नेफ्थिस ही प्राचीन ईजिप्शियन मृत्यूदेवता असून ती गेब आणि नट देवतांची मुलगी, अभद्र आणि दुष्टतेची देवता मानल्या जाणाऱ्या सेत(थ)ची पत्नी, इसिस देवतेची जुळी बहीण आणि अनुबिस देवाची माता मानली गेली आहे. तिच्या नावाचा अर्थ घराच्या किंवा मंदिराच्या आवाराचे रक्षण करणारी (Mistress of the Temple Enclosure or House) असा होतो. तिचे मूर्त स्वरूप ‘डोक्यावर घराचे आवार आणि त्यावर टोपली’ असे शिरोभूषण असलेली स्त्रीदेवता किंवा घार (पक्षी) असे आहे. ती अंधाराची देवता असून तिची जुळी बहीण इसिस ही प्रकाशाची देवता मानली जाते.
एका आख्यायिकेनुसार नेफ्थिस आणि सेत यांना स्वत:चे अपत्य नव्हते. पण नेफ्थिसने ओसायरिसला मद्य पाजून भुलवले. आपली बहीण इसिस हिचा पती ओसायरिसला मोहात पाडण्यासाठी नेफ्थिसने इसिसचे रूप धारण केले. त्या दोघांचे अपत्य म्हणजेच अनुबिस होय. जेव्हा सेतला हे कळले, तेव्हा चिडून त्याने ओसायरिसला मारून टाकले आणि त्याचा मृतदेह लपवून ठेवला. तेव्हा नेफ्थिसने ओसायरिसचा मृतदेह शोधण्यात इसिसची मदत केली. दोघींनी ओसायरिसचा मृतदेह शोधून त्यावर घिरट्या घालून मृतदेह दफन होईपर्यंत त्याचे रक्षण केले.
इसिस व नेफ्थिसचे विलाप (The Lamentations of Isis and Nephthys) नावाच्या एका संहितेनुसार नेफ्थिसने ओसायरिसच्या आत्म्याला मृतांमधून परत बोलावले. ही संहिता संपूर्ण ईजिप्तमध्ये सण, समारंभ, दफनविधी तसेच इतर विविध सेवांच्या वेळी वाचायची पद्धत प्रचलित होती.
नेफ्थिस ही देवता मृतांचे मस्तक आणि त्यांच्या शवपेटीशी संबंधित मानली गेली आहे. तसेच ती रक्षक देवतांपैकी एक मानली गेली आहे; कारण मृतांची फुप्फुसे राखणाऱ्या हॅपी देवतेची ती रक्षक देवता होती. शिवाय ती नापीक, ओसाड वाळवंट काठाची देवता होती; पण नाईल नदीला पूर आल्यावर मात्र ती फलदायी असणारी अशी प्रतीकात्मक देवता मानली जाऊ लागली.
संदर्भ :
- Cotterell, Arthur, The Illustrated Encyclopedia of Myths & Legends, London, 1989.
- Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
- Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
- https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/
समीक्षक : शकुंतला गावडे