वॉशिंग्टन, बुकर ताल्यफेर : (५ एप्रिल १८५६–१४ नोव्हेंबर १९१५). अमेरिकन निग्रो वंशीय शिक्षणतज्ज्ञ, सुधारणावादी नेता आणि निग्रोंचा प्रवक्ता. त्यांचा जन्म व्हर्जिनियातील हेल्सफोर्ड (Franklin County) येथे गुलाम निग्रो माता व गौरवर्णीय पिता या दांपत्यापोटी झाला. गौरवर्णीय वडिलांनी पालक या नात्याने बुकरची कोणतीच जबाबदारी स्वीकारली नाही. त्यांची आई जेन फर्गसन एका मळ्यात स्वयंपाकीण म्हणून काम करीत असे. यादवी युद्ध (Civil War)च्या वेळी व्हर्जिनियात पळून आलेल्या एका गुलामाबरोबर तिने दुसरा विवाह केला. निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या १८६५ सालच्या शासकीय निर्णयानंतर ती आपल्या पती व मुलांसह मॉल्डेन (West Virginia) येथे राहावयास गेली. सावत्र वडिलांनी मुलांना खाणउद्योगात मजूर म्हणून कामास लावले. त्यामुळे नवव्या वर्षापासूनच वॉशिंग्टन यांनी खाणीत काम करून फावल्या वेळेत अध्ययन केले.

वॉशिंग्टन हे १८७२ –१८७५ या काळात ‘कमवा आणि शिका’ हे तत्त्व पुरस्कारणाऱ्या हॅम्प्टन संस्था (Hampton Institute) या कृष्णवर्णीयांच्या विद्यालयात गेले. वर्गात हजेरीच्या वेळी सर्व मुले आपले नाव व आडनाव सांगत. त्या वेळी बुकर गोंधळले आणि त्यांनी धाडकन वॉशिंग्टन हे आडनाव आपल्या बुकर नावाला जोडले. आईकडून त्यांना ताल्यफेर हे खरे आडनाव समजल्यावर त्यांनी बुकर टी. वॉशिंग्टन हे नाव धारण केले. विद्यार्थिदशेत फावल्या वेळात ते गवंडीकामही शिकले होते. नंतर त्यांनी वेलँड (Washington, D. C.) मधील कॅथलिक पंथीय पाठशाळेत अध्ययन केले. त्यांनी पदवी संपादन केल्यावर हेल्सफोर्ड येथे १८७६–१८७८ ही दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले. १८७९ साली त्यांना हॅम्प्टन संस्थेमध्ये (Hampton Institute) शिक्षकाची नोकरी मिळाली. या शाळेत औद्योगिक शिक्षणावर प्रामुख्याने भर होता. औपचारिक शिक्षणाबद्दल वॉशिंग्टन यांचा भ्रमनिरास झाला. निग्रोंना व्यावहारिक, व्यवसायाभिमुख धंदेशिक्षण दिल्यास, ते त्यांच्या दारिद्र्यनिर्मूलनास उपयुक्त ठरेल आणि कृष्णवर्णीय स्वतःच्या पायावर उभे राहतील, अशी त्यांची धारणा बनली; कारण या वेळी दक्षिणेकडील राज्यांत ग्रामीण भागात असंख्य निग्रो दारिद्र्यात पिचत पडले होते. त्याची ही विचारसरणी प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली.

ॲलाबॅमा राज्यातील टस्कजी येथे कृष्णवर्णीयांसाठी नवीन महाविद्यालय स्थापण्यात आले. त्याच्या संस्थाप्रमुख व प्राचार्यपदी १८८१ साली गोऱ्या व्यक्तीऐवजी वॉशिंग्टन यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी इमारती बांधून व भोवती बाग तयार करून महाविद्यालयाचा परिसर विकसित केला. त्यामुळे हळूहळू विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. “तुस्क्ये संस्था” (Tuskegee Institute) ही त्यांची कर्मभूमी बनली व तिच्या भरभराटीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. १८८१–१९१५ या काळात त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली ती कृष्णवर्णीयांना औद्योगिक प्रशिक्षण देणारी आदर्श व महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावलौकिकास आली. वॉशिंग्टन यांनी येथील निग्रो विद्यार्थ्यांना कृषिशिक्षण व धंदेशिक्षण देऊन स्वतंत्र व्यवसायास उद्युक्त केले. नंतर त्यांना राजकीय व नागरी हक्क आपोआपच प्राप्त होतील, अशी त्यांची धारणा होती. ही शिक्षणपद्धती आणि त्याची सामाजिक उपपत्ती यांचा उहापोह त्यांनी १९०१ मध्ये लिहिलेल्या अप फ्रॉम स्लेव्हरी ह्या आत्मचरित्रपर ग्रंथात केला आहे. तत्पूर्वी त्यांनी १९०० मध्ये कृष्णवर्णीयांच्या व्यवसायास मदत करण्यासाठी निग्रो व्यवसाय संघ स्थापन केला. त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार विविध वृत्तपत्रे, व्याख्याने आणि स्फुटलेख यांद्वारे मांडले. १८९५ मध्ये जॉर्जिया राज्यातील ॲटलांटा येथे वॉशिंग्टनने दिलेले व्याख्यान अटलांटा कॉम्प्रमाइझ (Atlanta Compromise) या नावाने प्रसिद्ध आहे. या व्याख्यानात त्यांनी निग्रोंची समानता, सामाजिक-राजकीय हक्क अशा मागण्यांना गौण स्थान देऊन, तांत्रिक-व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आर्थिक विकास साधण्यावर जास्त भर द्यावा, असे प्रतिपादन केले. आर्थिक स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर निग्रोंना गोऱ्यांच्या बरोबरीने समान हक्क प्राप्त होतील, अशी त्यांची अटकळ होती. त्यांच्या या भूमिकेकडे सुरुवातीला निग्रो बहुसंख्येने आकृष्ट झाले; मात्र एका परीने ॲटलांटा तडजोडीतून त्यांनी निग्रोंचे सामाजिक विलगीकरण व असमानता यांना मान्यताच दर्शवली होती. त्यांच्या या गौरवर्णीयधार्जिण्या धोरणामुळे गोऱ्या लोकांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटू लागली. त्यातून त्यांची राष्ट्रीय नेता व कृष्णवर्णीयांचा प्रवक्ता अशी प्रतिमा तयार झाली. थीओडर रूझवेल्ट (Theodore Roosevelt), विल्यम टॅफ्ट हे राष्ट्राध्यक्ष, उच्चपदस्थ व काही सिनेटर निग्रोंच्या शासकीय नियुक्त्यांत त्यांचा सल्ला घेऊ लागले. निग्रोंच्या संघटनांना त्यांनी धनिकांकडून भरघोस देणग्या मिळवून दिल्या. तसेच कृष्णवर्णीय चालवीत असलेल्या वृत्तपत्रांना आर्थिक साह्यही मिळवून दिले. तत्कालीन बहुतेक सर्व कृष्णवर्णीय चालवीत असलेल्या वृत्तपत्रांवर त्यांचे वर्चस्व होते. त्यांतून ते आपले विचार प्रसृत करीत असे आणि आपल्या समकालीन कृष्णवर्णीय विरोधकांच्या वृत्तांना प्रसिद्धीपासून दूर ठेवीत असे. जीवनभर त्यांनी गोऱ्यांना (विशेषतः दक्षिणेकडील व उत्तरेकडील गोऱ्यांना) आपल्या भाषणांतून व कृतींद्वारे खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उघडपणे कृष्णवर्णीयांच्या राजकीय मागण्यांस कधीच पाठिंबा दर्शविला नाही; परंतु दक्षिणेकडील घटक राज्यांविरुद्ध विलग्नता आणि मतदानाचा हक्क या संदर्भांतील निग्रोंच्या चाललेल्या खटल्यांना व प्रयत्नांना ते गुप्त रीत्या आर्थिक मदत करून उत्तेजन देत असे.

वॉशिंग्टनला अनेक मानसन्मान मिळाले. १८९६ साली हार्व्हर्ड विद्यापीठाने त्यांना एम. ए. ही सन्मान्य पदवी दिली. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कीर्तिदालनात त्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यांचे जन्मस्थान हे पुढे राष्ट्रीय स्मारक करण्यात आले. १९०० मध्ये लिहिलेली द स्टोरी ऑफ माय लाइफ अँड वर्ल्ड आणि माय लार्जर एज्युकेशन  हे त्यांचे आत्मचरित्रपर ग्रंथ होत.

वॉशिंग्टन यांच्या धोरणास त्यांच्या जीवनाच्या अखेरीस डब्ल्यू. इ. बी.द्यू-बॉइस, जॉन होप, विल्यम ट्रॉट वगैरे काही तत्कालीन कृष्णवर्णीय नेत्यांनी विरोध केला. द्यू-बॉइसने द सोल्स ऑफ ब्लॅक फोक (१९०३) या ग्रंथात आपल्या टीकेची रूपरेषा स्पष्ट केली असून वॉशिंग्टन यांच्या सरकारधार्जिण्या धोरणावर टीकेची झोड उठविली आहे. निग्रोंचे राजकीय व नागरी हक्क यांबाबतीत वॉशिंग्टन यांनी गोऱ्यांबरोबर जे समझोत्याचे गुळमुळीत धोरण अंगीकारले, ते वरील नेत्यांना अमान्य होते. त्यांची परिणती १९०५ सालच्या नायगारा चळवळीत झाली आणि त्यातून कृष्णवर्णीयांची ‘राष्ट्रीय विकास आघाडी’ (NAACP – १९१०) व नॅशनल अर्बन लीग  (National Urban League) या संस्था उदयास आल्या. वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विरोधकांनी कृष्णवर्णीयांच्या राजकीय, सामाजिक व समान हक्कांसाठी उन्मूलनवादाचा (गुलामगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालविलेली चळवळ) प्रवक्ता फ्रेडरिक डग्लस यांनी प्रसृत केलेले लढाऊ डावपेच पुन्हा कार्यवाहीत आणण्याची चळवळ जोमाने सुरू केली.

वॉशिंग्टन यांचे टस्कजी येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Bontemps, Arna, Young Booker : Booker T. Washigton’s Early Days, New York, 1972.
  • Harlian, Lousi, Booker T. Washigton : The Making of a Black Leader, Oxford, 1972.
  • Thornbrough, Emma Lou, Ed. Booker T. Washington, Englewood Cliffs, 1969.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा