रंगहीन व सूईसारखे स्फटिक असलेला स्कोलेसाइट

स्कोलेसाइट हे झिओलाइट गटातील खनिज असून नॅट्रोलाइटशी याचे साम्य आहे. कृत्रिम रीतीने बनविलेल्या या निर्जलीकृत खनिजाला मेटास्कोलेसाइट हे नाव मुळात दिले होते. मात्र तापविले असता हे कृमीप्रमाणे कुरळे होते. यामुळे कृमी अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे स्कोलेसाइट हे नाव पडले आहे. याचे स्फटिक एकनताक्ष, बारीक सुईसारखे व प्रचिनाकार असतात. हे संपुंजित, तंतुमय, नाजुक अरीय त्रिज्यीय मांडणीचे पुंज व ग्रंथिल रूपांतही आढळते. पाटन (110) जवळजवळ परिपूर्ण; कठिनता ५ – ५.५; वि. गु. २.१६ – २.४०; रंगहीन वा पांढरे; पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी; चमक काचेसारखी, तंतुमय प्रकाराची रेशमासारखी, रा. सं. [CaAl2Si3O10.3H2O]. अम्लाबरोबर याचे नॅट्रोलाइटप्रमाणे जिलेटिनीकरण होते.

स्कोलेसाइट हे मेसोलाइट, एडिंग्टनाइट व गोनार्डाइट या खनिजांबरोबर आढळते. हे द्वितीयक (निर्मितीनंतरच्या इतर भूशास्त्रीय क्रियांनी तयार झालेले) खनिज आहे. हे जर्मनी, स्वित्झर्लंड, आइसलँड, फेअरो बेटे व ग्रीनलंड येथे आढळते. महाराष्ट्रातील दक्षिण ट्रॅप खडकांतील पोकळ्यांमध्ये सूक्ष्म स्फटिकांच्या रूपात आढळते. नाशिक, अहमदनगर, थळ घाट, पुणे व लोणावळा परिसर येथे हे आढळतात.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.