मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो. हा संग्रह म्हणजेच ‘परिग्रह’. तर आपल्या देहधारणेस अत्यावश्यक नसणाऱ्या अशा साधनांचा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे ‘अपरिग्रह’ होय.

महर्षि पतंजलींनी साधनपादात अष्टांगयोगाची साधना सांगितली आहे. त्यातील दोन अंगे म्हणजे यम आणि नियम. पतंजलींनी अपरिग्रह हा पाचवा यम मानला आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा: || २.३०). हठप्रदीपिकेत मात्र या यमाचा उल्लेख आढळत नाही.

पातंजल योगसूत्रावरील व्यासभाष्यात म्हटले आहे की, आपल्याला आनंद व सुख देणारी साधने मिळविण्यासाठी, ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्यांचा वियोग झाला असता होणारे दु:ख सहन करण्यासाठी योगसाधकाला बरेच प्रयास, कष्ट करावे लागतात. शिवाय या साधनांचा उपभोग घेत असताना ती नित्य जवळ असावीत अशी इच्छा चित्तात निर्माण होत राहते. या इच्छेने चित्तात दु:ख निर्माण होते. हे उपभोग्य विषय नित्य उपलब्ध राहावेत यासाठी साधक प्रयत्नशील राहातो आणि भविष्यात त्यांचा वियोग होण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याला दु:ख होते. भौतिक, उपभोग्य वस्तूंचा परिग्रह हा योगसाधनेतील अडथळा ठरू शकतो. यासाठी साधकाने केवळ देहधारणेस अत्यावश्यक वस्तूंचा संग्रह करावा. जीवांची हिंसा केल्याशिवाय भोग संभवत नाही (व्यासभाष्य २.१५). तसेच  इष्ट वस्तू मिळविताना अर्जनदोष, रक्षणदोष, क्षयदोष, हिंसादोष  व संगदोष या पाच दोषांचा संसर्ग घडतो. उदा., पीक मिळावे म्हणून भूमी नांगरताना तिला इजा होते (अर्जनदोष). मिळविलेल्या वस्तूचे रक्षण करतानाही इतरांना इजा संभवते. उदा., पिकाचे रक्षण करताना गोफणीतून पक्ष्यांना इजा केली जाते (रक्षणदोष). प्राप्त वस्तूचा कालांतराने क्षय होतो जसे किंमती वस्त्रदेखील कालांतराने विरते (क्षयदोष). वस्तू मिळविताना इतरांची हिंसा करूनही ती मिळविली जाते. उदा., रेशीम मिळविताना ते ज्यापासून बनले त्या कीड्याची हत्या होते (हिंसादोष). वस्तू मिळाल्यावर तिच्याविषयी आत्यंतिक आसक्ती निर्माण होते (संगदोष). त्यामुळे प्राप्त झालेली वस्तू कोणाला द्यावी लागली, तर दु:ख होते. हे दोष टाळण्यासाठी अपरिग्रहाचे पालन करावे.

अपरिग्रह साधल्याने हळूहळू उपभोगाच्या साधनांविषयी वैराग्य निर्माण होते. उपभोगाची साधने व शरीर ह्याविषयी साधकाच्या चित्तात वैराग्य निर्माण होते तेव्हा तो स्वत:कडे साक्षीभावाने पाहू लागतो. ‘मी’ आणि ‘माझा देह’ यातील संबंध नश्वर आहे अशी जाणीव त्याच्या मनात निर्माण  होते, त्याचा देहाभिमान क्षीण होतो आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतात व त्याला भविष्याचेही ज्ञान होते (अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासम्बोध: || २.३९ — अपरिग्रह हा यम दृढ झाला असता, साधकाला पूर्वीचे व पुढील जन्मांचे ज्ञान होते).

अपरिग्रह ही एक प्रकारची साधना आहे. विषयांचा वारंवार भोग घेतल्याने इंद्रियाची  त्याविषयी आसक्ती वाढते. आसक्तीमुळे पुण्य किवा पापरूपी कर्म घडते. कर्मानुरूप फल प्राप्त होते. परिणामत: विषयवासनांचे सूक्ष्म संस्कार, त्यायोगे पुनर्जन्म, त्यातील वासनापूर्ती, तिच्यासाठी घडणारे कर्म आणि पुन्हा जन्म या फेऱ्यात जीव अडकतो. या दुष्टचक्राचा भेद करण्यासाठी अपरिग्रहाचे पालन करणे आवश्यक ठरते.

भगवद्गीतेतही (६.१०) योग्याचे वर्णन करताना त्याने एकांतात राहून अपरिग्रहाचे पालन करीत मन स्थिर ठेवावे व साधना करावी असे म्हटले आहे. असा योगी मातीचे ढेकूळ, पाषाण किंवा सोने यांना सारखेच लेखतो (६.८).

अपरिग्रहाचे पालन केल्यास वर्तमान आणि भविष्यकाळातील साधनसंपत्तीविषयक असमतोलाच्या समस्येचे निराकरण होण्यास काही अंशी मदत होऊ शकते.

संदर्भ :

  • कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शनम्, काशी हिन्दू विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.

समीक्षक : कला आचार्य