स्टार्कवेदर, गॅरी कीथ : (९ जानेवारी, १९३८ ते २६ डिसेंबर, २०१९) स्टार्कवेदर यांचा जन्म अमेरिकेतील मिशिगन राज्यात लॅन्सिंग (Lansing, Michigan) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर मिशिगन स्टेट विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सुरुवातीच्या वर्षात त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ प्रा. टी. हार्वे एडवर्ड्स (T. Harvey Edwards) यांच्या समवेत काम केले. एडवर्ड्स रेण्वीय पंक्तिदर्शन (Molecular Spectrography) या विषयावर काम करत असताना काही विशिष्ट रसायनांच्या रेणुमधील अंतर शोधण्याच्या प्रयत्नात होते, ज्यासाठी पंक्तिमापी (spectrometer), विवर्तन निरीक्षणे (diffraction readings), भिंगे इत्यादीचा उपयोग करत होते. या कामात त्यांना मदत करत असताना स्टार्कवेदर यांना प्रकाशिकी (optics) या विषयात खूपच रुची निर्माण झाली, विशेषतः भिंगे आणि त्यांचे कार्य याकडे ते अधिक आकर्षित झाले.

परिणामस्वरूप, त्यांनी रोचेस्टर (Rochester) विद्यापीठात प्रवेश घेऊन प्रकाशिकी या विषयातील एम. एस. पदवी प्राप्त केली. त्यानंतर बॉश आणि लॉम्ब (Bausch & Lomb) या कंपनीत १८ महिने काम केल्यावर, प्रतिमाकरण (imaging) तंत्रज्ञान विकसित करत असणाऱ्या झेरॉक्स (Xerox) या कंपनीत नोकरी पत्करली. त्यांच्या सुरुवातीच्या प्रकल्पांत हायस्पिड फॅसिमिल (Facsimile) मशीन म्हणजे द्रुतगतीने प्रतिमा तयार करणारे यंत्र विकसित करणे हा प्रकल्प होता. त्यात कागदावर पुरेसा प्रकाश टाकणे आणि तयार झालेली प्रतिमा शीघ्रतेने मिळवण्यासाठी योग्य उपकरण बनवणे असे होते. यासाठी लेझर तंत्रज्ञान वापरण्याची स्टार्कवेदर यांची कल्पना फलद्रूप झाली. त्यासाठी त्यांनी सर्व बाजू आरशाचा असलेला एक अष्टभुजाकृती परिभ्रमी दंडगोल (spinning drum) बनवून त्यावर लेसरमधील प्रकाश केंद्रित केला. अशा तऱ्हेने लेसरमधून केंद्रीत होणारा प्रकाश या फिरत्या दंडगोलावर उसळी घेऊन प्रतिलिपी यंत्रामधून जाताना त्यामधील पानावर तो पसरतो.

आपल्या प्रयोगशाळेत अवाढव्य फॅसिमिल यंत्रांचे निरीक्षण करताना त्यांना कल्पना सुचली की जर एखाद्या मूळ गोष्टीची प्रत बनविण्याचे काम जे फॅसिमिल यंत्र करते, त्या ऐवजी मूळ गोष्ट तयार करण्यासाठी संगणकाचा वापर केला तर कसे? छायाप्रत काढणारे फोटो कॉपीयर यंत्र तयार करणाऱ्या झेरॉक्स कंपनीस यापुढील टप्पा गाठण्यासाठी अशा दोन यंत्रात माहितीचे आदानप्रदान होणे आवश्यक होते, कारण तसे केले तर एखाद्या कागदपत्राची स्कॅन(scan) केलेली प्रत दुसरीकडच्या यंत्रावर प्राप्त होणार होती. त्यासाठी स्टार्कवेदर यांनी लेसरची मदत घेण्याचे ठरवले. प्रतिमा कागदावर उतरविण्यासाठी त्यांनी लेसर किरणांचा वापर केला. नंतर अशा ठिपक्यांच्या प्रतिमा एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविण्यासाठी आपल्या कंपनीची यंत्रे वापरण्याऐवजी दुसऱ्या संगणकाकडे पाठविण्याची कल्पना त्यांनी मांडली. आणि इथेच लेसर मुद्रणयंत्राच्या कल्पनेने जन्म घेतला. परंतु त्या सुमारास लेसरचे तंत्रज्ञान अप्रगत स्तरावर होते आणि एकूणच या संदर्भातील गुंतवणूकीचा आवाका लक्षात घेता, झेरॉक्स कंपनीने या लेसर मुद्रणयंत्राच्या प्रकल्पाचे काम त्यांना थांबविण्यास सांगितले.

मात्र १९७१ साली झेरॉक्स कंपनीच्याच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील पालो ऑल्टो संशोधन केंद्राकडून (Palo Alto Research Centre-PARC) त्यांना त्यांच्या लेसर मुद्रक प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर केवळ ९ महिन्याच्या अवधीत स्टार्कवेदर यांनी आपला पहिला लेसर-मुद्रक बनविला. झेरॉक्स कंपनीने देखील या उत्पादनाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्या व्यावसायिक लेसर प्रिंटर Xerox 9700 याचा १९७७ साली बाजारात प्रवेश झाला. हे एक मोठे यश होते. या लेसर-मुद्रकाची क्षमता १ दशलक्ष (१०,००,०००) प्रती होती, जी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा बरीच अधिक होती. त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी कार्यालयीन उपयोगाकरिता पहिला लेसर प्रिंटर ‘the Xerox Star 8010’ विक्रीस आणला.

अंकीय मॅट पटल (digital mat film) तंत्रात ही स्टार्कवेदर यांनी मोठे योगदान दिले. मूळ स्टार वार्स (Star Wars) चित्रपटासाठी अंकीय परिणाम (digital effect) देणाऱ्या गटाचे ते सल्लागार होते. पुढे स्टार्कवेदर यांनी झेरॉक्स कंपनी सोडली व पुढील १० वर्षे ॲपल संगणक (Apple Computer) कंपनीत काम केले. तेथे त्यांनी रंगव्यवस्थापन तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यानंतर १९९७ साली ते मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये (Microsoft Research) रुजू झाले. तेथे त्यांनी प्रदर्शन तंत्रज्ञानावर (Display Technology) काम केले. तेथून ते २००५ मध्ये निवृत्त झाले.

Document imaging and indexing system आणि Multi-band color management या शोधांसमवेत त्यांना एकूण ४० हून अधिक एकस्वे मिळाली आहेत.

त्यांना जोहान गुटेनबर्ग पुरस्कार, डेव्हिड रिचर्डसन पदक आणि रंगीत पटल क्रमविक्षण (colour film scanning) क्षेत्रातील योगदानासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अकॅडेमी ॲवॉर्ड, युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडेमी ऑफ इंजिनीअरिंगवरील निवड आणि नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश हे सन्मान लाभले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर