अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू मेक्सिको राज्याची राजधानी, सँता फे परगण्याचे मुख्य ठिकाण आणि एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. लोकसंख्या ८४,६८३ (२०१९). असंसं.च्या नैर्ऋत्य भागात असलेल्या न्यू मेक्सिको राज्याच्या उत्तर-मध्य भागात, सँता फे नदीकाठावर हे शहर वसले आहे. हे शहर सँगी द क्रिस्टो पर्वताच्या पायथ्याशी असून त्याची सस. पासूनची उंची २,१३२ मी. आहे.

न्यू मेक्सिकोच्या दॉन पेद्रो पेराल्ता या तिसऱ्या स्पॅनिश गव्हर्नरने १६१० मध्ये प्वेब्लो इंडियनांच्या काळातील वसाहतीच्या अवशेषांवर नवीन वसाहत स्थापन केली. तिचे नाव ‘ला व्हिला रिअल द ला सँता फे द सँ फ्रॅन्सिस्को द असीस’ (इं. शी. द रॉयल सिटी ऑफ द होली फेथ ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असीस) असे ठेवले. पुढे त्याचे संक्षिप्त रूप सँता फे असे झाले. पेद्रो यांनी तेथे राजप्रासादसदृश गढी बांधली आणि कच्च्या विटांनी तटबंदीयुक्त असा चौक बांधला. त्या चौकाभोवतीच पुढे अरुंद बोळ असलेली कच्च्या विटांची घरे बांधण्यात आली. स्थापनेपासूनच सँता फे हे एक प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्वाचे ठरले; परंतु शहराचे वसाहतीकरण मंद गतीने होत राहिले. प्वेब्लो इंडियनांनी स्पॅनिश धर्मोपदेशक व सैनिक यांच्या वर्तणुकीविरुद्ध बंड करून स्पॅनिशांना शह दिला. तेव्हा १६८० मध्ये स्पॅनिश वसाहतवाल्यांनी शहर सोडून अन्यत्र स्थलांतर केले. प्वेब्लोंनी पुढे १२ वर्षे स्वातंत्र्य उपभोगले. १६९२ मध्ये राज्यपाल दॉन द्येगो द व्हार्गास यांनी शांततेच्या मार्गाने पुन्हा सँता फे वर स्पेनची सत्ता प्रस्थापित केली. त्यांना इंडियनांचा फारसा प्रतिकार झाला नाही. अठराव्या शतकात ते स्पॅनिश वसाहतवाल्यांचे महत्त्वाचे लष्करी, प्रशासकीय व मिशनरी केंद्र बनले. १८०६ मध्ये लेफ्टनंट झेबुलॉन एम. पाईक नैऋत्येकडील प्रदेशाचे समन्वेषण करण्यासाठी येथे आले होते. त्यांच्या अहवालावरूनच अमेरिकनांचे या प्रदेशाबद्दल आकर्षण वाढले. पाईक यांना समन्वेषणकाळात येथेच तुरुंगात ठेवण्यात आले होते. स्पॅनिशांच्या जोखडातून मेक्सिको देश स्वतंत्र झाल्यानंतर (१८२१) अमेरिकेची संयुक्त संस्थाने व मेक्सिको यांदरम्यानचा व्यापार सँता फे मार्गाने मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. १८४६ – १८४८ मधील मेक्सिकन युद्धात हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी हस्तगत केले. १८४८ मध्ये न्यू मेक्सिको अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत समाविष्ट झाल्यानंतर १८५१ मध्ये ते न्यू मेक्सिको प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण बनले. पुढे १९१२ मध्ये या प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर हेच राज्याच्या राजधानीचे ठिकाण राहिले. १८७५ पासून आर्चबिशपचे ते ठिकाण असून रोमन कॅथलिक पंथीयांचे उत्तर अमेरिकेतील ते एक प्रमुख केंद्र आहे. १८७९ मध्ये या ठिकाणापर्यंत लोहमार्ग टाकण्यात आला.

शहरात इंग्रजी व स्पॅनिश या दोन्ही भाषा वापरात असून प्वेब्लो इंडियन, स्पॅनिश व अमेरिकन अशा भिन्न संस्कृतींचा संकर येथे दृग्गोचर होतो. शहरातील वास्तुशिल्पांतही इंडियन व स्पॅनिश शैलींचा सुरेख संगम झाला असून त्याची प्रचिती राज्यपालांचा राजवाडा (१६१०, सध्या तेथे संग्रहालय आहे), चॅपेल ऑफ सान मीगेल (१७१०), कॅथीड्रल ऑफ सेंट फ्रान्सिस (१८६९), फोर्ट मर्सी (१८४६), क्रिस्तो रे चर्च इत्यादी वास्तूंमधून येते. या प्रेक्षणीय वास्तूंशिवाय येथील कलावीथी, द म्यूझीयम ऑफ नाव्हाहो सेरिमोनिअल आर्ट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयबेरियन कलोनिअल आर्ट्स, न्यू मेक्सिको मिलिटरी म्यूझीयम इत्यादी वस्तुसंग्रहालये प्रसिद्ध आहेत. त्यांतून इंडियनांनी बनविलेल्या अनेक कलात्मक वास्तू आढळतात. मानवशास्त्र व पुरातत्त्वविद्या यांच्या संशोधन-अभ्यासास वाहिलेल्या लॅबोरेटरी ऑफ अँथ्रपॉलॉजी आणि द स्कूल ऑफ अमेरिका या दोन संस्था आहेत.

शहराच्या परिसरातील पिकॉस रिव्हर कॅन्यन आणि ओजो कॅसिंटी हे गरम पाण्याचे झरे, बँडलियर राष्ट्रीय स्मारक ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यवर्धक व आल्हाददायक हवामान,निसर्गरम्य सृष्टिसौंदर्य, लगतच्या पर्वतीय प्रदेशात असलेली स्कीईंगची सुविधा आणि इंडियन-स्पॅनिश संगमातून बांधलेल्या कलात्मक वास्तू, यांमुळे हे पर्यटकांचे आकर्षक ठिकाण बनले आहे. यांशिवाय शहरात कलाकार व लेखकांच्या वसाहती, संगीतिकागृह, सेंट जॉन्स कॉलेज ऑफ सँता फे, अमेरिकन इंडियन विद्यालये, सँता फे राष्ट्रीय अरण्य मुख्यालय, प्वेब्लो इंडियनांची घरे इत्यादी आढळतात. शहराच्या परिसरात पर्वतीय प्रदेशात थोड्याफार प्रमाणात खाणकाम व्यवसाय चालत असला, तरी हे शहर प्रामुख्याने प्राणिज व कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. निवासी शहर म्हणूनही याला महत्त्व आहे.

समीक्षक : ना. स. गाडे