अर्बथनॉट, जॉन : ( २९ एप्रिल १६६७ ते २७ फेब्रुवारी १७३५ )

अर्बथनॉट यांचा जन्म स्कॉटलंडमधील किन्कार्डिनेशायर (Kincardineshire) येथे झाला. उच्चशिक्षित, धर्मोपदेशक वडलांनीच त्यांच्या लॅटिन आणि ग्रीक या भाषा पक्क्या करून घेतल्या होत्या. ॲबरडीनस्थित मॅरिश्कल महाविद्यालयात (Marischal College) अर्बथनॉट यांनी सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे अभिजात कला विषय अभ्यासले, ज्यात गणित आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानही होते. त्यात त्यांनी पदवी मिळवली.

प्रसंभाव्यतेच्या विकासातील अर्बथनॉट यांचे योगदान थोडकेच आहे. परंतु, त्यांच्यामुळे तो एक उपयोगी विषय असल्याची जाणीव सतराव्या शतकाच्या शेवटाला आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकांना झाली. हगिन्स यांचे De Ratiociniis in Ludo Aleae हे पुस्तक १६५७ साली प्रसिद्ध होईपर्यंत प्रसंभाव्यतेबद्दल नांव घेण्याजोगे काहीही प्रकाशित झाले नव्हते. या पुस्तकाचे भाषांतर अर्बथनॉट यांनी Of the Laws of Chance या शीर्षकाखाली केले. या विषयावरचे इंग्रजीतले हे पहिलेच पुस्तक. या पुस्तकात अनुवादाबरोबरीने अर्बथनॉट यांनी, दान आणि पत्त्यांच्या खेळांतील संभाव्यता प्रगणन करण्याच्या स्वशोधित पद्धतीही जोडल्या होत्या.

अर्बथनॉट यांनी प्रकाशित केलेल्या बऱ्याच लिखाणांवरचा लेखक अनामिक होता. त्यानुसार ऑफ दि लॉज ऑफ चान्स वरही लेखक अनामिक असेच छापले होते. तरीही पुस्तक इतके गाजले की त्याच्या लागोपाठ तीन आवृत्त्या छापाव्या लागल्या. पुस्तकाची चौथी आवृत्ती, त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झाली. पुस्तकाच्या प्रस्तावनेत अर्बथनॉट यांनी ते जुगार खेळणाऱ्यांसाठीची हस्तपुस्तिका असल्याचे लिहीले होते.

अर्बथनॉट यांनी ऑक्सफर्डच्या युनिव्हार्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे ते खगोलशास्त्राचे सॅव्हिलियन-पिठासीन प्राध्यापक, डेव्हिड ग्रेगरी यांना भेटले. अर्बथनॉटनी ग्रेगरींना दिलेल्या हस्तलिखितातऑफ दि लॉज ऑफ चान्सवर आधारित कामाची सर्वसाधारण रूपरेषा आणि लक्षणीयतेच्या कसोटीचा (test of significance) वापर प्रथमच करण्याची पूर्वकल्पना देणारे तपशील आहेत. सहा वर्षांनी Philosophical Transactions of the Royal Society मध्ये प्रकाशित झालेल्या लिंग गुणोत्तरावरील कामासंबंधातील नोंदीही आहेत.

त्यांनी खाजगीरीत्या १६९४ ते १६९६ या कालावधीत वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि वैद्यकशास्त्रातील पदवी युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूजमधून मिळवली. त्यानंतर अर्बथनॉट यांची गणितातील कारकीर्द बहुतांशी संपली. आर्चिबाल्ड पिट्केम (Archibald Pitcaime) हे त्या काळातील नावाजलेले धन्वंतरी आणि लैडनमधील कॉलेजचे वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्यामुळेच अर्बथनॉट वैद्य बनले. तर बहुधा अर्बथनॉट यांच्यामुळेच, पिट्केम यांनी हगिन्स यांची प्रसंभाव्यता, रक्तस्त्राव आणि ज्वर मुक्तता यांवरील औषधांचे, रुग्णांवरील परिणाम तपासण्यासाठी वापरली, पूर्णपणे वैद्यकीय व्यावसायिक बनल्यावर अर्बथनॉट यांची १७०५ मध्ये इंग्लंडच्या राणीचे विशेष राजवैद्य तर १७०९ पासून पूर्णकाळ राजवैद्य, म्हणून नियुक्ती झाली.

अर्बथनॉट रॉयल सोसायटीचे सक्रिय सभासद होते. तेथे त्यांचा संबंध न्यूटन यांच्याशी आला. गणिताच्या पद्धती वापरून नैसर्गिक घटना, दैवी व्यवस्था, व्यवहार यांकडे तर्कदृष्ट्या पहाणेच योग्य असल्याचे न्यूटन सांगे. याच मतांचे प्रतिबिंब ऑफ दि लॉज ऑफ चान्सच्या प्रास्ताविकात उमटलेले दिसते. यात अर्बथनॉट म्हणतात की, विश्वातील घडामोडी म्हणजे एक प्रकारे नैमित्तिक घटनांच्या संख्यांचेच विश्लेषण होय.

गणितापासून नाणकशास्त्र ते आहारशास्त्र इतक्या व्यामिश्र विषयांवर अर्बथनॉटनी एकूण आठ पुस्तके लिहिली.

‘फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शनस ऑफ दि रॉयल सोसायटी’त प्रकाशित झालेल्या An argument for Divine Providence, taken from the constant regularity observed in the births of both sexes या शोधनिबंधात अर्बथनॉट यांनी जन्मणाऱ्या मुलींच्या संख्येसापेक्ष मुलांची संख्या मोजताना सांख्यिकीच्या वापराचे दिग्दर्शन, तेव्हा दैवाधीन ठरविलेल्या जन्मावर केले होते. या शोधनिबंधात अर्बथनॉटनी १६२९ पासून ते १७१० पर्यंतच्या बाप्तिस्म्याच्या नोंदणीची एक सारणी दिली होती. जन्मलेले मूल मुलगा किंवा मुलगी असण्याची शक्यता (chance) सारखीच आहे, या परिकल्पनेनुसार सारणी तपासल्यावर, दरवर्षी मुलींच्या जन्मदरापेक्षा मुलांचा जन्मदर थोडासा वाढलेला असल्याचे, त्यांना आढळले होते. साधारणतः १४ मुलांमागे १३ मुली असे जन्मप्रमाण असल्याचे, अचूक प्रगणनांती त्यांनी सांगितले होते. अर्बथनॉट यांच्या मते, त्यांनी शोधलेले विषम लिंगप्रमाण, केवळ दैवयोग नव्हता. ब्याऐंशी वर्षांत अगदी एखाद वेळेस आकस्मिकपणे मुलांचे जन्मप्रमाण मुलींच्या तुलनेत अधिक आढळण्याची शक्यता केवळ (०.५)८२ इतकी कमी असल्याचेही त्यांनी मांडले. या आधारे मुलांचे जन्मप्रमाण अधिक असणे केव्हांही अनैसर्गिकच असल्याचे अर्बथनॉट यांनी सिद्ध केले. अशा तऱ्हेने लक्षणीयतेच्या कसोटीवर परिकल्पना पारखून सांख्यिकीय अनुमान शोधनिबंधात मांडणारे, अर्बथनॉट हे पहिलेच गणिती होते.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर