अयाला, फ्रान्सिस्को जे. : ( १२ मार्च १९३४ )

फ्रान्सिस्को होजे अयाला पेरेडा यांचा जन्म स्पेनमधील माद्रिद येथे झाला. ते अगोदर डॉमनिक धर्मोपदेशक होते आणि त्याच वर्षी त्यांनी आपले धर्मगुरुपद सोडले. सलामांका विद्यापीठातून आपली पदवी पूर्ण केल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठात पीएच्.डी. चा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला गेले. तेथे थिओडोसीअस डोब्झंस्की यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली.

नंतर ते कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि अनुवंशविज्ञान आणि उत्क्रांती शिकवित होते. १९७८ साली ते आयर्विन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात जैविकविज्ञानाचे प्राध्यापक बनले. त्यानंतर त्यांनी संशोधन आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले. पर्यावरणशास्त्र, पर्यावरणीय अभ्यास, परजीवी प्राण्यांमधील उत्क्रांती, अशा जैविक विज्ञानात  त्यांनी यश संपादन केले. १९६० पासून त्यांनी आपले लक्ष भौगोलिकदृष्ट्या परजीवी प्रजातीच्या विविधतेवर केंद्रित केले (process of geographic speciation or divergence of the species), मानवी समुदायातील अनुवंशिक विविधता (genetic variations in different populations) आणि रेण्वीय उत्क्रांती (process of molecular evolution) हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. रोग पसरवणार्‍या आदिजीवांवर त्यांनी केलेल्या संशोधनामुळे वैद्यकशास्त्रामध्ये मोठा बदल घडून आला. अयाला यांनी शोधून काढले की कित्येक परजीवी आदिजीव लैंगिक प्रजननाऐवजी क्लोनिंग पद्धतीने प्रजनन करतात. अशा परजीवीवर लस तयार करण्यात या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे.

लोकसंख्या आणि उत्क्रांत अनुवंशिक (population and evolutionary genetics) यांवरील संशोधनामुळेच ते ओळखले जायचे आणि त्यांना उत्क्रांत जीवशास्त्राचे पुन्नरुजीवन करणारी व्यक्ती (Renaissance man of evolutionary Biology) असे संबोधले जायचे. त्यांच्या संशोधनांमुळे लाखो व्यक्ती बाधित होत असलेल्या आजारावरील प्रतिबंध व उपचारांच्या नव्या पद्धती सुरू झाल्या. याचे एक उदाहरण म्हणजे, ट्रायपॅनोसोमा क्रूजी (Trypanosoma cruzi) याचे प्रजनन हे क्लोनिंग (अलैंगिक) पद्धतीने होत असल्यामुळे काही क्लोनमध्येच या परजीवींची संख्या प्रचंड होते. ट्रिपॅनोसोमा कृझीमुळे दक्षिण अमेरिकेत जवळजवळ १६ ते १८ दशलक्ष व्यक्ती चॅन्ग़ डिसीझ ( Chang’s disease) या रोगाने बाधित असून हा एक असाध्य रोग आहे. मात्र याच्या प्रजनन पद्धतीचा अभ्यास केला असता असे दिसून येते की जर यांची वाढच थांबवली तर कितीतरी पटीने आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो.

सध्या अप्रचलित असलेल्या कॅम्पेन टु डिफेंड द कॉन्स्टीट्यूशन या संघटनेच्या सल्लागार समितीमध्ये त्यांनी काम केले. चर्च आणि राज्य यांना वेगवेगळे ठेवण्याच्या समर्थनार्थ ही संघटना काम करत असे. संशोधनासाठी लागणार्‍या भ्रूण मूळ पेशी (स्टेम सेल्स)  सांघिक संकलनावर अमेरिकेत असणार्‍या बंधनांवर त्यांनी उघडपणे टीका केली. आयर्विन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाने जाहीर केले की विद्यापीठाच्या जैविकशास्त्र विभागाला प्रत्येक वर्षी एक दशलक्ष डॉलर असे पुढील दहा वर्षात प्रोफेसर अयाला यांनी दहा दशलक्ष डॉलर देऊ केले आहेत.

आजवर अयाला यांनी ९५० लेख आणि ३० पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांना कित्येक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजवर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेत सन्माननीय पदे भूषविली आणि अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदवी बहाल केली.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा