हॉब्सबॉम, एरिक : (९ जून १९१७ – १ ऑक्टोबर २०१२) सुप्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आणि मार्क्सवादी विचारवंत. त्यांचा जन्म लिओपोल्ड पर्सी हॉब्सबॉम आणि नेली ह्या पोलिश यहुदी दांपत्यापोटी इजिप्त मधील अलेक्झांड्रिया ह्या शहरामध्ये झाला. त्यांचे वडील व्यापारी होते. इ. स. १९१९ मध्ये हॉब्सबॉम कुटुंब ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे स्थायिक झाले.

हॉब्सबॉम यांनी आपले बालपण पहिल्या महायुद्धातील आक्रमणांनी उद्ध्वस्त झालेल्या व्हिएन्नात घालविले. १९२९ मध्ये त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दोन वर्षांनी त्यांच्या आईचे फुप्फुसाच्या रोगामुळे निधन झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर हॉब्सबॉम आणि त्यांची धाकटी बहीण नॅन्सी त्यांच्या काकांच्या घरी राहू लागले. बर्लिनमधील प्रिन्स हेनरिक जिम्नॅशियम ह्या प्रख्यात शाळेत शिकत असताना त्यांना रशियामधील साम्यवादी क्रांतीच्या इतिहासाने प्रभावित केले. ह्या दरम्यान त्यांच्या मनात साम्यवादी विचारांमध्ये रुची निर्माण झाली. १९३३ मध्ये त्यांनी आपल्या काकांच्या कुटुंबासोबत लंडन येथे स्थलांतर केले. १९३६ मध्ये केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर त्यांच्या डाव्या राजकीय विचारांना पोषक वातावरण मिळाले. १९३६ साली ते केंब्रिज विद्यापीठातील साम्यवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य झाले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदवी मिळविली (१९३९). त्यांचा विवाह मुरियल सीटन यांच्याशी झाला (मे १९४३); मात्र हा विवाह जास्त काळ टिकला नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला (१९५१). पुढे १९६३ मध्ये मार्ले श्वार्झ यांच्याबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शिक्षण सेवक योजनेमध्ये (education corps) काम केल्यानंतर हॉब्सबॉम केंब्रिज विद्यापीठात परतले आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९४७ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बीरबेक कॉलेजमध्ये इतिहास विषयाच्या अधिव्याख्याता पदावर नोकरी स्वीकारली. ते दीर्घकाळ येथे कार्यरत राहिले. प्राध्यापक पदावर असताना ते निवृत्त झाले (१९८२). १९८२ ते २०१२ ह्या काळात ते लंडन विद्यापीठात मानद प्राध्यापक ह्या पदावर कार्यरत होते. त्यांना अनेक विद्यापीठांमध्ये ‘व्हिझिटिंग प्रोफेसर’ (अभ्यागत प्राध्यापक) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. स्टॅनफर्ड विद्यापीठ (१९६०), मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९६७), युनिव्हर्सिडेड नॅशनल ऑटोनोमा डी मेक्सिको (१९७१), कॉर्नेल विद्यापीठ (१९७६-१९८२) आणि न्यू स्कूल ऑफ़ सोशल रिसर्च (१९८४ ते १९९७) ह्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी ‘व्हिझिटिंग प्रोफेसर’ म्हणून काम केले.

इंग्लंडमधील एक प्रभावशाली मार्क्सवादी इतिहासकार हॉब्सबॉम यांना ओळखले जाते. त्यांची एक प्रकांड पंडित म्हणून ख्याती होती. अनेक वर्षे ते इंग्लंडच्या साम्यवादी पक्षाचा संबंध असलेल्या इतिहासकारांच्या गटाचे सदस्य होते. प्रसिद्ध इतिहासकार ई. पी थॉमसन , क्रिस्टोफर हिल, रॉडने हिल्टन, जॉन साविल आणि व्हिक्टर कियरनान हे देखील ह्या गटाचे सदस्य होते. हॉब्सबॉम यांनी पास्ट अँड प्रेझेंट  हे इतिहासविषयाचे सुप्रसिद्ध नियतकालिक सुरू करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली (१९५२). इतिहासाच्या पारंपरिक नियतकालिकांची चौकट मोडून नवीन विचार व दृष्टीकोनांचा वापर करण्याच्या हेतूने हे नियतकालिक सुरू केले होते.

द एज ऑफ रिव्होल्यूशन : यूरोप १७८९-१८४८  (१९६२ ), द एज ऑफ कॅपिटल १८४८-१८७५ (१९७५), द एज ऑफ एम्पायर १८७५ – १९१४ (१९८७) आणि द एज ऑफ एक्सट्रीम्स : द शॉर्ट ट्वेंटिएथ सेंचुरी (१९९४ ) ह्या त्यांच्या चार ग्रंथांच्या मालिकेमुळे आधुनिक जगाचे इतिहासकार म्हणून त्यांचा लौकिक सर्वत्र झाला. हॉब्सबॉम यांनी ह्या ग्रंथांमध्ये जागतिक इतिहासातील भांडवलशाहीचा विजय आणि परिवर्तन प्रतिबिंबित केले आहे. पहिल्या ग्रंथात १८ व्या शतकाच्या शेवटी झालेल्या फ्रान्समधील राजकीय क्रांती (१७८९) आणि ब्रिटन मधील औद्योगिक क्रांती यांचा इतिहास मांडला आहे. तर मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या ग्रंथात १९८० आणि १९९० च्या दशकांमध्ये यूरोपात झालेल्या साम्यवादी राजवटींच्या पतनाचा इतिहास रचला आहे.

हॉब्सबॉम हे मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांच्या ग्रंथांमधून वर्ग-जाणीव आणि वर्ग-संघर्ष यांच्या सांस्कृतिक अभ्यासाची प्रभावशाली मांडणी स्पष्टपणे जाणवते. त्यांनी शेतकरी-कामगारांच्या विचार आणि कृत्यांवर लेबरिंग मेन (१९६४), वर्ल्ड्स ऑफ लेबर (१९८४) , प्रिमिटिव रिबेल्स (१९५९) आणि बैंडिट्स (१९६९) ह्या ग्रंथांमध्ये विपुल लेखन केले. त्यांचे इन्व्हेंशन ऑफ ट्रॅडिशन (१९८३) आणि नेशन्स अँड नॅशनलिझ्म सीन्स १७८० (१९९०) हे ग्रंथ राष्ट्रवादाच्या अभ्यासासाठी एक मौलिक योगदान होते. त्यांच्या इतर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांमध्ये अनकॉमन पीपल : रेजिस्टेंस , रिबेलियन अँड जाज (१९९८), इंटरेस्टिंग टाइम्स (२००२), ग्लोबलायजेशन, डेमोक्रसी अँड टेरररिझ्म (२००७), हाउ टू चेंज द वर्ल्ड (२०११) हे नावाजलेले ग्रंथ मोडतात.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश अकादमीने त्यांना सदस्य म्हणून निवडले (१९७६). चिली, ग्रीस, जपान आणि अमेरिकेतील विद्यापीठ आणि संस्थांनी त्यांना मानद पदव्या दिल्या होत्या. २००३ मध्ये विसाव्या शतकाच्या यूरोपियन इतिहासाला दिलेल्या योगदानासाठी त्यांना नामांकित बलझान पारितोषिक दिले गेले. २०१० मध्ये त्यांना ‘हे लिटररी फेस्टिवलʼ या साहित्यिक उपक्रमाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

लंडन येथे कर्करोगाने त्यांचे  झाले.

संदर्भ :

  • Evans, Richard J. Eric Hobsbawm : A Life in History, Oxford, 2019.
  • Hobsbawm, E. Interesting Times : a twentieth-century life, 2002.
  • Samuel, R. ‘British Marxist historians, 1880–1980’, New Left Review, March–April 1980.

                                                                                                                                                                        समीक्षक : अरुण भोसले