समुद्रगुप्त : ( इ. स.  ३२०–३८०). गुप्त राजघराण्यातील एक थोर व पराक्रमी राजा (कार. ३३५–३७६). पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी लिच्छवी-राजकन्या कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. गुप्त सम्राटांच्या इतिहासाविषयी माहिती देणारी साधनसामग्री विखुरलेली आणि पुष्कळशी खंडित स्वरूपाची आहे. त्यातही समुद्रगुप्ताच्या संदर्भातील ऐतिहासिक साधने कमी आहेत. काही अभिलेख व नाणी उपलब्ध असली, तरी या प्राचीन भारतातील या सर्वश्रेष्ठ सम्राटाविषयी हर्षचरित सारखा स्वतंत्र चरित्रग्रंथ नाही. अलाहाबाद स्तंभलेख (प्रयाग प्रशस्ती) आणि  एरण पाषाणलेख या अभिलेखांमधून आपल्याला समुद्रगुप्ताविषयीची माहिती मिळते. मत्स्यपुराणात चंद्र गोत्रातल्या ‘चंदमस’ राजाच्या प्रमति या पुत्राच्या दिग्विजयाचे वर्णन आहे. कदाचित ते समुद्रगुप्ताचे असावे, असा अंदाज आहे. अलाहाबाद स्तंभलेखात समुद्रगुप्ताचा उल्लेख लिच्छवीदौहित्र असा करण्यात आलेला आहे. त्याच्या पत्नीचे नाव दत्तदेवी होते.

समुद्रगुप्ताचे नाणे.

समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीचे राज्यारोहण, राज्यविस्तार व स्थिर शासन असे तीन टप्पे आहेत. वयाने राजपुत्रांमध्ये कनिष्ठ असूनही चंद्रगुप्ताने त्याला वारस म्हणून निवडले असे, अलाहाबाद स्तंभलेखावरून दिसते. समुद्रगुप्ताला वारसा म्हणून मिळालेले राज्य बिहार, पूर्व व मध्य उत्तर प्रदेशचा काही भाग यांपुरते मर्यादित होते. परंतु समुद्रगुप्ताने तीन मोठ्या मोहिमा काढून राज्यविस्तार केला.

समुद्रगुप्ताने आर्यावर्तामधे प्रामुख्याने चार नागवंशीय राजांना जिंकून त्यांचे प्रदेश स्वतःच्या राज्याला जोडले. नंतर दक्षिणापथावर स्वारी करून बारा राजांचा पराभव करून त्यांना मांडलिक म्हणून पुन्हा राज्य परत दिले. यावेळी त्याने दक्षिणेत कांचीपुरम्पर्यंत मजल मारली होती. तसेच त्याने पंजाब, राजस्थान, मध्य भारत, बंगाल व आसाम अशा अनेक भागांतील छोटीमोठी सत्ताकेंद्रे संपुष्टात आणून संपूर्ण भारतीय उपखंडात विस्तार असलेले बळकट साम्राज्य निर्माण केले.

समुद्रगुप्ताचे राजकीय धोरण व प्रशासन परिपक्व होते. त्याच्या शासनाला हरिषेणाने ‘प्रचंड शासन’ म्हटले आहे. तो आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून (युक्तपुरुष) सर्व सामंत राजांवर सतत देखरेख करत असे (नित्यव्यापृत). तो साम-दाम वापरून पाही; पण आवश्यकता पडेल तेव्हा कठोरपणे दंड देत असे. अच्युत (अहिच्छत्र), नागसेन (पद्मावती) व गणपतीनाग (मथुरा) या नागराजांना सुरुवातीला फक्त राज्यभ्रष्ट करून सोडून दिले, पण त्यांनी पुन्हा उठाव केल्यावर त्यांना पूर्णपणे नष्ट करून टाकले. तरीही पुढील काळात क्षमाशीलपणा दाखवून समुद्रगुप्ताने नागवंशाशी वैवाहिक संबंध जोडले. समुद्रगुप्ताचे राजकारण व धोरण व्यवहारी आणि मोठया साम्राज्याला योग्य असेच होते. समुद्रगुप्ताने विचारपूर्वक राजधानीजवळचा सर्व भाग गुप्तराज्यात थेट सामील केला व त्यावर प्रत्यक्षपणे सम्राटाचे नियंत्रण राखले. दूर अंतरावरील गणराज्ये व दक्षिणेतील राजांना राज्यांतर्गत स्वतंत्र धोरण वापरण्याची मुभा ठेवली; पण त्यांच्याकडून करवसुली मात्र केली.

मध्य भारतातील आटविक राज्ये जिंकल्यावर समुद्रगुप्ताने अठरा छोट्या राज्यांची पुनर्रचना करून चार मोठी राज्ये बनवली व नवीन मांडलिक/सेवक राजे तयार केले. तसेच काही प्रदेशांमधे मूळ राजवंशाच्या जागी केंद्रीय सत्तेशी निष्ठा ठेवणारी नवीन राजघराणी आणली (उदा., पश्चिम माळवा व कामरूप), काही ठिकाणी केंद्रीय सत्तेशी मांडलिक राज्ये निष्ठावंत राहावीत म्हणून वैवाहिक संबंध जोडले. यातूनच पुढील काळात नागवंशातील कुबेरनागा ही सून करून घेतली आणि इ. स. ३७० नंतर वाकाटक राजघराण्यात प्रभावतीगुप्त ही आपली नात दिली.

समुद्रगुप्ताचे साम्राज्य स्थिर होते. सरंजामशाहीची सुरुवात समुद्रगुप्ताच्या काळात झाली. राजेमहाराजांना सेवक हा दर्जा देणे, सेनापती व मंत्री सम्राटाच्या चरणाचे दास मानणे (वैयक्तिक निष्ठा), साम्राज्यातील अधिकारी वंशपरंपरागत करणे, जमिनीसह प्रशासकीय व दंडाधिकारांचे खालच्या पातळीवर हस्तांतरण करणे ही सरंजामशाहीची वैशिष्ट्ये त्याच्या कारकिर्दीत दिसतात.

समुद्रगुप्ताची सहा प्रकारची सोन्याची नाणी उपलब्ध आहेत. त्यांना राजदंड प्रकार, धनुर्धारी प्रकार, परशु प्रकार, व्याघ्र-पराक्रम प्रकार, अश्वमेध प्रकार व वीणावादक प्रकार या नावांनी ओळखले जाते. राजदंड प्रकारच्या नाण्यांवर कुषाण प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. यात राजा उभा असून अंगात कोट व तंग विजार आहे. डोक्यावर टोपी असून डाव्या हातात राजदंड दिसतो. धनुर्धारी प्रकारच्या नाण्यावर डाव्या हातात धनुष्य, तर उजव्या हातात बाण घेतलेला राजा उभा असून बाजूला गरुडध्वज व खाली ‘समुद्र’ ही अक्षरे दिसतात. परशु प्रकारच्या नाण्यावर ’कृतांताचा (यमाचा) परशु धारण करणारा, अजिंक्य राजांना पराभूत करणारा राजा विजयी आहे’, असे लिहिलेले दिसते. अश्वमेध प्रकारच्या नाण्यांवरील चित्रण तैत्तिरीय संहितेप्रमाणे असून ‘अश्वमेध करणारा राजाधिराज पृथ्वी जिंकून स्वर्ग जिंकतो’, असा कडेला गोलाकार लेख दिसतो. व्याघ्र-पराक्रम प्रकारच्या नाण्यांवर डोक्यावर उष्णीष असलेला राजा चवताळळेल्या वाघाला बाण मारत आहे, असे चित्रण दिसते. मागच्या बाजूवर मकरावर उभी गंगा दाखवलेली असून  ‘राजा समुद्रगुप्तः’ ही अक्षरे दिसतात. वीणावादक प्रकारच्या नाण्यांमध्ये मंचकावर मांडी घालून बसलेला राजा वीणा वाजवतो आहे असे दृश्य असून ‘महाराजाधिराज समुद्रगुप्तः’ अशी अक्षरे दिसतात. समुद्रगुप्ताची चांदीची व तांब्याची नाणी पूर्वी माहित नव्हती, त्यामुळे गुप्तांच्या अर्थकारणाविषयी चुकीचे निष्कर्ष काढले गेले होते.

समुद्रगुप्त स्वतः परंपरागत हिंदू धर्माचा पुरस्कार करणारा असून त्याने अश्वमेधासह अनेक यज्ञ पुन्हा सुरू केले. तथापि त्याने इतर पंथ वा धर्मपरंपरांना मोकळीक दिली असावी, कारण आर्यमंजुश्रीमूलकल्प यासारख्या बौद्ध ग्रंथाने त्याचे वर्णन मानवापेक्षा श्रेष्ठ व जणू देव असे केले आहे. वसूबंधू हा महान बौद्ध विद्वान त्याच्या पदरी होता. एक कुशल अजिंक्य सेनापती व शंभर लढायांमधील विजयी वीर (समरशत) असूनही तो स्वतः साहित्य-संगीतप्रेमी, कवी, विद्वान व सत्पुरुषांच्या संगतीत रमणारा होता. प्रयागप्रशस्तीनुसार तो ‘सज्जनांचा उत्कर्ष व दुर्जनांचा विनाश करणारा आणि दीनदुबळे, अनाथ व रोगी यांना संरक्षण देण्याचे व्रत घेतलेला’ असा मानला, तरी त्याच्या जनकल्याणविषयक भूमिकेबद्दल स्वतंत्रपणे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

संदर्भ :

  • Goyal, S. R. & Goyal, Shankar Eds., Indian Art of the Gupta Age, Jodhpur, 2000.
  • Goyal, S. R. The Imperial Guptas, Jodhpur, 2005.
  • Sharma, T. R. A Political History of the Imperial Guptas, New Delhi,1989.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        समीक्षक : रूपाली मोकाशी