बेसिकोव्हिच, अब्राम सेमोइलोव्हिच : ( २३ जानेवारी, १८९१ ते २ नोव्हेंबर, १९७०) 

बेसिकोव्हिच यांचा जन्म रशियामधील बेर्डीन्स्क (Berdyansk) येथे झाला. रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून त्यांनी १९१२ साली गणितात पीएच.डी. पदवी मिळवली. सुविख्यात गणिती ए. मार्कोव्ह हे त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. बेसिकोव्हिच यांनी सुरुवातीस संभाव्यता सिद्धांतात संशोधन सुरु केले. १९१७ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक रशियातील पर्म विद्यापीठात झाली. रशियन क्रांतीनंतर १९२० साली ते रशियातील पेट्रोग्राड या विद्यापीठात अध्यापन करू लागले.

रशियामधील अशांतीच्या वातावरणातून कशीबशी सुटका करून बेसिकोव्हिच यांनी १९२४ मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे हेराल्ड बोरसोबत (Harald Bohr) रॉकफेलर फेलो म्हणून गणिती काम केले. ते कार्य बव्हंशी आवर्तनी फल (Almost Periodic Functions) यांच्याशी संबंधित होते आणि ते त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. त्या फलांना त्यांच्या नावाने ओळखले जाते. १९२५ मध्ये सुप्रसिद्ध गणितज्ञ जी. एच. हार्डी व त्यांची भेट ऑक्सफोर्ड येथे झाली. त्यांची गणिती क्षमता हार्डीनी ओळखली आणि त्यांच्या शिफारसीमुळे बेसिकोव्हिचना इंग्लंडमधील लिव्हरपूल विद्यापीठात शिकवण्याची संधी मिळाली. नंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात १९२७ साली सुरू झालेली त्यांची सेवा १९५८ मध्ये निवृतीने संपली. तेथे त्यांना राउज बॉलपीठासीन प्राध्यापक म्हणून मानाच्या स्थानावर नेमण्यात आले.

निवृतीनंतर बेसिकोव्हिच यांनी आठ वर्षे अमेरिकेतील विविध संस्थात कार्य केले. त्यानंतर ते इंग्लंडला परतले आणि मृत्यूपर्यंत केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात अध्यापन करत राहिले.

त्यांचे प्रमुख संशोधनकार्य चयन पद्धती (Combinatorial Methods) आणि वास्तव विश्लेषण (Real Analysis) या विषयांत आहे. या विषयांच्या अभ्यासाला गती देण्याचे श्रेय बेसिकोव्हिच यांना दिले जाते. त्यांचे वास्तव फलांबाबतचे काही सिद्धांत अतिशय उल्लेखनीय आहेत. जपानी गणिती एस. काकेय यांनी १९१७ मध्ये ‘प्रॉब्लेम्स ऑफ मिनिमाइजिंग एरिआज’ ही वास्तव विश्लेषणातील एक कळीची समस्या मांडली होती. ती समस्या अशी होती की एक एकक लांबी असलेली एक सुई प्रतलावर ३६० अंशात मुक्तपणे फिरवली तर त्यासाठी किमान क्षेत्रफळ लागेल अशी आकृती कशी असेल ? (The Kakeya needle problem asks for the plane figure of least area in which a line segment of width 1 can be freely rotated allowed). बेसिकोव्हिच यांनी १९२८ मध्ये ती समस्या सोडवली आणि सिद्ध केले की सर्वसामान्यपणे असे किमान क्षेत्रफळ असलेली आकृती काढणे शक्य नाही.

बेसिकोव्हिच संच, होस्डोर्फ-बेसिकोव्हिच मिती (Hausdorff-Besicovitch dimension), बेसिकोव्हिच फल (Besicovitch functions) आणि बेसिकोव्हिच कव्हरिंग प्रमेय (BesicovitchCovering Theorem) अशा त्यांचे नावे दिलेल्या गणिती संकल्पना त्यांच्या कामाचा उच्च दर्जा दर्शवतात. त्यांच्या कार्यातूनच पुढे कंगोरी भूमिती (Fractal Geometry) विकसित होण्यास दिशा मिळाली असे मानले जाते. त्यांच्या संशोधनावर आधारित Almost periodic functions हे त्यांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे.

बेसिकोव्हिच यांना कित्येक मानाचे पुरस्कार मिळाले. ॲडम्स प्राईज, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, डि मॉर्गन मेडल आणि सिल्वेस्टर मेडल हे त्यातील मुख्य आहेत. त्यांच्या सन्मानार्थ एका अशनीला १६९५३ बेसिकोव्हिच असे नाव दिले गेले आहे.

संदर्भ : 

समीक्षक : विवेक पाटकर