लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट : ( १५ एप्रिल, १९४३ )

लेफ्कोवित्झ यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे वंशज पोलंडमधून एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ते प्राथमिक शाळेत असताना वैद्यकशास्त्रातील सुरस आणि विलक्षण गोष्टी आवडीने वाचत असत. ब्रॉक्स येथील शाळेत शिक्षण झाल्यावर कोलंबिया महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयाची बॅचलर ऑफ आर्ट ही पदवी संपादन केली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठाच्या फिजिशियन ॲण्ड सर्जन महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवून ते डॉक्टर  झाले. येथूनच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ या संस्थेत त्यांनी १९६८ ते १९७० पर्यंत चिकित्सालयीन आणि संशोधक सहयोगी (असोसिएट) म्हणून काम केले. निवासी वैद्यकीय, संशोधक आणि चिकित्सालय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७३ मध्ये ड्युक विद्यापीठातील मेडिसीन सेंटरला सहयोगी वैद्यकीय प्रोफेसर आणि जीवरसायनशास्त्राचे सहाय्यक प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नॉर्थ कॅरोलिनमधील डुरहॅम येथील हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्युटमध्येही ते कार्यरत होते.

पेशींना बाह्यशरीरात काय चालते आहे यासंबंधीची माहिती किंवा इशारा देण्यामध्ये अड्रेनालिन संप्रेरकाची काही तरी भूमिका आहे हे १९६८ च्या सुमारास माहीत होते. कारण, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे कार्य जोराने सुरू होते. या रेणूंमुळे पेशीला संदेश मिळतात, हे कळलेले होते. रसायनरूपी संदेशग्रहण होण्यासाठी पेशी आवरणावर त्या रेणूची ओळख पटली पाहिजे. पेशीवर ज्या स्थानी अड्रेनालीनची रासायनिक रचना ओळखली जाते, त्याला लेफ्कोवित्झनी बीटा-अड्रेनेर्जिक रिसेप्टर साइट असे नाव दिले. कोणत्याही पेशीमध्ये आवश्यक तेव्हाच विशिष्ट रसायनाला ओळख पटल्यानंतरच प्रवेश मिळतो. ही रिसेप्टर साइट फक्त एखाद्या संप्रेरकाच्याच संरचनेला ओळखते असे नाही, ती एखाद्या औषधाला किंवा अपायकारक पदार्थाच्या संरचनेलाही जाणते. यासाठी पेशी आवरणावर जी खास प्रवेशद्वारे असतात, त्यांना रिसेप्टर साइटस म्हणतात.

बाह्य परिस्थितीची माहिती पेशीला मिळावी म्हणून अड्रेनालिनचा प्रवेश पेशीच्या अंतर्गत भागात व्हावा लागतोच असे नाही. मात्र, तो रेणू रिसेप्टर साइटला संलग्न व्हायला हवा. तथापि, या रेणूचा पेशी आवरणावर, रिसेप्टर साइटवर संयोग तरी कसा होतो ? या समस्येचा मागोवा घेणे गरजेचे होते. या काळात त्यांनी रिसेप्टर बायोलॉजी या विषयातील संशोधन सुरू केले. याकरिता लेफ्कोवित्झ यांनी प्रयोगशाळेत अड्रेनालिन तयार करताना त्या रेणूत किरणोत्सार्गी आयोडीनच्या अणूचा समावेश केला होता. ही योजना यशस्वी ठरली. संशोधकांना किरणोत्सर्गी आयोडीनचा मागोवा घेता घेता अड्रेनालीनच्या पेशीबरोबर होणार्‍या क्रिया-प्रक्रिया समजल्या. लेफ्कोवित्झच्या गटामध्ये १९८० नंतर ब्रायन कोबिल्का (पहा) पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून सामील झाले. त्यांनी हजारो मानवी जनुकांमधून प्रथिनस्वरूपी बीटा-अड्रेनेर्जिक रिसेप्टर साइट तयार करणार्‍या जनुकाचा शोध घेतला.

रिसेप्टर बायोलॉजी या विषयात सतत ४५ वर्षे त्यांनी संशोधन चालू ठेवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे संशोधकानी संशोधन केले आहे. त्यांना २०१२ साली ब्रायन कोबिल्का यांच्याबरोबर नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. नोबेल पुरस्कार मिळण्याआधी त्यांना साठपेक्षा जास्त सन्मान मिळालेले आहेत. त्यांतील काही पुढील प्रमाणे: सदस्य, नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्युट ऑफ मेडिसीन ऑफ नॅशनल अकादमी, अमेरिकन ऑफ आर्ट्स अकादमी ॲण्ड सायन्सेस आणि नॅशनल मेडल ऑफ सायन्स.

संदर्भ :

समीक्षक : श्रीराम मनोहर