तपकिरी मातीने माखलेल्या पांढऱ्या नायट्राटाइन स्फटिकाचा नमुना.

सोडा नायटर हे सोडियमचे खनिज असून ते नायट्राटाइन (Nitratine), चिली सॉल्टपीटर (Chile saltpeter) व नायट्राटाइट (Nitratite) या नावाने ओळखले जाते. त्याच्या निक्षेपालाही चिली सॉल्टपीटर म्हणतात. सोडियम नायट्रेट (Sodium Nitrate) या रासायनिक संघटनावरून त्याचे सोडा नायटर हे नाव आले आहे. त्याचे समांतर षट्फलकीय स्फटिक विरळाच आढळतात. कठिनता १.५ – २, वि. गु. २ – २.९, चमक काचेसारखी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी; चव शीतकारी, रा. सं. NaNO3, रंग पांढरा, तांबूस, उदसर, करडा वा पिवळसर. ते पाण्यात पूर्णपणे व सहजपणे विरघळते. त्यामुळे हे चिघळणारे (आर्द्रविद्राव्य) खनिज शुष्क वाळवंटी भागांतच आढळते. ते मुख्यत्वे पुटांच्या रूपात व थरांमध्ये संपुंजित रूपात आढळते. ते कॅल्साइट या खनिजाशी समरूप असल्याने त्याचे प्रकाशीय गुणधर्म कॅल्साइटसारखे असतात.

उत्तर  चिली  व  त्यालगतचा  बोलिव्हियाचा  भाग  येथे  सोडा  नायटरचे  फार  मोठे  साठे  आहेत.  चिलीमध्ये ते खणून काढल्यावर त्याचे परिष्करण (शुद्धीकरण) करतात. नायट्रोजनचा स्रोत म्हणून त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अम्ल, नायट्रेट, स्फोटक द्रव्ये व खते यांच्या निर्मितीत मुख्यत: त्याचा उपयोग होतो. बंदुकीच्या दारूतही त्याचा उपयोग करता येतो. मात्र ही दारू नेहमीच्या नायटर (पोटॅशियम नायट्रेट) युक्त बंदुकीच्या दारूपेक्षा अधिक आर्द्रताशोषक व मंदपणे जळणारी असते.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर