ईजिप्शियन पौराणिक कथांनुसार सेखमेट ही एक युद्धदेवता, आरोग्यदेवता व सौरदेवता असून तिला सिंहिणीच्या रूपात चित्रित केले गेले आहे. फेअरोंच्या रक्षणाचे तसेच युद्धात नेतृत्व करण्याचे कामही या देवतेने केले आहे. ईजिप्शियन कथांमध्ये या देवतेचा उल्लेख सेख्मेत, साखमेट, सेखेट किंवा साखेट असाही आढळतो. ती रा या सूर्यदेवतेची मुलगी असून तिचा हाथोर आणि बास्टेट किंवा बास्ट या देवतांशी संबंध अधिक वेळा जोडलेला दिसून येतो. ती ‘वॅडजेट’चे प्रतिनिधित्व करणारे ‘युरियस’ धारण करते. ‘युरियस’सह सूर्यचक्रही ती मस्तकी धारण करते.
व्युत्पत्ती : सेखमेट हा शब्द ईजिप्शियन शब्द ‘सेम’मधून (sḫm) निर्माण झाला असून याचा अर्थ ‘शक्ती’ किंवा ‘सामर्थ्य’ असा आहे. या देवतेचा उल्लेख प्राचीन ईजिप्शियन ग्रंथांमध्ये ‘sḫmt’, ‘siχmit’ असा आलेला आहे. या शब्दांचा अर्थ ‘सामर्थ्यवान’ असाच आहे. या देवतेचे सामर्थ्य हे शत्रूमध्ये भय निर्माण करणारे असल्याने तिला विविध ‘भय’भावनेवरून उपमा देण्यात आल्या. तिला ‘वन बिफोअर व्हूम एव्हिल ट्रम्बल’ (संकटपूर्व देवता), ‘मिस्ट्रेस ऑफ ड्रेट’ (भयाची अधिदेवता), ‘लेडी ऑफ स्लॉटर’ (वधदेवता) आणि ‘शी व्हू मॉल्स’ (क्रूरदेवता) अशा उपाधीही देण्यात आल्या आहेत.
भूमिका : रा हा देव स्वत: सामर्थ्यवान असून त्याच्या सामर्थ्याचे प्रकटीकरण सेखमेटद्वारे होते. ती अग्नीचा श्वास असून तिच्या श्वासांची तुलना वाळवंटातील गरम वाऱ्यांशी केली जाते. तिच्यावर रोग निवारण्याचीदेखील जबाबदारी दिली जात असे. पृथ्वीवरील स्वशासन संपुष्टात आणल्याबद्दल राने तिच्या रूपाने हाथोरला मनुष्यसंहारासाठी पाठविले. सेखमेटरूपात असणाऱ्या हाथोरची रक्ताची वासना लढाईच्या शेवटी संपली नव्हती आणि यामुळे तिने संपूर्ण मानव जात नष्ट केली. तिची वासना शमविण्यासाठी राने लाल रंगाच्या गेरूचा रस व बिअरचे पाट वाहते केले. ते रक्त आहे असे समजून ती बिअर पिऊ लागली. अतोनात मद्यपान केल्यामुळे ती मानवी कत्तल विसरली आणि अंतिमत: राकडे शांतपणे परत आली. हाथोरच्या वैशिष्ट्यांमध्ये तिच्या मद्यपानाचा, संगीत, नृत्य यांमध्ये रमण्याचा उल्लेख येतो. हाथोर आणि सेखमेट या देवतांमध्ये साधर्म्य दर्शविणारे हे मिथक आहे. या मिथकाचे वर्णन पैपिरस कैरो यांच्या ‘लकी आणि अनलकी डेज्’च्या पंचांगसदृश रोगनिदान ग्रंथामध्ये केले आहे. सेखमेट ही पॅटा देवाची पत्नी आणि नेफर्टम या ईजिप्शियन जलदेवतेची आई मानली जात असे.
प्रतिमा : सेखमेटच्या प्रतिमेमध्ये सिंहिणीचे डोके असणारी एक स्त्री दर्शविली जाते, जिचा पोशाख हा खासकरून लाल रंगाचा असतो. हा लाल रंग रक्ताचे प्रतीक आहे. तिच्या मस्तकावरील सूर्यचक्रही लाल रंगाने दर्शविले जाते. तिच्या सिंह मस्तकावर सूर्यचक्र असून त्याच्यावर ‘युरियस’ आहे. ‘युरियस’ हा सर्प, कोब्रा यांच्याप्रमाणे दिसतो. तो समृद्धतेचे प्रतीक आहे. कधीकधी तिने घातलेला पोशाख प्रत्येक स्तनावर ‘रोझेटा’चा म्हणजे गुलाबाचा नमुना दर्शवितो. काही प्रतिमांमध्ये ती तोकड्या कपड्यांमध्ये किंवा नग्नावस्थेतही दिसते. राजांच्या अंत्यसंस्कारावेळीही तिची प्रतिमा आढळते. ज्याप्रमाणे तिने जीवंतपणी रक्षण केले, त्याप्रमाणे तिने मृत्यूनंतरही रक्षण करावे, असा त्यामागचा उल्लेख आहे. अंत्यसंस्कारावेळच्या तिच्या प्रतिमा प्राचीन ईजिप्तमध्ये आढळतात. सेखमेटचे अंदाजे सातशेहून अधिक पुतळे असून नाईल नदीच्या किनारी असणाऱ्या शवगृहामध्ये तिच्या प्रतिमा आढळतात.
पूजा : सेखमेटरूपी हाथोरने मानववंश नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ईजिप्तमध्ये वार्षिक उत्सवावेळी लोकांनी देवीला शांत करण्यासाठी संगीत लावले; अतिप्रमाणात मद्यपान केले. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला सेखमेट आणि हाथोर या देवतांना प्रसन्न करण्यासाठी संगीत, नृत्य आणि मद्याचा वापर केला जातो. २००६ मध्ये जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ बेट्सी ब्रायन यांनी मत्स लक्सॉरच्या (थीब्झ) मंदिरात उत्खनन करीत असताना या महोत्सवाबद्दलचे निष्कर्ष सादर केले. त्यात मद्याशी संबंधित वस्तू, पूजा-अर्चा या संबंधित साहित्य मिळाले.
उल्लेख : ‘डेथ मेटल बॅण्ड बेहोमॉथ’ने त्याचा अल्बम द ॲपोस्टॅसीमधील ‘क्राइस्टग्रिंडिंग ॲव्हेन्यू’ गाण्यात सेखमेटचा संदर्भ दिला. ही सामान्य विरोधक म्हणून रिक रॉर्डन यांनी लिहिलेल्या रेड पिरॅमिड ग्रंथामध्येदेखील सूचित केलेली आहे. बीबीसी टीव्ही मालिकेमधील ‘शेरलॉक’ भागात द ग्रेट गेममध्ये जॉन वॉटसनचा असा विश्वास आहे की, सेखमेट नावाची मांजर तिच्या मालकाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. दक्षिण नेवाडामधील एक धर्ममंदिर सेखमेट देवीला समर्पित केले आहे. ‘सेखमेट’ हा मार्गारेट ॲटवुडच्या कवितेचा विषय आहे. कवितेची ओळ अशी ‒ सेखमेट, सिंहाच्या डोक्यावरची युद्धाची देवी… ही देवता लेखक आणि चित्रकार जोनाथन शॉर्क यांनी लिहिलेली फेअरलेस इनाना या कादंबरीतील मुख्य नायिकेला मार्गदर्शन करणार्या तीन जुन्या देवतांपैकी एक आहे. ‘क्वेस्ट फॉर ग्लोरी III : वेजेस ऑफ वॉर’ या ९०च्या दशकातील दृकश्राव्य खेळात (video game) सेखमेट ही तारणारी, संरक्षक देवी चित्रित केली आहे.
संदर्भ :
- Wilkinson, Richard H. The Complete Gods and Goddesses of Ancient Egypt, London, 2003.
- http://www.egyptianmyths.net/sekhmet.htm
समीक्षण : शकुंतला गावडे