अरुणा असफ अली : ( १६ जुलै १९०९ — २९ जुलै १९९६). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी महिला, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. त्यांचा जन्म पंजाबमधील कालका शहरात एका श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. पुढे हे कुटुंब कलकत्ता शहरात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रॉटेस्टंट विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने २३ वर्षे मोठे असलेल्या सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला (१९२८). या विवाहास त्यांच्या कुटुंबियाचा विरोध होता. विवाहानंतर अरुणा आपल्या पतीबरोबर यूरोप, अमेरिका, सोव्हिएत युनियन, मेक्सिको या देशांचा दौरा केला. युनेस्कोसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता.

असफ अली हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे अरुणा यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी आला. त्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्या. महात्मा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यांच्याबरोबर त्या सभा, प्रभातफेऱ्या यांमध्ये सहभागी झाल्या. १९३० व १९३२ च्या कायदेभंग चळवळीत तसेच १९४१ मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या, त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९३० पासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे वापरले. म. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी मीठ बनविणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरविणे हे काम त्यांनी सर्वत्र फिरून केले. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली. गांधी – आयर्विन करारानुसार बहुसंख्य राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली, पण अरुणा यांना मुक्त करण्यात आले नाही. जनतेच्या प्रखर आंदोलनामुळे काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. १९३२ मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आणि दोन हजार रुपयांचा दंडही केला. तुरुंगातही सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुरुंगात राजकीय कैद्यांना चांगले जगता यावे म्हणून त्यांनी भूक–हरताळ करून तुरुंगाधिकाऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.

छोडो भारत आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्यास वेगळे वळण मिळाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर आयोजित केले होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकल्याने देशात राजकीय पोकळी निर्माण झाली होती. गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा पहारा होता. अशा वेळी पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. ऑगस्ट क्रांतिदिनाच्या त्या वीरांगना ठरल्या. चळवळीला मदत करण्याच्या उद्देशाने चार वर्षे १९४६ पर्यंत त्या भूमिगत कार्यरत राहिल्या. या काळात कलकत्त्यात असताना त्यांनी काँग्रेसच्या आंतरप्रांतीय स्वरूपाच्या हालचालींना मार्गदर्शन केले. दिल्लीतील भूमिगत चळवळीच्या त्या प्रमुख नेत्या होत्या. भूमिगत कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या गटांना भेटून त्या प्रोत्साहन देत व प्रसंगी सढळ हाताने आर्थिक साहाय्यही करीत.

राममनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेसच्या इन्किलाब या नियतकालिकाचे संपादन अरुणाजी करीत असत. त्यांना अटक करणे हे एक सरकारपुढे आव्हान होते. त्यांच्या अटकेसाठी सरकारने पाच हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. त्यांची प्रकृती ढासळत असता म. गांधीजींनी त्यांना पोलिसांना शरण जाण्याचा दिलेला सल्लाही त्यांनी नाकारला होता. पुढे त्यांच्यावरील वॉरंट रद्द झाले (१९४६).

अरुणा १९४७ मध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. दिल्लीमध्ये काँग्रेस संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. सन १९४८ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला; पण लगेचच दोन वर्षांनी समाजवादी पक्ष सोडून त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने डावा समाजवादी पक्ष निर्माण केला (१९५०). पुढे हा पक्ष कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाला (१९५५). अरुणा या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्य आणि अखिल भारतीय कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष झाल्या. १९५८ मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडला व सक्रिय राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिल्या.

अरुणा दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या (१९५८). या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी प्रयत्न केले. लिंक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणूनही त्यांनी कार्य केले. दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या पेट्रिऑट या इंग्रजी दैनिकाशी त्या शेवटपर्यत जोडल्या होत्या. ‘इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी’, ‘ऑल इंडिया पीस कौन्सिल’, ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन’ इत्यादी सामाजिक संस्थांशी त्या संबंधित होत्या. आपल्या अखेरच्या काळात दिल्लीतील झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांनी प्रौढ साक्षरता, वैद्यकीय मदत व रोजगार निर्मिती अशा स्वरूपाचे भरीव कार्य केले. साधी राहणी, समाजवादी विचारसरणी आणि निर्भयता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष होत. त्यांच्या ट्रॅव्हल टॉक या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पंडित नेहरू त्यांचे वर्णन करताना म्हणतात, ‘अरुणा हे एक अस्वस्थ आणि दुसऱ्यांना अस्वस्थ करणारे व्यक्तिमत्त्व आहे.’

अरुणा यांना अनेक मानसन्मान मिळाले. सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९५५), लेनिन शांतता पुरस्कार (१९७५), आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा ‘जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ (१९९१) आदी सन्मान त्यांना मिळाले. लेनिन शांतता पुरस्काराची रक्कम त्यांनी जनतेच्या आणि धर्मार्थ कार्याला देणगी दिली. भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’, तसेच सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांचा गौरव केला (१९९७). भारतीय टपाल खात्याने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).

दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कवि, माधवी, साठ महामानव, लातूर, २०१०.
  • गव्हाणे, किशोरकुमार आणि इतर, भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास, औरंगाबाद,२०१५.
  • डिखोळकर, मनीषा, संपा. मोदी, नवाझ ‘अरुणा असफ अली – भारतमातेची धाडसी कन्या’, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया, पुणे, २००३.

समीक्षक : अरुण भोसले