महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असून गडाची उंची समुद्रसपाटीपासून फक्त ७ मी. आहे.

कनकदुर्ग.

हर्णे बंदराच्या ५० मी. अलीकडे गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. या वाटेवर डावीकडे एक बुरूज अवशेषरूपात आहे. बुरुजाशेजारील एक वाट गडाच्या सपाटीवर पोहोचते. याच वाटेने दीपगृहाच्या दिशेने जात असताना उजवीकडे म्हणजेच पश्चिमेकडील कातळात पाण्याच्या सात टाक्या खोदलेल्या आहेत. टाक्यांमध्ये बारमाही पाणी असते. या टाक्यांपासून फक्त ४ मी. अंतरावर समुद्र असतानाही टाक्यांतील पाणी मात्र गोडे आहे; तथापि सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाही. जवळच कातळात आणखी एक टाके खोदलेले दिसते. दुर्ग अभ्यासक चिं. ग. गोगटे यांच्या मते, गडावर एकूण ९ टाक्या होत्या; पण सध्या गडावर आठच टाक्या दिसतात.

पाण्याची टाकी, कनकदुर्ग.

दीपगृह हा गडाचा सर्वोच्च माथा आहे. गडाच्या समुद्राकडील तीनही बाजूला तासलेले खडक आहेत. या भागात पूर्वी तटबंदी नसावी. किल्ल्याचे क्षेत्रफळ ७४०६ चौ.मी. असून किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला आहे. किल्ल्याची लांबी उत्तर दक्षिण जास्त असून पूर्व पश्चिम रुंदी कमी आहे.

जमिनीच्या बाजूला तटबंदी व बुरूज यांचे अवशेष दिसतात. दीपगृहाशेजारी तेथील कर्मचार्‍यांचे कार्यालय असून सुरक्षिततेच्या कारणास्तव दीपगृहामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे.

बुरूज,कनकदुर्ग.

३ एप्रिल १७५५ रोजी फत्तेदुर्ग, कनकदुर्ग, हर्णे-गोवा व सुवर्णदुर्ग हे किल्ले तुळाजी आंग्रे यांच्याकडे होते. १७१० मध्ये साताऱ्याच्या छ. शाहू महाराजांनी कनकदुर्ग व फत्तेदुर्ग हे किल्ले बांधल्याचे म्हटले जाते, पण हा वृत्तांत काहीसा योग्य वाटत नाही. कारण १७०८ मध्ये छ. शाहू महाराज साताऱ्याला आले. त्या वेळी महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात वाद सुरू होते. याचवेळी कोकणातील जास्तीत जास्त भाग हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. कान्होजी आंग्रे हे त्या वेळी ताराबाईंच्या पक्षात होते. अशा वेळी कान्होजी आंग्रेसारखा सरदार छ. शाहू महाराजांच्या लोकांना सुवर्णदुर्ग या अभेद्य किल्ल्याजवळ दोन किल्ले बांधू देईल, असे वाटत नाही. १७०० मध्ये जंजिर्‍याचा हबशी सिद्दी खैरातखानाने सुवर्णदुर्गवर स्वारी केली होती; पण त्यामध्ये त्याला पराभव पतकरावा लागला. या दरम्यान खैरातखानाने सुवर्णदुर्गच्या किनार्‍यावरील प्रदेश घेतला. सुवर्णदुर्गावर वचक राहावा, या हेतूने त्याने कनकदुर्ग व फत्तेदुर्ग हे दोन किल्ले बांधले असावेत. हे दोन्ही किल्ले १७२७ पर्यंत त्याच्याकडेच होते.

फत्तेदुर्ग आणि दगडी पूल.

फत्तेदुर्ग : मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा पण पूर्णतः नामशेष झालेला किल्ला म्हणजे फत्तेदुर्ग किंवा फतेहदुर्ग. फत्तेदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराजवळ होता. हर्णे बंदरावर कनकदुर्गाच्या उत्तरेला बंदराकडे येणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेला एका छोट्या टेकडीवर फत्तेदुर्ग किल्ला होता. किल्ला तीन बाजूने पाण्याने वेढलेला आहे. सध्या या टेकडीवरील दाट लोकवस्तीमुळे येथे फत्तेदुर्ग नावाचा किल्ला होता, याचा कोणताच पुरावा दिसत नाही. भरतीच्यावेळी कनकदुर्ग व फत्तेदुर्ग वेगळे झाल्यावर संपर्क राहावा म्हणून आंग्रे कालखंडात येथे एक दगडी पूल बांधला गेला. फत्तेदुर्ग किल्ल्याच्या बाहेर हा दगडी पूल दिसतो. अद्यापि हा पूल बंदराकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरला जातो. या पुलावरून हर्णे बंदरापर्यंत जाणारा रस्ता आहे. अशाच प्रकारचा पूल रायगड जिल्ह्यातील कुलाबा व सर्जेकोट या किल्ल्यांच्या दरम्यान बांधलेला दिसून येतो. यावरून हे बांधकामही आंग्रे काळातील असावे, असे वाटते. किल्ल्याचे क्षेत्रफळ ६२७७ चौ.मी. असून कोणतेच अवशेष अस्तित्वात नाहीत. किल्ला उत्तर दक्षिण १३५ मी. लांब व पूर्व पश्चिम रुंदी ८५ मी. आहे. दाट वस्तीमुळे किल्ल्यावर सर्वेक्षण करणे सहज शक्य नाही; तथापि सखोल सर्वेक्षण केले, तर तटबंदी किंवा बुरुजाचे काही अवशेष समोर येऊ शकतील.

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.

                                                                                                                                                                          समीक्षक : जयकुमार पाठक