योगमत हे आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे आहे. त्याला सेश्वर सांख्य म्हणतात. सांख्यदर्शन ईश्वर या विषयावर मौन बाळगते. परंतु, सांख्यांच्या तत्त्वज्ञानावर अधिष्ठित योगदर्शन मात्र ईश्वर या संकल्पनेचे विवरण करते. असे असले तरी योगदर्शनातील ईश्वराची संकल्पना अन्य दर्शनांपेक्षा निराळी आहे.
योगदर्शनानुसार ईश्वर सृष्टीचा कर्ता, धर्ता किंवा संहारकर्ता नाही तर तो केवळ ‘विशेष पुरुष’ आहे (क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वर: | योगसूत्र १.२४). ‘क्लेश, कर्म, आशय (संस्कार) आणि कर्माचे फळ यांच्या संबंधाने रहित असा सर्व पुरुषांहून विशेष तो ईश्वर होय.’ योगदर्शनात पुरुष ही संज्ञा जीवात्म्यासाठी वापरली आहे. जीवात्मे जन्ममृत्यूच्या चक्रात अर्थात संसारात बद्ध असतात व नंतर विवेकज्ञान झाल्यावर मुक्ती प्राप्त करतात. या पार्श्वभूमीवर ईश्वर ‘विशेष पुरुष’ आहे, या विधानाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. ईश्वर ‘विशेष पुरुष’ आहे कारण तो अन्य पुरुषांप्रमाणे अर्थात जीवात्म्यांप्रमाणे कधीही बद्ध नसतो. तो नित्यमुक्त आहे. त्याला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे क्लेश, कर्माचा भोग, कर्माचे संस्कार आणि त्याची सुखदु:खरूपी फळे स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत, म्हणून तो ‘पुरुष-विशेष’ आहे. तो कूटस्थ नित्य आहे आणि सर्वव्यापी आहे.
ऐश्वर्याची पराकाष्ठा केवळ ईश्वराच्या ठायी वास करते. बद्ध किंवा मुक्त पुरुषांच्या ठायी ऐश्वर्य त्यांच्या प्रत्येकाच्या साधनेनुसार कमी जास्त प्रमाणात असू शकते.
योगदर्शनामध्ये ईश्वरप्रणिधान ही संकल्पना चार सूत्रांमध्ये आढळते. ती सूत्रे पुढीलप्रमाणे — “शौचसंतोषतप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा: |” (योगसूत्र २.३२; पवित्रता, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत.) “तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग: |” (योगसूत्र २.१; तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान ह्यास क्रियायोग म्हणतात.) “ईश्वरप्रणिधानाद्वा |” (योगसूत्र १.२३; अथवा ईश्वराच्या भक्तीने चित्तवृत्तिनिरोध होतो.) “समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् |” (योगसूत्र २.४५; ईश्वरप्रणिधानाने समाधीची सिद्धी होते.)
कोणाला भूतकाळाविषयी, कोणाला वर्तमानकाळाविषयी, कोणाला भविष्यकाळाविषयी, कोणाला एका विषयासंबंधी, कोणाला अनेक विषयांसंबंधी, कोणाला स्थूलविषयासंबंधी, कोणाला सूक्ष्मविषयासंबंधी ज्ञान असते. एखाद्याला स्वल्प ज्ञान असते तर दुसऱ्याला अधिक ज्ञान असते. तात्पर्य, बद्ध जीव सर्वज्ञ नसतो. केवळ विवेकख्याती प्राप्त केलेले योगी सर्वज्ञ असू शकतात. पतंजलींनी ईश्वराचा निर्देश केवळ ‘सर्वज्ञ’ या शब्दाऐवजी ‘सर्वज्ञतेचे बीज’ या शब्दांनी केला आहे. (तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम् | योगसूत्र १.२५; त्याचे ठिकाणी सर्वज्ञपणाचे बीज पराकाष्ठेचे आहे.) ‘बीज’ शब्दाचे येथे काय प्रयोजन आहे, याविषयी मतमतांतरे आढळतात. लक्ष्यार्थाने बीज म्हणजे कारण. बीजामध्ये संपूर्ण वृक्ष अव्यक्त रूपात सामावलेला आहे आणि तो बीजातून प्रकट होतो त्याप्रमाणे ईश्वरात संपूर्ण ज्ञान सामावलेले आहे. योगदर्शनानुसार ईश्वर हा सृष्टिचक्रांमध्ये प्रारंभी उत्पन्न झालेल्या ब्रह्मा इत्यादी देवता, कपिल, अङ्गिरा आणि अन्य ऋषि इत्यादींचाही गुरु आहे; कारण तो अनादि आहे, कालातीत आहे (पूर्वेषाम् अपि गुरु: कालेनानवच्छेदात् | योगसूत्र १.२६). सृष्टिचक्रामध्ये उत्पत्ती आणि प्रलय हे चक्र निरंतर कार्यरत असते. प्रलयानंतर होणाऱ्या प्रत्येक सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मादि देवता आविर्भूत होत असतात. त्यांचा आणि ऋषींचा गुरु असल्यामुळे त्याला सर्वज्ञतेचे बीज सर्व ज्ञानाचा मूळ स्रोत म्हटले आहे.
ॐ ईश्वराचा वाचक म्हणजेच त्याचे प्रतीक आहे असे “तस्य वाचक: प्रणव: |” हे पतंजलीचे सूत्र (योगसूत्र १.२७; प्रणव त्या ईश्वराचा बोध करविणारा आहे.) सांगते. संस्कृतमधील ‘वच्’ धातूचा एक अर्थ ‘प्रतीक असणे’ असा आहे. ज्याप्रमाणे दिवा आपल्या प्रकाशाने आधीच उपस्थित पदार्थाला प्रकाशित करून त्याचे ज्ञान करून देतो, त्याप्रमाणे नित्य असलेल्या ईश्वराचा संकेत ॐ या प्रतीकाने होतो. मात्र योगी याज्ञवल्क्य असे म्हणतात की, ॐकार हे ईश्वराचे नाव आहे (तत्त्ववैशारदी १.२७). पतंजलि असे म्हणतात की, ॐचा जप आणि त्या शब्दाचा अथवा प्रतीकाचा जो अर्थ ‘ईश्वर’ त्यावर एकाग्रता (भावनम्) याद्वारे ईश्वराची भक्ती करता येते (तज्जपस्तदर्थभावनम् | योगसूत्र १.२८; त्या प्रणवाचा जप तसेच त्याच्या अर्थाचे चिंतन करणे, हे ईश्वरप्रणिधान/ईश्वर भक्ती होय). ईश्वरप्रणिधानामुळे समाधी लाभ होतो.
योगदर्शनानुसार जीवाचे मुख्य लक्ष्य चित्तवृत्तींचा निरोध व त्याद्वारे कैवल्य प्राप्त करणे हे आहे. त्यासाठी चित्ताची एकाग्रता साधणे अत्यंत आवश्यक आहे. ईश्वर-प्रणिधान एकाग्रता आणि समाधी या दोहोंसाठी उपकारक ठरते. ईश्वरप्रणिधानाचा अर्थ सर्व कर्मे ‘अहम्’पणाचा म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान सोडून तसेच फळाच्या आशेचा त्याग करून ईश्वरार्पण करणे.
योगशास्त्रामध्ये ध्यानाचे जे अनेक विषय सांगितले आहेत त्यापैकी ईश्वर हा ध्यानाचा एक विषय आहे (ईश्वरप्रणिधानाद्वा | योगसूत्र १.२३; समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् | योगसूत्र २.४५). समाधीमुळे प्रज्ञेचा उदय होतो आणि त्यायोगे कैवल्य प्राप्त होते.
पहा : ईश्वरप्रणिधान.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.