अग्रवाल, मधुलिका शशिभूषण : ( १ मे १९५८ ) 

मधुलिका अग्रवाल यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले. पीएच्.डी. साठी त्यांनी ध्रुव राव यांच्याकडे वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम या विषयात संशोधन केले. हवा, पाणी व जमीन या विषयात संशोधन पुढे चालू ठेवून आज त्या भारतातील या विषयातील अग्रगण्य संशोधक मानल्या जातात. जड धातूमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थांच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज बांधला.

पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन मधुलिका अग्रवाल यांचे अति-नील ‘ब’ (uv’b’) किरण आणि वाढीव कार्बनडायऑक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

अमेरिकेतील फुलब्राईट फेलोशिप मिळाल्यावर मधुलिका अग्रवाल यांनी मेरिलंडमधील बेलटविल ॲग्रीकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लॅन्कास्टर येथे रॉयल सोसायटी – इंडिअन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. युनेस्को-रोस्तास्का यांचे यंग सायंटीस्ट ॲवॉर्ड, इंडिअन सायन्स काँग्रेस ॲसोसिएशनचे हिरालाल चक्रवर्ती ॲवॉर्ड, यु.जि.सी.चे पर्यावरणातील संशोधनासाठी देण्यात येणारे स्वामी प्रणवानंद सरस्वती राष्ट्रीय ॲवॉर्ड इत्यादी. त्या नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसच्या आणि नॅशनल अकादमी ऑफ ॲग्रीकलचरल सायन्सेसच्या फेलो आहेत.

मधुलिका अग्रवाल यांनी पर्यावरण मंत्रालय, यु.जि.सी., डी.एस.टी., सी.एस.आय.आर. (सर्व दिल्लीतील) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यु.के., स्टॉकहोम एन्व्हायरन्मेंट इन्स्टिट्यूट, यॉर्क, यु.के., रिसर्च काउन्सिल, नॉर्वे, यांनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. त्यांनी २६ विद्यार्थ्याना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले असून, सध्या दहा -एक विद्यार्थ्यांवर काम करत आहेत. २२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक लेविस पब्लिकेशन, यु.एस.ए.) त्यांच्या खात्यात असून, ‘युनेप’ च्या Atmospheric Brown Cloud  या प्रकल्पात भाग घेतला आहे.

संदर्भ :

समीक्षक : चंद्रकांत लट्टू