ट्रेव्हर-रोपर, ह्यू : (१५ जानेवारी १९१४ — २६ जानेवारी २००३). प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार. त्यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्थ अंबरलंड प्रांतात ग्लाटन ह्या छोट्या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बर्टी ट्रेव्हर-रोपर व आईचे नाव कॅथलीन. त्यांना पॅट्रिक आणि शीला नावाचे लहान बहीणभाऊ होते. वडील व्यवसायाने वैद्यक व उच्चकुलीन घराण्यातील होते, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना सामान्य लोकांत मिसळू दिले नाही.

रोपर यांचे शिक्षण चार्टरहौस येथील बेलहेवन हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी ऑक्सफर्ड मधील ख्राईस्ट चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला त्यांनी प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास केला; पण नंतर इतिहास विषय निवडला. त्यांनी आधुनिक इतिहास ह्या विषयात उच्च श्रेणीमध्ये पदवी मिळविली (१९३६). नंतर ते ऑक्सफर्ड येथील मर्टन कॉलेजमध्ये इतिहास विषयातील संशोधक विद्यार्थी (१९३७-३९)  म्हणून रुजू झाले. १९३९ मध्ये त्यांना एम. ए. ही पदवी मिळाली. पुढील वर्षी त्यांनी आर्चबिशप लॉड नावाचा पहिला ग्रंथ लिहिला (१९४०). इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा सल्लागार व कॅन्टरबरीचा आर्चबिशप असलेल्या आर्चबिशप लॉडचे (१५७३ — १६४५) हे चरित्र होते.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर रोपर हे ब्रिटिश गुप्तचर संघटना एम. आय. ८ च्या रेडिओ सुरक्षेच्या संबंधित विभागात भरती झाले (१९३९). पुढे त्यांना गुप्तचर खात्याच्या रेडिओवरील माहिती संकलित करणाऱ्या विभागाचे अध्यक्ष नेमण्यात आले (१९४३). जर्मन गुप्तचर संघटनेने पाठवलेले संदेश ओळखणे व त्यांना रोखण्याचे मोठे काम त्यांनी केले. हे काम करत असताना रोपर यांना जर्मनीमध्ये  हिटलरला होणाऱ्या भूमिगत प्रतिकाराचा अभ्यास करण्यामध्ये रुची निर्माण झाली.

इ. स. १९४५ मध्ये रोपर यांनी हिटलरच्या मृत्यूचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि एक अहवाल तयार केला. त्यांनी ऑक्सफर्ड मधील ख्राईस्ट चर्च  कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली (१९४६). हिटलरच्या मृत्यूबाबत लिहिलेल्या अहवालात भर घालून त्यांनी द लास्ट डेज ऑफ़ हिटलर हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१९४७). हिटलरच्या अंतिम दिवसांचे वर्णन करणारा हा ग्रंथ खूप लोकप्रिय झाला. ह्या ग्रंथामुळे रोपर यांना हिटलरच्या इतिहासावरील एक तज्ज्ञ म्हणून ख्याती मिळाली. पुढील काळात त्यांना दुसऱ्या महायुद्धातील कागदपत्रे व घटनांची सत्यता पडताळण्यासाठी रेडिओ आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांसाठी आमंत्रण मिळू लागले. ह्याच काळात रोपर यांनी आपल्या इतिहास अध्यापन व संशोधन कामासोबत त्यांनी वृत्तपत्रांमध्ये अनेक लेख लिहिले. द ऑब्झर्व्हर ह्या वृत्तपत्राचा खास प्रतिनिधी म्हणून पश्चिम यूरोपमधील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्याचे काम त्यांनी केले (१९४७). पुढे टाइम्स न्यूज़पेपर्स लिमिटेड ह्या नामांकित वृत्तपत्र कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले (१९७४—२०००).

रोपर यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात आधुनिक इतिहास विषयातील ‘रेगियस प्रोफेसर’ म्हणून नेमणूक झाली (१९५७). ह्या पदावर असताना त्यांनी १५ ग्रंथ लिहिले आणि इतरांनी लिहिलेले १० ग्रंथ संपादित केले. ब्रिटिश अकादमीवर त्यांची फेलो म्हणून निवड करण्यात आली (१९६९). हा इंग्लंडमधील इतिहासकारांना मिळणारा सर्वोच्च सन्मान होता. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी त्यांना ‘लॉर्ड डाक्रे’ ही पदवी दिली (१९७९).

‘यूरोपचा आधुनिक इतिहास’ हे रोपर यांच्या अभ्यासाचे क्षेत्र. त्यांना आठ भाषा अवगत होत्या आणि जगभर भ्रमंती असल्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक बनली होती. इतिहास म्हणजे नुसता राजकीय घडामोडींचा इतिहास, ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांच्यावर फ्रान्समधील ‘ॲनाल्स’ इतिहासलेखन प्रणालीचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा ‘संपूर्ण इतिहास’ (l’histoire totale) लिहिण्याकडे कल होता. त्यांच्या हिटलरवरील ग्रंथामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यांचे अनेक ग्रंथ लोकप्रिय झाले. द राइज ऑफ ख्रिश्चन यूरोप (१९६५) ह्या ग्रंथामध्ये त्यांनी यूरोपातील प्राचीन काळातील रोमन साम्राज्यापासून ते मध्ययुगीन काळातील राजवटींचा इतिहास लिहिला आहे. त्यांचा रिलिजन, द रिफॉर्मेशन अँड  सोशल चेंज (१९६७) हा ग्रंथ देखील नावाजला गेला. त्यांनी द हर्मिट ऑफ़ पेकिंग (१९७७) ह्या शीर्षकाखाली सर एडमंड बॅकहाउस ह्या चिनी इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासकाचे चरित्र लिहिले.

रोपर यांना पीटरहाउस ह्या केंब्रिज विद्यापीठातील सर्वांत जुन्या कॉलेजचे ‘मास्टर’ नेमण्यात आले (१९८०). पुढे त्यांनी हे कॉलेज महिला-विद्यार्थिनींसाठी खुले केले (१९८३). ह्याच वर्षी ‘हिटलरच्या बनावट दैनंदिनीचे’ प्रकरण उद्भवले. हिटलरच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून नवीन सापडलेल्या हिटलरच्या दैनंदिनीच्या दस्तऐवजांची सत्यता तपासण्याचे काम त्यांच्याकडे आले. रोपर यांनी दस्तऐवज तपासले आणि ते दस्तऐवज सत्य आहेत, असा सल्ला दिला. मात्र काही दिवसांतच इतर काही तज्ज्ञांनी दैनंदिनी बनावट असल्याचे दाखवून दिले. ह्या प्रकरणाची चर्चा वृत्तपत्रांतून झाल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.

ऑक्सफर्ड येथे कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Sisman, Adam,  An Honourable Englishman : The life of Hugh Trevor-Roper, New York, 2011.
  • Trevor-Roper, H. R. Hermit of Peking : The hidden life of Sir Edmund Backhouse, London, 2008.
  • Trevor- Roper, H. R. The Last Days of Hitler, Chicago, 1992.

                              समीक्षक : अरुण भोसले