बगळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकॅनिफॉर्मिस (बक) गणाच्या आर्डीइडी कुलात केला जातो. जगात बगळ्यांच्या सु. ६४ जाती आढळतात. उष्ण प्रदेशात त्यांच्या जाती अधिक दिसून येतात. बगळ्याची मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असतात. त्याच्या मानेच्या मणक्यांची रचना विशिष्ट असल्यामुळे तो मान फक्त उभ्या पातळीत हालवू शकतो. त्याला मान बाजूला वळविता येत नाही. तो विश्रांती घेत असताना डोके व खांदा यांमध्ये घेतलेली मान ‘S’ अशा आकाराची होते. भक्ष्य पकडताना त्याची मान सरळ हाेते.

बगळे सामान्यपणे समूहाने पाण्याजवळ, समुद्रकिनाऱ्‍याजवळ, शेतात किंवा दलदलीच्या जागी आढळून येतात. त्यांची घरटी पाण्याजवळ तसेच पाण्यापासून दूरच्या झाडांवर असतात. एका झाडावर त्यांची अनेक घरटी असतात. इतर पक्ष्यांमध्ये असलेली तैलग्रंथी बगळ्यांमध्ये अविकसित असते. बगळे पाण्याच्या पृष्ठभागावरून अगदी जवळून उडतात किंवा उथळ पाण्यात हळूहळू चालत जातात. उडताना किंवा चालताना त्यांची नजर भक्ष्याकडे असते. अनेकदा ते पाण्यात एका पायावर स्वस्थ उभे राहून भक्ष्य जवळ येण्याची वाट बघतात. भक्ष्य जवळ आलेले दिसताच ते चपळतेने चोचीत पकडतात आणि गिळून टाकतात. बगळ्यांत नर आणि मादी यांचा रंग सारखाच असतो. मात्र विणीच्या हंगामात चोच व पाय यांचा रंग भडक तपकिरी किंवा करडा होतो. या काळात त्यांची पिसेही गडद रंगांची दिसून येतात.

गायबगळा (बुबुल्कस आयबिस)

गवत चरणाऱ्‍या गुरांबरोबर आढळणाऱ्‍या बगळ्याला सामान्यपणे गायबगळा (कॅटल इग्रेट) म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव बुबुल्कस आयबिस आहे. भारत, श्रीलंका आणि म्यानमार या देशांत ते दिसून येतात. गायबगळा साधारणपणे कोंबडीच्या आकाराचा असून त्याच्या शरीराची लांबी सु. ५० सेंमी. असते. शरीर सडपातळ व पांढऱ्या शुभ्र रंगाचे असते. मान आणि पाय लांब असतात. पायांचा रंग काळा असतो. चोच लांब आणि पिवळसर असते. डोळे सोनेरी पिवळ्या रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्याच्या डोक्यावर आणि मानेवर केसांसारखी नाजूक सोनेरी पिवळी लहानलहान पिसे उगवतात. त्याच्या पाठीवरही अशीच रंगीत पण लांब आणि मोठी पिसे येतात. काही वेळा डोक्यावर आणि मानेवर नारिंगी रंगछटा दिसून येते. विणीनंतर ही पिसे गळून पडतात.

चरणाऱ्‍या गुरांबरोबर गायबगळे मोठ्या कळपाने तसेच एकटेही आढळतात. चरणाऱ्‍या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, गेंडे, गवे व घोडे यांच्या पायांनी गवत तुडविले जाते किंवा तोंडाने गवत तोडले जाते, तेव्हा गवतातील कीटक हालचाल करून उडू लागतात. या कीटकांना खाण्यासाठी गायबगळे त्या जनावरांबरोबर दिसून येतात. बऱ्‍याच वेळा ते गायीच्या पाठीवर बसून भक्ष्य मिळवितात. गायीच्या पायांमधून आतबाहेर उड्या मारत व फिरत ते खाद्य पकडतात. टोळ, माश्या, गोमाश्या व गोचीड इ. त्यांचे मुख्य अन्न आहे. तसेच ते मासे, बेडूक व सरडे यांची पिलेही खातात.

संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बगळे टोळके करून किंवा तिरक्या ओळी करून झाडांवरील घरट्याकडे परतताना दिसतात. त्यांची घरटी काटक्यांनी तयार केलेली असतात. त्या झाडांवर पाणकावळे, कावळे आणि मैना यांचीही घरटी असतात. बहुधा त्यांची घरटी एखाद्या मोठ्या परिसरात वसाहतीप्रमाणे असतात. त्यांच्या विणीचा हंगाम उत्तर भारतात जून-ऑगस्ट, तर दक्षिण भारतात नोव्हेंबर-मार्च असा असतो. मादी एका खेपेला ४-५ अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असून त्यांवर निळ्या अथवा हिरव्या रंगाची झाक असते. एक महिन्यानंतर अंड्यांतून पिले बाहेर येतात. नर-मादी दोघेही पिलांना अन्न भरवितात. साधारणपणे दोन महिन्यांनी पिले उडू लागतात.

रंगांवरून बगळ्यांना राखी बगळा, जांभळा बगळा आणि पांढरा बगळा अशी नावे आहेत. पांढऱ्‍या बगळ्यांमध्ये आकारावरून मोठा, मध्यम आणि लहान असे प्रकार पडले आहेत. अधिवासावरूनही गायबगळा, पाणबगळा व रात्रीच्या वेळी बाहेर पडणारा म्हणून रातबगळा अशी नावे पडली आहेत. या सर्व बगळ्यांच्या प्रजाती आणि जाती वेगवेगळ्या आहेत. इंग्रजी भाषेत इग्रेट व हेरॉन अशीही नावे बगळ्यांसाठी सर्वसाधारणपणे वापरली जातात.

This Post Has 2 Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा