहे. स्त्री पर्यायवाची शब्दाच्या म्हणजे नारी, महिला, प्रमदा, रामा, अंगना, ललना, योषिता, वनिता यांच्या अनेक व्युत्पत्ती दिल्या आहेत. या ग्रंथात गर्भविषयक सविस्तर वर्णन आले आहे. प्रमाण गर्भवासकाल, गर्भोत्पत्तियोग्य योनीचे स्वरूप, स्त्री योनीचा व पुरुष वीर्याचा प्रलभन काळ, उत्कृष्ट गर्भवासकाळ, गर्भगत जीवाचे पुरुषजातीचे ज्ञान, गर्भोत्पत्ती व गर्भाचा विकासक्रम, गर्भातील जीवाच्या आहाराचे प्रमाण, आहारविधी व आहारासंबंधी वर्णन, गर्भाला माता व पित्याकडून मिळणारे अवयव, गर्भस्थ जीवाचे नरक व देव लोकातील उत्पत्तीविषयक निरूपण, बाळाला आईसारखा स्वभाव, प्रसुतीचे प्रकार वर्णिले आहेत. प्रसूती वेदनावर्णन, शंभर वर्षाच्या माणसाच्या दहा दशा व त्यांचे वर्णन, सुख व दुःखाच्या प्रसंगी धर्माचरण करण्याचा उपदेश व पुण्यकर्म करण्याचा उपदेश, युगलिक, अर्हत वगैरेंचे धर्म वर्णन, सध्याच्या मनुष्याच्या देह-संहननादिचे वर्णन व धार्मिक लोकांची प्रशंसा, १०० वर्ष आयुष्य असलेल्या मनुष्याच्या आयुष्याचे विभाग, त्यांचा आहार व वस्त्र उपभोग वगैरेचे वर्णन, काळाचे समय, उच्छास वगैरे विभाग व कालदर्शक घटिकायंत्र त्याचा विधी, वर्षाचे मास पक्ष वगैरे भाग, आयुष्याची अनित्यता-निरूपण, शरीराची अनित्यता, शरीररचना वगैरे वर्णन, शरीराचे सौंदर्य व शरीराची शुद्धता यांचे वर्णन, स्त्री देहाच्या अंगोपांगाविषयी निर्वेदजनक उपदेश, स्त्री शरीर व स्त्रियांचे विविध स्वभाव व त्यापासून विरागी होण्याचा उपदेश, उपदेश करण्यायोग्य जनांचे वर्णन, पिता, पुत्र, मित्र व भार्या यांचे संरक्षण, धर्म, माहात्म्य, शरीर स्वरूपाचा उपसंहार हे विषय या ग्रंथात आले आहेत. यावर विजयविमल गणींची वृत्ती आहे.
संदर्भ :
- जैन, जगदीशचंद्र ; मेहता, मोहनलाल, जैन साहित्य का बृहद् इतिहास, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६.
समीक्षक : कमलकुमार जैन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.