भूकंप मार्गदर्शक सूचना ३२

भूकंपादरम्यान इमारतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांची गुणवत्ता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामादरम्यान प्रत्येक बाबीच्या गुणनियंत्रणाकडे अतिशय बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. असे न केल्याने इमारतीमधील एखादी क्षीण बाजू भूकंपादरम्यान तिच्या कोसळण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. सामान्यतः ज्या इमारती केवळ गुरुत्वीय बलांचा सामना करण्यासाठी संकल्पित केल्या जातात त्या त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये त्यांना सामोरे जाणार्‍या २ ते ३ पट अधिक बलांसाठी संकल्पित केल्या जातात. याद्वारे, संकल्पनांमध्ये आवश्यकतेपेक्षा थोड्या अधिक बलांचा सामना करण्याची क्षमता इमारतींमध्ये निर्माण केली जाते. परिणामी इमारतींच्या संरचनात्मक घटकांना किरकोळ क्षति पोहोचली तरीही उर्वरित इमारत भूकंपादरम्यान सुरक्षित राहते. तसेच इमारतीच्या बांधकामामध्ये किरकोळ त्रुटी राहिल्या तरीही त्यांचा परिणाम संकल्पनेमध्ये आधीच गृहित धरला जातो.

याउलट, ज्या भूकंपरोधक इमारती भूकंपाच्या पार्श्वीय बलांचा सामना करण्यासाठी संकल्पित करण्यात येतात त्यांच्यासाठी साधारणपणे भूकंपाच्या प्रत्यक्ष हादर्‍यांच्या १० पटीने कमी बलांचा संकल्पनेमध्ये समावेश केला जातो. हे करण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठे भूकंप क्वचितच घडतात आणि सामान्य इमारतींना मोठ्या भूकंपादरम्यान काही प्रमाणात हानी होणार हे गृहित धरले जाते. इमारतीमधील प्रत्येक घटक भूकंपाच्या हादर्‍यांचा एका विशिष्ट पद्धतीने सामना करणार हे अपेक्षित असते आणि तीव्र हादर्‍यांदरम्यान या घटकांची अधिकतम हादर्‍यांना सामोरे जाण्याच्या क्षमतेची एक प्रकारे चाचणीच घेतली जाते. म्हणूनच, भूकंपादरम्यान इमारतीच्या संरचनात्मक घटकांमधील अकालीक, अनपेक्षित किंवा निराधार अशा अनेक त्रुटी समोर येतात. याप्रकारच्या परिणामांमुळे इमारतीच्या बांधकामातील सदोष गुणवत्ता देखील तीव्र हादर्‍यांदरम्यान निदर्शनास येते. म्हणूनच भूकंपाचा सामना करणार्‍या इमारतींसाठी उत्तम गुणवत्ता नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे ठरते.

इमारतींचे गुणनियंत्रण/गुणवत्तानियंत्रण : इमारतींचे गुणनियंत्रण म्हणजे शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बांधकामाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि पद्धतींचा स्वीकार करून त्यांची अंमलबजावणी करणे. गुणनियंत्रणाचा इमारतीच्या बांधकामाच्या प्रत्येक पायरीवर अवलंब करणे आवश्यक ठरते.

  •  इमारतीच्या संरचनात्मक विन्यासाच्या निरूपण प्रक्रियेदरम्यान (Conceptualizing structural configuration) – या प्रक्रियेदरम्यान वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन उत्तम संरचनात्मक विन्यासाची निवड केली पाहिजे.
  • इमारतीचे संकल्पन – संरचना अभियंत्यांनी बांधकामाचे संकल्पन करताना संरचनेच्या सुरक्षिततेची सूत्रे आणि संबंधित संकल्पन संहितेचा योग्य वापर करून अत्यंत काळजीपूर्वक परिगणिते करणे आवश्यक आहे.
  • संरचनात्मक नकाशे तयार करणे – संरचना अभियंते आणि आरेखक यांनी इमारतीचे संकल्पन अत्यंत व्यापक आणि अचूकपणे नकाशावर दर्शविणे आवश्यक आहे.
  • बांधकाम साहित्याची निवड – कंत्राटदारांनी योग्य बांधकाम साहित्याची निवड करून आदर्श बांधकाम पद्धतीचे आचरण करणे आवश्यक आहे.
  • संरचना आणि बांधकाम नकाशांचे प्रत्यक्ष बांधकामात रूपांतर करणे – बांधकाम अभियंत्यांनी योग्य अशा प्रमाणित कारागिरांच्या साहाय्याने संरचना अभियंत्यांना अपेक्षित आणि उत्तम मार्गदर्शक सूचना आणि मानकांच्या साहाय्याने इमारतीचे बांधकाम संरचना नकाशांनुसार होईल असे बघणे आवश्यक आहे.
  • बांधकामानंतरच्या घडामोडी – इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रतिपालन अभियंत्यांनी (Maintenance engineer) पुढील अनेक वर्षांसाठी तिच्या संरचनात्मक घटकांची त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा त्यांच्या कार्यात खंड पडणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

गुणवत्तेची खात्री / (आश्वासन) (Quality Assurance) : गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी नसलेल्या संपूर्णतः स्वतंत्र अशा व्यावसायिक अभियंते किंवा संस्थांनी अत्यंत कठोरपणे इमारतींचे निरीक्षण आणि तपासणी करून संरचनात्मक अभियंत्यांनी तयार केलेले संकल्पन आणि इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम आचरणात आणले गेले आहे की नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे. ह्यालाच गुणवत्तेची खात्री देण्याची पद्धत म्हटले जाते. ही प्रक्रिया वर नमूद केलेल्या गुणवत्ता नियंत्रणाच्या प्रत्येक पायरीसाठी अवलंबिली गेली पाहिजे.

गुणवत्तेची खात्री आश्वासन देण्याची प्रक्रिया : इमारतीच्या मालक आणि विकासक यांच्यावर इमारत केवळ कार्यतत्पर, सुरक्षित आणि टिकाऊ असण्याबरोबरच ती सुंदर आणि अर्थशास्त्रीय दृष्ट्या सुयोजितपणे बांधण्याची जबाबदारी आहे. इमारतीच्या गुणवत्तेची जबाबदारी तिच्याशी निगडित वास्तुशास्त्रज्ञ, संरचना अभियंते, बांधकाम अभियंते, आरेखक, कंत्राटदार, कारागीर (जसे सुतार, लोहार, बांधकाम मजूर इ.) आणि प्रतिपालन अभियंते या प्रत्येकाची आहे. बांधकामासंबंधी प्रत्येक पायरी ही आखून दिलेल्या संकल्पन संहिता आणि मार्गदर्शक सूत्रांनुसारच असणे आवश्यक आहे. याबाबतीत कुठल्याही प्रकारची चालढकल स्वीकारणे योग्य नाही. बांधकामातील प्रत्येक पायरी कमी अधिक महत्त्वाची नसून एकत्रितपणे सगळ्या बाबी इमारतीच्या गुणवत्तेसाठी कारणीभूत ठरतात.

इमारतीचे केवळ मोठ्या भूकंपासाठी सखोल संकल्पन केले परंतु, तिचे बांधकाम सदोष असेल तर केवळ उत्तम संकल्पन इमारत सुरक्षित बनविण्यासाठी पुरेसे ठरत नाही. वर नमूद केलेल्या एका जरी भागधारकाने (stakeholder) गुणवत्ता नियंत्रणादरम्यान आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही तर संपूर्ण इमारतीची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच इमारतीच्या मालकांनी व्यावसायिक सोयींचा स्वीकार करताना खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

१) इमारतीच्या बांधकामाच्या स्थळाचे भूकंपाच्या धोक्यासाठी योग्य आकलन आणि ज्ञान, २) बांधकामाचे त्या प्रदेशात लागू होणार्‍या बांधकामाचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि संहितांचे संकल्पनादरम्यान कठोर पालन, ३) स्वतंत्र निरीक्षकांकडून संकल्पनाचा आढावा, ४) उत्तम आणि अपेक्षित बांधकाम साहित्याची निवड, ५) इमारतीचे योग्य आणि काळजीपूर्वक बांधकाम, ६) स्वतंत्र संस्थेकडून बांधकामाची तपासणी आणि ७) इमारतीचा स्वीकृत ताबा आणि वापर. यांपैकी एखाद्या जरी बाबीच्या आकलनामध्ये किंवा आचरणामध्ये त्रुटी आढळून आल्या तरी संपूर्ण इमारत आणि स्थळाची सुरक्षा धोक्यात येते. यासाठी अत्यंत तज्ञ अशा व्यावसायिक वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची बांधकामासाठी मदत घेणे आवश्यक ठरते. अशा तज्ञांना भूकंपरोधक इमारतींच्या विशेष बांधकामाचा पूर्वीचा यशस्वी अनुभव असणे गरजेचे आहे.

इमारतीच्या मालकांना भूकंपविरोधी इमारतींचे बांधकाम आणि संकल्पन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो :

  • तज्ञ व कार्यक्षम वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची निवड : भूकंपरोधक इमारतींच्या संकल्पन आणि बांधकामासाठी अनेक मार्गदर्शक सूचना आणि संहिता उपलब्ध आहेत. वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना त्यांचे संपूर्ण आकलन व ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र सध्या अस्तित्वात आणि सर्वमान्य असलेल्या अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्र शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जात नाही. यामुळे प्रत्यक्ष हा व्यवसाय करणार्‍या वास्तशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना भूकंपरोधक इमारतींची वागणूक आणि त्यांच्या भूकंपरोधक संकल्पनांची तत्त्वे ज्ञात असतीलच याची खात्री देता येत नाही. म्हणूनच, भूकंपरोधक इमारतींचे बांधकाम करू इच्छिणार्‍या मालकांना कार्यक्षम आणि तज्ञ व्यावसायिकांची निवड करणे अतिशय अवघड जाते. यासंबंधी शासनाने योग्य अशा कार्यक्षम आणि तज्ञ व्यावसायिकांची निवड करून त्यांना यथोचित अभियांत्रिकी परवाने देण्याची खात्रीशीर व्यवस्था निर्माण केली पाहिजे; ज्यायोगे इमारतींच्या मालकांना त्यांची मदत घेता येऊ शकेल.
  • महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या बांधकाम नियमांचे पालन करणे – सर्वसाधारणपणे स्थानिक पालिका, वास्तुशास्त्रज्ञ आणि संकल्पन अभियंत्यांनी इमारतीच्या सुरक्षिततेची खात्री देणार्‍या विविध बांधकाम नियम आणि पालिकेच्या कायदेशीर बाबींचा पूर्तता करण्याची अपेक्षा करतात. परंतु, हे केवळ व्यावसायिकांनी एकतर्फी प्रयत्न करून शक्य होत नाही. पालिकेच्या अधिकार्‍यांनी सुद्धा ह्या नियमांचे कठोरपणे पालन करून त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र सध्या पालिकांमध्ये यथोचितपणे प्रशिक्षित केलेल्या व्यक्तींचा मोठा तुटवडा असल्यामुळे बांधकामाच्या नियमांची स्थानिक पालिकांकडून कठोर अंमलबजावणीची खात्री देता येत नाही. यासाठी भूकंप सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी काही पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. उदा., स्वतंत्रपणे तज्ञ आणि कार्यक्षम अभियंत्यांचा भूकंपरोधक इमारतींच्या सुरक्षेसाठी आढावा घेण्यास वापर करणे.
  • भूकंपाच्या धोक्याचा अंदाज घेण्यासाठी अभ्यास समिती नेमणे – भूकंपाच्या धोक्याच्या अंदाजाचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक अनिश्चित घटकांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. साध्या इमारतींच्या बांधकामासाठी स्थानिक भूकंपविषयक संकल्पन मानकांचा वापर करणे पुरेसे ठरते. मात्र मोठ्या आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी स्थल-वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. यासाठी इमारतीच्या मालकांना कार्यक्षम भूकंपीय भूगर्भशास्त्रज्ञ, भूकंपवैज्ञानिक, भूतांत्रिक अभियंते आणि भूकंपीय संरचनात्मक अभियंते अशा अनेक विशिष्ट तज्ञांची मदत घ्यावी लागते.

बांधकामादरम्यान इमारतीच्या भूकंपरोधक संरचनात्मक नकाशांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे तिच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी कार्यक्षम कंत्राटदारांकडूनच इमारतीचे बांधकाम करून घेणे योग्य ठरते. तसेच त्यांच्यावर देखरेख करणार्‍या स्वतंत्र संस्थांमार्फत कंत्राटदारांनी बांधकामासाठी निवडलेल्या बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेची योग्य त्या चाचण्या करून खात्री देणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष बांधकामाच्या स्थळी देखरेख करणार्‍या अभियंत्यांनीदेखील काम ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे याची खात्री करून देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व बांधकाम अभियंते आणि संबंधित कारागिरांना त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित परवाने आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्यास ते सगळ्यांसाठी सोईचे ठरेल.

व्यावसायिक नीतिमत्ता : बांधकाम करताना त्यात सहभागी असणार्‍या प्रत्येक व्यक्तीने उच्च प्रतीचे नैतिक नियम आचरणात आणले तरच भूकंपरोधक इमारतीचे संकल्पन आणि बांधकाम शक्य आहे. कुठल्याही प्रकल्पाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी तीन प्रकारच्या चुका प्रामुख्याने टाळल्या पाहिजेत. मूळ उद्दिष्टातील चूक, बोधकल्पनेतील चूक आणि अंमलबजावणीतील चूक. यांपैकी मूळ उद्दिष्टातील चूक ही खर्‍या अर्थाने नैतिक चूक असून इतर दोन कार्क्षमतेशी निगडित आहेत. उदा., स्वतःच्या कार्यक्षमतेबाहेरील काम स्वीकरणारा व्यावसायिक एक प्रकारे अनैतिक पद्धतीनेच काम करत असतो. तसेच, इतर एखादा व्यावसायिक तो प्रत्यक्षपणे योग्य पद्धतीचा अवलंब करू शकत नाही हे कळल्यानंतर देखील प्रकल्पावर काम करत राहतो तो देखील अनैतिक पद्धतीचाच स्वीकार करत असतो. एवढेच नाही तर एखादा अभियंता दिलेल्या मानकांनुसार काम न करता फक्त खर्च कमी करण्यासाठी इतर मार्गांचा बांधकामात वापर करतो, तो देखील अनैतिक पद्धतीमध्येच सहभागी असतो.

स्थापत्य बांधकामामध्ये आपला समाज त्या इमारतीची वर्तणूक गृहित धरतो. उदा., एखादा वाहनचालक पुलावरून गाडी चालवत असताना त्या पुलाची सुरक्षा त्याच्या नकळत गृहित धरतो. म्हणूनच, अभियांत्रिकी पद्धतीने बांधकाम करताना त्या इमारतीचे बांधकाम सुरक्षित आणि उच्च नैतिक मूल्यांचा अवलंब करून करण्यात आले आहे. याची खात्री पटवून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. व्यक्तींमधल्या गुणांवर कुठलेही कायदेशीर बंधन घालता येणे अशक्य आहे. परंतु परिस्थिती काही प्रमाणात विशिष्ट प्रणाली आणि पद्धतींचा अवलंब करून नियंत्रणात ठेवण्यात येऊ शकते. उदा., (अ) कार्यक्षमतेनुसार व्यक्तींना परवाने देणे – ठराविक व्यावसायिकांना त्यांनी किमान कार्यक्षमता सिद्ध केल्यानंतरच त्यांना संकल्पन किंवा बांधकामाचा परवाना दिला गेला पाहिजे तसेच हा परवाना ते कुठलेही गैरव्यवहार्य करताना आढळल्यास जो जप्त करता येण्याची सोय असेल आणि (ब) चुका करणार्‍या व्यक्तींना जलद गतीने दंड आणि शिक्षा करण्याची कायदेशीर तरतूद आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची कायदेशीरपणे अस्तित्वात असलेली यंत्रणा तयार करणे. अशा प्रकारची यंत्रणा अनेक देशांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, जी भारतासारख्या देशांमध्ये सुद्धा प्रस्थापित केली गेली पाहिजे.

संदर्भ :

IITK – BMPTC – भूकंपमार्गदर्शक सूचना ३२