बाजारात असंख्य विक्रेते मात्र वस्तूंची खरेदी करणारा एकच ग्राहक असतो, त्यास ग्राहक मक्तेदारी म्हणतात. ग्राहक मक्तेदारीमुळे ग्राहकास सौदाशक्ती प्राप्त होऊन तो वस्तूंच्या किंमती कमी करतो. उदा., अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीकडे ग्राहक मक्तेदारी असल्याने ती कंपनी मोटारींचे विविध भागांची (ब्रेक, टायर, रेडिएटर इत्यादींची) खरेदी मोठ्याप्रमाणावर करतात. याउलट, मोटारीचे विविध भाग विकणारे अनेक विक्रेते बाजारात आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा आहे; मात्र जनरल मोटर्स कंपनीकडे सौदाशक्ती असल्यामुळे ते मोटारीच्या विविध भागांची खरेदी करताना किंमती कमी करण्यात यशस्वी होतात.

बाजार संरचनेतील ग्राहक मक्तेदारी ही संकल्पना समजून घेताना त्यासंबंधी इतरही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये

  • पूर्ण स्पर्धा (Perfect Competition) : पूर्ण स्पर्धा बाजारात असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असल्यामुळे कोणताही एक विक्रेता अथवा एक ग्राहक वस्तूंच्या किंमती नियंत्रण करू शकत नाही.
  • मक्तेदारी (Monopoly) : स्पर्धेचा पूर्ण अभाव असलेल्या बाजारात एकच विक्रेता असल्याने तो वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतो.
  • अल्पजनाधिकार (Oligopoly) : अल्पजनाधिकार बाजारात काही विक्रेत्यांकडे ही सौदाशक्ती एकवटल्यामुळे ते वस्तूंच्या किंमती नियंत्रित करू शकतात.
  • उभयपक्षी मक्तेदारी (Bilateral Monopoly) : यामध्ये वस्तूंच्या किंमतीबीबत अंदाज बांधणे कठीण आहे. शिवाय, बाजारात एकच विक्रेता व एकच ग्राहक अशी परिस्थिती क्वचितच असते.
  • अल्पजन ग्राहक मक्तेदारी (Oligopsony) इत्यादी.

बाजारात विक्रेते आणि ग्राहक या दोघांकडेही मक्तेदारी (Monopoly) असल्याचे चित्र सर्वसामान्यपणे दिसून येते. मक्तेदार आणि ग्राहक मक्तेदार यांचे निर्णय परस्पर विरोधी असले, तरी पूर्ण स्पर्धा बाजाराप्रमाणे निर्णय होत नहीत. सर्वसाधारणपणे मक्तेदार वस्तूंच्या किंमती वाढविण्याच्या दृष्टिने मागणी वक्रावरील सीमांत मूल्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो, तर ग्राहक मक्तेदार वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी पुरवठा वक्राकडे लोटण्याचा प्रयत्न करतो.

मक्तेदारी आणि ग्राहक मक्तेदारी हे दोनही विषय पूर्ण स्पर्धा बाजाराच्या अगदी विरूद्ध टोकाचे आहेत. ग्राहक मक्तेदारीमध्ये ग्राहकाकडे सौदाशक्ती एकवटल्याने पूर्ण स्पर्धा बाजारापेक्षाही कमी किंमतीला ते वस्तू खरेदी करू शकतात. या कमी किंमतीला किती वस्तूंची खरेदी करावी, हे ठरविण्यासाठी मूलभूत सीमांत तत्त्वाचा उपयोग होतो. सीमांत तत्त्वानुसार प्रत्येक जादा नगसंख्येच्या खरेदीपासून मिळणारे जादा मूल्य किंवा उपयोगिता ही त्या जादा नगसंखेच्या खर्चाबरोबर असावी (एका सीमेवरती ग्राहक मक्तेदाराचा जादा फायदा त्याच्या जादा खर्चाइतका असावा).

प्रत्येक व्यक्तीच्या मागणी वक्रावर त्याने खरेदी केलेल्या वस्तूंचे सीमांत मूल्य किंवा सीमांत उपयोगितेचे मापन होते. सीमांत उपयोगिता त्याने खरेदी केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येवर अवलंबून असते. त्यामुळे सीमांत मूल्य कोष्टकावरून (Marginal Value Schedule) वस्तूंच्या नगसंख्येची मागणी समजते; परंतु एक जादा वस्तूच्या नगसंख्येवरील खरेदीचा सीमांत परिव्यय (Marginal Cost) मात्र ग्राहक स्पर्धात्मक बाजारसंरचनेतील आहे की, त्या ग्राहकाकडे मक्तेदारी आहे, यावर अवलंबून असतो.

बाजारसंरचनेतील ग्राहक वस्तूंच्या किंमतींवर प्रभाव पाडू शकत नाही. ग्राहकाने बाजारात कितीही वस्तूंची खरेदी केली, तरी वस्तूंच्या किंमती बदलू अथवा कमी  होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जादा वस्तू खरेदीचा खर्चही त्या वस्तुच्या किंमतीबरोबर असतो, हे आकृती १ अ नुसार स्पष्ट करता येईल.

आकृती १ (अ) आणि आकृती १ (ब) : पूर्ण स्पर्धा बाजारातील ग्राहक आणि विक्रेता यांमधील साम्य

आकृती १ अ नुसार प्रत्येक वस्तुच्या नगासाठी ग्राहकास मोजावी लागणारी किंमत ही त्याच्या सरासरी खर्चाबरोबर आहे, असे दिसते. हा खर्च सर्व वस्तूंच्या नगांसाठी समप्रमाणात आहे. अशा वेळी प्रत्येक जादा वस्तूवरील जादा खर्च म्हणजे सीमांत खर्च किती? स्पर्धात्मक बाजारातील ग्राहकाचा सीमांत खर्च हा सरासरी खर्चाबरोबर असतो. हे दोनही खर्च बाजारातील वस्तूंच्या किंमतीएवढे असतात (आकृती १ अ वरून सीमांत मूल्य कोष्टक काढता येते आणि त्या कोष्टकावरून वस्तूची मागणी वक्र काढता येतो). अशा परिस्थितीत ग्राहकाने किती वस्तूंची खरेदी करावी, हे समजण्यासाठी ग्राहकाचे एक जादा वस्तूच्या नगाचे सीमांत मूल्य त्याच्या एक जादा वस्तूच्या खरेदी सीमांत खर्चाबरोबर असावे. त्यामुळे ग्राहकाने मागणी वक्र ज्या सीमांत खर्च वक्राला छेदतो, त्या E बिंदूपाशी समतोल साधावा. त्या समतोल बिंदूनुसार X अक्षावर Q एवढ्या वस्तुंची खरेदी करावी.

आकृती १ ब मध्ये पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील विक्रेत्याने किती वस्तूंचे उत्पादन करावे व कितींची विक्री करावी. विक्रेताही दिलेल्या किंवा बाजारात ठरलेल्या किंमतीचा स्वीकार करतो. विक्रेत्याची सीमांत आणि सरासरी प्राप्ती किंमतीबरोबर असते. विक्रेत्याचा महत्तम नफा E या समतोल बिंदूपाशी म्हणजे जेथे सीमांत प्राप्ती वक्र सीमांत परिव्यय वक्राला छेदतो तेथे निश्चित होतो, त्यानुसार Q वस्तुनगसंख्येची विक्री मक्तेदारास महत्तम नफा मिळवून देते.

आकृती मध्ये स्पर्धा बाजारात ग्राहकाची तुलना विक्रेत्याशी केली आहे. स्पर्धा बाजारातील आकृती १ अ मधील ग्राहक आणि आकृती १ ब मधील विक्रेता हे दोघेही बाजारात निश्चित झालेली P किंमत स्वीकारतात. या दोनही आकृत्यांमध्ये Y अक्षावर वस्तुची किंमत (डॉलरमध्ये), तर X अक्षावर वस्तूंची नगसंख्या दर्शविली आहे. आकृती १ अ मध्ये P ग्राहकाने स्वीकारलेल्या किंमतीला सरासरी खर्च हा सीमांत खर्चाबरोबर आहे. सीमांत खर्च आणि सरासरी खर्च स्थिर असून समान आहेत. तसेच E या समतोल बिंदूपाशी किंमत ही सीमांत मूल्याबरोबर आहे. त्या E समतोल बिंदूनुसार ग्राहक Q वस्तूनगसंख्येची खरेदी करतो. आकृती १ ब मध्ये स्पर्धा बाजारातील विक्रेत्याने स्वीकारलेल्या P किंमतीला सरासरी व सीमांत प्राप्ती स्थिर असून समान आहे. E या समतोल बिंदूपाशी किंमत ही सीमांत परिव्ययाच्या बरोबर आहे. E या समतोल बिंदूनुसार स्पर्धा बाजारातील विक्रेत्याची वस्तू विक्रीचा नगसंख्या Q निश्चित झाली आहे.

बाजारातील एकमेव ग्राहकाने दिलेल्या किंमतीला उत्पादक वस्तूंच्या किती नगसंख्येचा पुरवठा करू शकतात, ते पुरवठा वक्रावरून दिसते. खरेदी वेळी वस्तूची नगसंख्या ठरविताना सीमांत प्राप्ती वक्र बाजार पुरवठा वक्राला छेदतो, तो छेदबिंदू विचारात घेतल्या जात नाही; कारण ग्राहकाला निव्वळ महत्तम नफा मिळवायचा असेल, तर ग्राहकाने तुलनेने कमी वस्तू नगसंख्येची खरेदी करावी, जी ग्राहकाला कमी किंमतीला मिळवता येईल. अशा वेळी किती वस्तू नगसंख्येची खरेदी करावी, हे ठरविण्यासाठी एक जादा वस्तू नगसंख्येच्या खरेदीपासूनचे मूल्य हे सीमांत खर्चाएवढे असावे. वस्तू नगसंख्येच्या खरेदीपासून मिळालेला निव्वळ नफ्याचे सूत्र : NB = V – E. यावरून ग्राहक मक्तेदारास खरेदीपासून मिळणारे मूल्य व त्यासाठी करावा लागणारा खर्च समजतो.

बाजार पुरवठा वक्र हा सीमांत खर्च वक्र नाही. बाजार पुरवठा वक्रावरून एकूण वस्तूंच्या नगसंख्येची खरेदी समजते. शिवाय, प्रत्येक वस्तूच्या नगासाठी आपण किती किंमत मोजावी यासंबंधीचे आकलन होते. जसे, पुरवठा वक्र हा सरासरी खर्च वक्र आहे. हा सरासरी खर्च वक्र वरच्या दिशेने चढत जाणारा आहे. त्यामुळे सीमांत खर्च वक्र त्यावर आहे. याचे कारण प्रत्येक जादा वस्तूच्या नगसंख्येसाठी अधिक किंमत मोजावी लागते. ती फक्त जादा नगासाठीच नाही, तर सर्व नगांसाठी मोजावे लागते.

 

बाजारातील पुरवठा वक्र हा ग्राहक मक्तेदाराचा सरासरी खर्च आहे. सरासरी वक्र वाढता असल्यामुळे सीमांत खर्च त्यावर आहे. ग्राहक मक्तेदार Qm वस्तू नगसंख्येची खरेदी करतो; कारण J बिंदूपाशी सीमांत खर्च व सीमांत मूल्य म्हणजेच मागणी वक्र एकमेकांना छेदतात. J बिंदूनुसार Qm खरेदी होते; पण किंमत मात्र F बिंदूपाशी पुरवठा वक्रावर म्हणजेच सरासरी खर्चानुसार ठरते. पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत आणि वस्तुंची नगसंख्या हे दोनही ग्राहक मक्तेदारीपेक्षा जास्त आहे. पूर्ण स्पर्धा समतोल बिंदूपाशी होतो, जेथे सरासरी खर्च  आणि सीमांत मूल्य एकमेकांना छेदतात.

मक्तेदारास सीमांत परिव्ययापेक्षा अधिक किंमत आकारणे शक्य आहे; कारण मक्तेदार खालच्या दिशेने (ऋण उताराच्या) जाणाऱ्या मागणी वक्रास किंवा सरासरी प्राप्ती वक्रास सामोरा जातो. त्यामुळे सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा कमी आहे. K बिंदूपाशी सीमांत परिव्यय व सीमांत प्राप्ती समान होतो. त्यानुसार Q वस्तू नगसंख्येची विक्री निश्चित होते, जी पूर्ण वस्तू नगसंख्येपेक्षा कमी होते.

 

आकृती ३ (अ) आणि आकृती ३ (ब) : ग्राहक मक्तेदाराची मक्तेदाराशी तुलना

आकृती ३ अ मध्ये जेथे मक्तेदाराचा सीमांत परिव्यय वक्र सीमांत प्राप्ती वक्राला K बिंदूपाशी छेदतो, तेथे मक्तेदाराचा समतोल होतो. सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्तीपेक्षा जास्त असल्याने किंमत ही सीमांत खर्चापेक्षा जास्त आहे. आकृती ३ ब मध्ये ग्राहक मक्तेदाराची खरेदी J बिंदूनुसार म्हणजे जेथे सीमांत खर्च वक्र सीमांत मूल्य वक्राला छेदतो, त्यानुसार ठरते. सीमांत खर्च हा सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे. म्हणून सीमांत मूल्य खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे.

 

समीक्षक – अनील पडोशी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा