दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५ च्या सुमारास दत्त यांचे मॅट्रिकचे शिक्षण झाले. त्या वेळी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. यानंतर कानपूरच्या पी. पी. एन. महाविद्यालयात शिकत असताना थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते सुरुवातीला कानपूरमध्ये हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतीकारी संघटनेत कार्य करू लागले. या संघटनेत काम करत असतानाच त्यांनी बाँब बनविण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक बाँब बनविण्याचा कारखाना गुप्तपणे चालू करण्यात आला.

लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने करताना झालेल्या जबर लाठीहल्ल्यात ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपतराय हे जखमी होऊन पुढे त्यांचे निधन झाले (१९२८). या घटनेमुळे ब्रिटिशांच्या विरोधात देशभर तीव्र असंतोषाची लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधिकारी स्कॉट याचा खून करण्याचे ठरविले, तथापि या हल्ल्यात स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी साँडर्स मारला गेला. तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याची पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली.

त्यातच ब्रिटिश सरकारला अनिर्बंध सत्ता व अधिकार मिळवून देणारी दोन अन्याकारक विधेयके (ट्रेड डिस्प्यूट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) ब्रिटिश सरकार लादणार होते. या विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जातून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली. त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ, असा मजकूर होता. त्यानंतर पळून न जाता दोघेही ‘इन्किलाब जिंदाबादʼ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले.

भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तर तत्पूर्वीच्या लाहोर येथील साँडर्स हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून भगतसिंग आणि त्यांचे सहकरी सुखदेव, राजगुरू यांना पुढे फाशीची शिक्षा सुनावली. आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दु:खी होते. परंतु क्रांतिकारक फासावर लटकूनच नाही, तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगूनसुद्धा लढा देतात, अशा शब्दांत भगतसिंगांनी त्यांची समजूत घातली. अंदमानच्या कारागृहातही बटुकेश्वर दत्त यांनी उपोषण करून इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवला. महात्मा गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (१९३८). छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यावरून पुन्हा त्यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. या दरम्यान त्यांना क्षयरोगाचाही सामना करावा लागत होता. पुढे १९४५ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर ते राजकीय प्रसिद्धीपासून दूरच राहिले. अंजली या युवतीशी त्यांनी विवाह केला (१९४७) व पाटणा येथे स्थायिक झाले. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिस्थळाशेजारी हुसेनीवाला (पंजाब) येथे करण्यात आले.

अनिल वर्मा यांनी लिहिलेले बटुकेश्वर दत्त : भगतसिंग के सहयोगी हे त्यांच्यावरील पुस्तक प्रसिद्ध आहे (२०१६).

संदर्भ :

  • Chatterji, Jogesh Chandra, In Search of Freedom, Delhi, 1966.
  • Gupta, Manmath Nath, History of the Revolutionary Movement in India, Delhi, 1960.
  • टंडन, पुरुषोत्तमदास, अमर-शहीद सरदार भगतसिंह, अलाहाबाद, १९४७.
  • त्रिवेदी, रामदुलारे, शहीद सरदार भगतसिंह, कानपूर, २०००.

                                                                                                                                                                                                                        समीक्षक : अवनीश पाटील