बा

प्राचीन ईजिप्शियन मानवी शरीराचे पाच भाग मानत असत. भौतिक शरीर, नाव, सावली, ‘का’ आणि ‘बा’. ‘बा’ म्हणजे माणसाचा आपल्या भोवतालच्या विश्वावर असलेला प्रभाव, त्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्त्व किंवा त्याची प्रतिष्ठा. माणूस जिवंत असताना ‘बा’ त्याच्या शरीरात असतो; पण मृत्यूनंतर तसेच जिवंतपणी माणूस झोपलेला असतानाही ‘बा’ शरीराबाहेर येऊ जाऊ शकतो.

मानवी मस्तक असलेला पक्षी ह्या स्वरूपात ‘बा’ चित्रित केला जात असे. माणूस मेल्यानंतर ‘बा’ मृताच्या शरीरावर घिरट्या घालतो. एका थडग्यावरील लेखानुसार मृत्यूनंतर ‘बा’ शरीराबाहेर येऊन खाऊन-पिऊन आपले स्वतःचे पोषण करतो, अशी समजूत होती.

ख्नूम ही मेंढ्याचे मस्तक असलेली देवता. प्राचीन काळी ईजिप्तमध्ये मेंढ्याला ‘बा’ म्हणत असत. म्हणून कालांतराने ख्नूम देवतेला ईजिप्शियन सूर्यदेवता ‘रा’चा ‘बा’ मानले जाऊ लागले.

का

‘का’ म्हणजे जीवनशक्ती. मनुष्यागणिक ही शक्ती भिन्न असल्याचे मानले जाते. काही प्राचीन ईजिप्शियन चित्रलिपीत ‘का’ एक अतिशय लहान पुरुषाच्या स्वरूपात स्वतःच्याच एका मोठ्या आकाराच्या चित्राशेजारी उभा असलेला चित्रित केलेला आढळतो. काही ठिकाणी दृष्टशक्तीला बचाव करण्यासाठी आपले दोन्ही बाहू विस्तारलेला ‘का’ चित्रित केलेला आहे. मृत्यूनंतरही माणसाचा ‘का’ जिवंत असतो आणि त्याला पोषणाची गरज असते, असे मानले जात असे.

मृत व्यक्तीला आपला ‘का’ निळ्या फिनिक्स पक्ष्याच्या स्वरूपात दिसतो आणि तो मृताच्या नातलगांनी आणि पुजाऱ्याने ठेवलेले अन्न खाण्यासाठी थडग्याकडे येतो, असे मानले जात असे. काही थडग्यांच्या भिंतींवर ‘का’साठी ठेवलेल्या अन्नाची चित्रे आढळतात. परंतु ‘का’ ते अन्न प्रत्यक्ष खात नसून त्या अन्नपदार्थांच्या चित्रातील पोषकतत्त्व शोषून आपले पोषण करतो, असे मानले जात असे.

प्राचीन ईजिप्शियनांच्या मते मृत्यूनंतर मृताच्या आत्म्याचे दोन भाग होतात. दिवसाच्या वेळी एक भाग ‘का’ Land of Two Fields ह्या ठिकाणी आनंदाने आयुष्य जगायला जातो आणि दुसरा भाग ‘बा’ मृताच्या जीवित कुटुंबावर लक्ष ठेवायला जातो. प्रत्येक रात्री हे दोन्ही भाग परत थडग्यात विसाव्यासाठी येतात.

संदर्भ :

  • Cotterell, Arthur; Storm, Rachel, The Ultimate Encyclopedia of Mythology, London, 2012.
  • Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
  • https://egypt.mrdonn.org/ba-ka.html
  • http://www.landofpyramids.org/ka-ba.htm

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे